बीड: गेवराईच्या सीमा पवारनं शिक्षण आणि शेतीचा व्याप सांभाळून कुस्तीसारख्या खेळातही आपलं कर्तृत्त्व दाखवून दिलं आहे. सीमा पवार ही ऊसतोड कामगाराची लेक. गेवराईच्याच अट्टल महाविद्यालयात शिकणारी सीमा घरच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी स्वत:ही ऊसतोडणीचं काम करते. घरची रोजची कामं, कॉलेजचं शिक्षण आणि वर ऊस तोडणीचं काम हा सारा व्याप सांभाळून सीमानं अवघ्या गेवराईसाठी अभिमानास्पद कामगिरी बजावलीय. तीही कुस्तीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सीमानं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याच कामगिरीच्या निकषावर तिची निवड हरयाणातल्या कुरुक्षेत्रावर होणाऱ्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
सीमा पवार आणि तिच्या कुटुंबियांची एकीकडे जगण्यासाठीची धडपड सुरु असतानाच, त्यातून वेळ काढून सीमा एक वेगळी वाट चोखाळण्याचाही नेटानं प्रयत्न करत आहे. सीमाच्या याच धडपडीचं आणि याच प्रयत्नांचं गेवराईनं होर्डिंग्ज लावून कौतुक केलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा