ट्रेनच्या खिडकीची काच वर करत डोळे मिचकवत मी बाहेर पाहिलं. आकाशात काळ्याभोर ढगांची गर्दी दाटून आली होती. राजस्थानमध्ये हे मला क्वचितच अनुभवता आलं होतं. मैलो न् मैल पसरलेली सपाट जमीन आणि त्यावर चांगलं हातभर वर आलेलं आणि वाऱ्यावर नाचणारं गहू, मका आणि राईचं (सरसों) पीक. क्षणभर मला आपला दुष्काळ आठवला आणि या प्रदेशाचा हेवाच वाटला. माझ्या शेतातली बोटभर कपाशी आत्ता दुपारी कशी मान टाकून पडली असेल, या विचाराने थोडं वाईट वाटलं. पण दुष्काळ भोगलेल्याला असं हिरवंगार टवटवीत शेत बघणं, याहून दुसरं सुख तरी कोणतं असेल! ट्रेनच्या सुसाट वेगात दर पाच मिनिटाला येणारं इथलं गाव या प्रदेशाच्या सुख- समृद्धीची कहाणी सांगत होतं. सकाळीच मोटरसायकलला दुधाचे भलेमोठे कॅन्स बांधून जाणारे सरदारजी, शेताच्या बांधातून वाट काढणारे ट्रॅक्टर्स, रस्त्याच्या कडेला पहाटेची साखरझोप घेणारे ट्रक, सकाळी आळस झटकणारी गावं आणि नुकत्याच जाग्या झालेल्या ढाब्यांवर भल्या मोठ्या पातेल्यातून बाहेर येत हवेत विरून जाणाऱ्या चहा, दुधाच्या वाफा. एखाद्या चित्रकाराने क्षणात चित्र काढावं, कवीने मिनिटाभरात कविता लिहून काढावी, अशी ही दृश्यं मी खिडकीच्या गजांमधून अनुभवत मनात साठवत होतो. तर, 'देशाचा अन्नदाता' असणाऱ्या पंजाबमध्ये आपलं स्वागत आहे.
सकाळी सातच्या सुमारास फरिदकोट स्टेशनवर गाडी थांबली. रंगीबेरंगी फेटा बांधून कचोरी, पकोडेचा नाश्ता बनवणाऱ्या राजस्थानी काकांच्या जागी आता सरदारजींचे छोले भटुरेचे स्टॉल्स दिसत होते. ट्रेनमध्ये बहुतांशी सरदारजी मोठ्या मोठ्यानं छान मनमोकळ्या गप्पा मारत होते. दहा दिवस राजस्थानमध्ये घालवल्यावर ही पंजाबमधली पहिलीच सकाळ. जयपूर ते अमृतसर रेल्वेनं अठरा तासांचा प्रवास. आताशी कुठे अकरा तास झाले होते....म्हणजे अजून सात तास हा प्रवास चालणार होता. राजस्थान आणि हरियाणा रात्रीच मागे टाकत गाडीने पंजाबमध्ये प्रवेश केला होता. एक एक स्टेशन मागे टाकत गाडी जितक्या वेगाने पुढे धावत होती, तितक्याच वेगाने मी पंजाब डोळ्यांमध्ये साठवत होतो.
झेलम, रावी, चिनाब, सतलज आणि बियास या पाच नद्यांनी मिठीत घेतलेल्या पंजाबला पाण्याची कमी नाहीच. याच नद्यांच्या काठावर कधीकाळी सिंधू संस्कृती उदयाला आली. कोणे काळी अफगाणीस्तानमधल्या काबुलपर्यंत, पश्चिमेकडे बलुचिस्तान, उत्तरेत थेट तिबेट तर खाली दक्षिणेत दिल्लीपर्यंत पाय पसरलेला पंजाब प्रांत देशाच्या विभाजनानंतर मर्यादित झाला. सुखी समृद्ध असा हा प्रदेश! त्यातही भारताचं प्रवेशद्वार म्हणून मुघल आणि अफगाणांची अनेक आक्रमणं आपल्या छातीवर ताकदीनं झेलणारा आणि शौर्याने परतवून लावणारा इथला निधडा शिख सरदार आजही आपल्या कमरेला मोठ्या अभिमानानं कृपाण मिरवतो. पंजाब जसा शूर वीरांचा आहे, तसाच तो कष्टकरी शेतक-यांचाही आहे... कमालीचा धार्मिक आहेच, पण तितकाच सहिष्णूही आहे. नजर लागावी, इतकं हे सुंदर राज्य.
सकाळी 11 च्या सुमारास माझ्या वरच्या सीटवरच्या सरदारजींनी त्यांच्या डब्यातला पराठा मला दिला. मी नको नको म्हणत असतानाही प्रेमळ दटाईने त्यांनी मला घ्यायला लावला आणि मोठ्या आपुलकीने पंजाबीत विचारलं, "कहां जा रहे हो?"
मी म्हटलं, "जी, अमृतसर!"
"बड्डे नसिबवाले हो, हरमिंदर साहब के सामने मेरे तरफ से भी इक बार और मत्था टेकना, बेटा!" सरदारजी खूप आनंदाने आणि दिलखुलास हसत बोलत होते.
मी म्हटलं, "आप कहां से हो? और कहा जा रहे हो?"
ते म्हणाले, "हरयाणा, सिरसा जिला अभी फगवाडा जा रहा हुं बेटी का ससुराल वहा है"
त्यानंतर ते जे बोलायला लागले, ते नॉनस्टॉप बोलतच राहिले. अस्सल पंजाबी मधलं त्यांचं बोलणं मला थोडं फार कळत होतं. जे कळत नव्हतं, त्यावरही मी हसून प्रतिक्रिया देत होतो. माणूस मोठा आनंदी होता.
फगवाडा स्टेशनवर उतरताना म्हणाले, "चलो बेटा, अब मुलाकात तो नही होगीI लेकीन अच्छा लगाI"
मीही प्लॅटफॉर्मवर उतरून त्यांना निरोप दिला.
दुपारचे अडीच वाजले. अमृतसर स्टेशनवर उतरलो. अमृतसरचं माझं हॉस्टेल इथून तीन किमी वर होतं. गूगल सुवर्ण मंदिरापासून 500 मीटरवर त्याचं लोकेशन दाखवत असल्याने सुवर्ण मंदिरापर्यंत शेअर रिक्षाने आलो. रिक्षावाल्याला पैसे देऊन वळतो न वळतो, तोच एकाने न विचारताच डोक्याला भगवा रुमाल बांधला. त्यावर शिख धर्माची पवित्र चिन्हं होती. मला काही सुचायच्या आत तो म्हणाला, "भाईजी, दिजीए 10 रु!"
मी मनातल्या मनात म्हटलं, "वा! हा चांगलाच धंदा आहे!"
त्याला दहा रुपये देऊन थोडंसं पुढे गेलो, तर एक वयोवृद्ध आजी तिथे पांढरेशुभ्र रुमाल विकत होत्या. त्यांनीही रुमाल घेण्याची विनंती केली. मी त्यांच्याकडूनही रुमाल घेऊन हॉस्टेलकडे चालत निघालो. इथून अंतर एक किमी होतं. रिक्षावाला यायला तयार नव्हता, म्हणून चालत निघालो. समोर पार्टिशन म्युझियम! तिथून उजवीकडे वळल्यावर रस्ता जालियनवाला बागकडे जातो. या चौकात एक जण समोर थेट आडवा येत म्हणाला, "भाईजी, बाघा बॉर्डर जाना है?"
खरंतर आज अटारी - वाघा बॉर्डरला जाण्याची माझी इच्छा होतीच.
मी म्हटलं, "कितने बजे निकलते हो?"
तो म्हणाला, "चार बजे!"
मी म्हटलं, "नही आ पाऊंगा आजI लेकिन कल जरुर आऊंगा"
तो म्हणाला, "ठीक है जी, कल यही मिलिए, यहीं से रिक्षा निकलती है.
जालियनवाला बागेच्या समोरून असंख्य रिक्षा, बसेस अटारी-वाघा बॉर्डरला जातात. मी तिथून आतल्या गल्लीतलं माझं हॉस्टेल गाठलं. डोक्यात विचार सुरू होते, की आपण पटकन तयार होऊन आलो, तर कदाचित एखाद्या रिक्षेने आजच बॉर्डरवर जाता येईल. मी त्या दृष्टीने भराभर आवरलं आणि तासाभरात त्याच चौकात आलो. साडेचार वाजत आले होते. कुणी रिक्षावाला शोधण्याआधी एक रिक्षावाला आपणहूनच माझ्याकडे आला. म्हणाला, "भैय्या, बाघा बॉर्डर चलोगे? "
मी म्हटलं, "अभी तो साडे चार बज रहे हैं! अभी देर हो गई होगी ना? अच्छी सीट मिलने के लिए जल्दी जाना पडता है, अब तो मुझे सीट भी नही मिलेगी"
तो म्हणाला, "भाईजी, अगर आपको सीट नही मिली, तो पैसे वापस कर दूंगाI रोज जाता हूं बॉर्डरपे, झूठ नही बोलूंगा, दरबारके सामने खडा हूं जी"
मी विचार केला.. आज जाऊन बघूया तर. नाही तरी उद्या जाणार आहोतच. मी 'हो' म्हटल्यावर, तो मला आतल्या गल्लीत घेऊन गेला. तिथे रिक्षामध्ये सात आठ जण आधीच बसलेले होते. मी मागच्या बाजूला बसलो. गल्लीबोळातून रिक्षा अटारीच्या रस्त्याला लागली. तसं हे अंतर 30 ते 35 किमीचं. अमृतसर शहरात आणि मेन रोडवर शून्य ट्रॅफिक. त्यामुळे पाऊण तासात....सव्वा पाच वाजता मी अटारी-वाघा बॉर्डरला पोहोचलो.
1947 च्या फाळणीत सर्वांत जास्त वेदना झाल्या त्या अमृतसरला! अमृतसरच्या छाताडावर रेषा आखली गेली. जीवाभावाच्या माणसांना एका रेषेनं विभक्त केलं. रक्तानं माखलेली प्रेतं अक्षरशः ढिगाने ट्रेनमधून अमृतसरला येत होती. आपल्या माणसांना शोधता शोधता अनेकांची हयात गेली. अजूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. या सगळ्या प्रसंगाची साक्षीदार अटारीची ही सीमारेषा.
एक सांगावंसं वाटतं, बरेच लोक 'वाघा बॉर्डर'असा उल्लेख करतात. पण वाघा बॉर्डर ही पाकिस्तानसाठी आहे. वाघा हे त्यांच्या सीमेवरचं शेवटचं गाव. आपल्या हद्दीतलं शेवटचं गाव अटारी त्यामुळे आपण भारतीय म्हणून कायम 'अटारी बॉर्डर' असा उल्लेख करावा.
अटारी बॉर्डरवर येऊन 'बीटिंग द रिट्रिट' सोहळा पाहण्याचं माझं स्वप्न आज पूर्ण होत होतं. स्वर्णजयंती द्वारातून प्रवेश केल्यावर माझ्यात जणू अनोखी शक्ती संचारली. काय तो माहौल.. कम्माल! क्रिकेटच्या स्टेडियमपेक्षा लाख पटीनं जल्लोश, देशप्रेम, आपल्या विविधतेतली एकता हे सगळं फक्त तिथेच अनुभवता येतं. अख्खा भारत देश हा समारंभ बघण्यासाठी आलाय की काय असं वाटत होतं. नशिबानेही आज मला पूर्ण साथ दिली. मी वाट काढत थेट दोन्ही देशांच्या सीमेवरच्या गेटजवळ जाऊन बसलो. अगदी व्हीव्हीआयपी वगैरे सीट असल्यासारखी जागा मिळाली. संध्याकाळचे पावणे सहा झाले होते. मी अटारी बॉर्डरच्या गेटपासून फक्त 50 फूटांवर होतो. स्टेडियमसारखा सळसळता माहौल! काही महिला, मुली, लहान मुलं मध्यभागी येऊन "सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हमपे डालो..." गाण्यावर थिरकत होते. गेटच्या पलीकडेही तसाच माहौल. 'जीवे जीवे पाकिस्तान'च्या घोषणा त्याबाजूनं येत होत्या. त्याला 'भारत माता की जय'च्या घोषणांनी प्रत्युत्तर दिलं जात होतं. 15 मिनीटं मस्त डान्स झाल्यावर सगळ्या महिलांना त्यांच्या सीटवर बसायला सांगितलं गेलं. त्यानंतर बीएसएफच्या दोन श्वानांनी गेटजवळ येऊन सलामी दिली. पाठोपाठ दोन महिला जवान गेटच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या.
दुसरीकडे काळ्या गणवेशातल्या पाकिस्तानी महिला जवान गेटच्याजवळ येऊन उभ्या होत्या. स्वर्णजयंती गेटकडून हातात तिरंगा घेऊन जवानांची तुकडी आत आली आणि मग एकच जल्लोष झाला! भारत माता की जय, वंदे मातरम् घोषणांनी आसमंत दणाणून गेला. त्यानंतर बीएसएफचे दोन सहा फुटी जवान आपल्या जोषपूर्ण थाटात रस्ता दणाणून सोडत गेटच्या दिशेनं असे काही धावत आले, की जणू आता युद्धच पेटणार आहे. गेटच्या समोरच त्यांनी आपले पाय डोक्याच्या वर जातील एवढे उंच उडवले. तेवढ्यात गेटचा दरवाजा उघडला. हा दरवाजा रोज पंधरा मिनिटं उघडतो. इथे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर शक्तीप्रदर्शन करतात. खूपच आणिबाणीची परिस्थिती आणि हिंसक कुरापती सोडल्यास हा सोहळा 1959 पासून म्हणजे जवळपास 60 वर्षं नित्यनेमाने सुरू आहे. कधी कधी सीमेवर तणाव असेल, तर तो राग सैनिकांच्या परेडमधून स्पष्ट दिसतो. थेट आव्हान देण्याचा आणि समोरासमोर राग व्यक्त करण्याचा हा मौका आपले सैनिक तरी का दवडतील? या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. हा सोहळा प्रत्येक भारतीय नागरिकाला रोज विनामूल्य अनुभवता येतो.
गेट उघडल्यावर पुढची पंधरा मिनिटं जे घडत होतं, ते शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. दोन्ही बाजूचे जवान आपल्या निधड्या छातीने पुढे येत..स्फुरणारे बाहु दाखवत एकमेकांना चिथावत होते. डोळ्यांमधून आग ओकत, "आमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नका." असा इशाराच देत होते. हे सगळं आपल्या समोर घडतं आणि अंगावर रोमांच उभे राहतात. रक्त सळसळतं आणि ओठांवर आपसूकच 'भारत माता की जय'चा नारा येतो.या सोहळ्याचा शेवट तर अविस्मरणीय आहे. दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज शिस्तबद्धपणे खाली उतरवले जातात आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी जल्लोष होतो. आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी हे सगळं अनुभवायलाच हवं. हा अनुभव म्हणजे राष्ट्रप्रेमाचं परमोच्च शिखरच! ही सगळी ऊर्जा मनात घेऊन मी स्वर्णजयंती गेटच्या मुख्यद्वारातून बाहेर पडलो. मला रिक्षा मिळते काय आणि त्यानंतर तासाभरात मी थेट बॉर्डरवर पोहोचून हा सोहळा अनुभवतो काय.... गेल्या तीन तासांत सगळं झटपट घडत गेलं. पण आजचा दिवस सार्थकी लागला. ज्या रिक्षातून आलो, त्याच रिक्षात आम्ही सगळे सहप्रवासी बसलो आणि अमृतसरच्या मार्गाला लागलो.
रात्री ८ च्या सुमारास रिक्षा शहराच्या आसपास पोहोचली. शहराच्या बाहेर मस्त सजलेले.. लाईटिंग केलेले ढाबे होते. मी दुसऱ्या मिनटाला रिक्षा थांबवली, त्याच्या हातावर 100 रु. ची नोट ठेवत सडक पार करुन कुलवंत सिंग दा ढाबा गाठला. पंजाबमध्ये आलो तर एकदा तरी ढाब्यावर जेवण झालंच पाहिजे ना! आपण सिनेमात बघतो, पंजाबी जेवण म्हणजे 'सरसों दा साग आणि मक्के दी रोटी'. डिश कितीही फिल्मी वाटली तरी इथल्या खाण्याचा हा ब्रँड आहे. ही मकईची भाकरी पचायला जरा जड असते. कधी वेळ आलीच तर जरा लिमिटमध्येच खा. आपल्या दृष्टीने पंजाबी खाणं म्हणजे तंदुरी रोटी आणि पनीर हेच. मात्र सरसों दा साग आणि मकईची अशी जाडजूड भाकरी मी पहिल्यांदाच खात होतो. कुलवंत सिंग जाऊन आता अनेक वर्षं झाली. त्यांचा मुलगा करतार सिंग ढाबा चालवतात. कुलवंत सिंग मुळचे पाकिस्तानधल्या रायविंड गावचे. हे गाव तसं लाहोरपासून अगदी जवळ. 1947 साली आॅगस्टमधे, म्हणजे फाळणीच्या महिन्यात आपला जीव कसाबसा वाचवून वाघा बॉर्डरमार्गे ते ट्रकमधून भारतात आले. पुढे काही वर्षांनी सगळं शांत झाल्यावर याच रस्त्यावर त्यांनी हा ढाबा सुरू केला. अटारी रोडवरचे खूप सारे ढाबे हे जीव वाचवून भारतात आलेल्या शिखांनी सुरू केले आहेत. खरंतर ती ढाबा संस्कृती आज पूर्वेला अरुणाचल आणि दक्षिणेेला कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहोचलीय. देशाच्या कोणत्याही हाय-वेवर रात्री प्रवाशांना खाऊपिऊ घालणारा पंजाबी ढाबा असतोच. एखाद्या रस्त्यावर ढाबा असणं ही गोष्ट आपल्याला किती सहज साधी वाटते . पण साध्या साध्या गोष्टींनाही मोठा इतिहास असतो.
रात्री 10 वाजता मी रिक्षाने हॉस्टेलवर पोहोचलो. अर्धा दिवस ट्रेनमध्ये गेला, तरीही आज अटारी-वाघा बॉर्डरचा सोहळा बघितल्याचं खूप समाधान होतं. आता उद्याचा पूर्ण दिवस अमृतसर शहरात फिरायचं होतं.
दुसऱ्या दिवशी जरा उशीरापर्यंतच झोपलो. कारण नाही म्हटलं तरी काल दिवसभर खूप फिरणं झालं होतं. पण झोप मस्त झाल्यामुळे आज फ्रेश वाटत होतं. माझ्या हॉस्टेलपासून अगदी 10 मिनटं चालत गेल्यावर जालियनवाला बाग आणि सुवर्ण मंदिर होतं. सकाळी 10 वाजता मी जालियनवाला बागेत आलो.एके काळी याच जालियनवाला बागेत 12 वर्षांचा भगतसिंग नावाचा एक छोटासा मुलगा 12 मैल चालत येऊन इथली रक्ताने माखलेली माती सोबत घेऊन गेला होता. याच मातीने भगतसिंगच्या मनात राष्ट्रप्रेम जागवलं आणि त्यातूनच भगतसिंग भारतीय क्रांतीचे प्रेरणास्थान बनले. 13 एप्रील 1919 रोजी याच ठिकाणी शेकडो निरपराधांचा बळी तत्कालीन पंजाबचा गव्हर्नर जनरल डायरनं घेतला.
बैसाखीचा तो दिवस. कारण याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती. तेव्हापासून अमृतसरमध्ये याच दिवशी मोठा उत्सव असतो. त्यानिमित्ताने इथे क्रांतीकारकांची सभा होणार, असा संशय इंग्रजांना होता. काही दिवसांआधीच क्रांतीकारक सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. काही लोकांनी आठवडाभरापूर्वीच याविषयी इंग्रजांकडे जाऊन ही शिक्षा चुकीची असल्याचं सांगत शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानिमित्ताने निषेध सभा आणि काळ्या पाण्याची शिक्षा असेलला अमानवी रॉलेट कायदा रद्द करावा या मागणीसाठी सभा होणार होती. सभा बागेच्या एका कोपऱ्यात होणार होती. बाकी बागेत उत्सव सुरू राहणार होता. लहान मुलं, महिला, वृद्ध, उत्सवानिमित्तानं बागेत जमले असताना क्रूरकर्मा जनरल डायरनं बागेत अंदाधुंद गोळीबार करण्याचे आदेश दिले.
अचानक सुरू झालेल्या गोळीबाराने लोक जीव मुठीत घेऊन पळू लागले. मुख्य प्रवेशद्वारावरुनच हा गोळीबार होत असल्यानं बाहेर पडायला कोणताही मार्ग नव्हता. कसलीही दया न दाखवता हा गोळीबार सुरूच राहिला. शेकडो लोकांच्या शरीराची चाळण झाली. काही लोक भींतीवरुन उडी मारून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होते, त्यांच्यावरही गोळीबार सुरूच होता. कोणीही जीवंत राहता कामा नये असं जनरल डायर ठरवूनच आलेला असावा. लोकांच्या प्रेतांचे ढीग पडले. काही लोकांनी तर आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या मारल्या. ती विहीरही निष्पाप लोकांच्या छिन्नवच्छिन्न देहानं भरली. सरकारी आकड्यांनुसार 400 लोकांची हत्या झाली, असंं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात एक हजार लोकांची हत्या झाली आणि दोन हजार लोक जखमी झाल्याचं सांगितलं जातं.
कवी प्रदीप यांची कविता शाळेत असल्यापासून आपण सगळेच ऐकलीय. पण इथे उभं असताना ही कविता आठवतांना डोळे पाणावले.
" जालियांवाला बाग ये देखो, यहां चली थी गोलियां,
यह मत पूछो किसने खेली यहां खून की होलियां।
एक तरफ बंदूकों की दन-दन, एक तरफ थी टोलियां,
मरने वाले बोल रहे थे इन्कलाब की बोलियां।
बहनों ने भी यहां लगा दी,बाजी अपनी जान की।
इस मिट्टी से तिलक करो, यह धरती है बलिदान की।"
स्वातंत्र्याच्या पहिल्या आंदोलनात 1857 साली घडलेली एक गोष्ट आठवली. एका इंग्रज अधिका-याला उर्दु भाषेची फार गोडी होती. तो उर्दु भाषा नुसती शिकलाच नाही तर चक्क उर्दुमध्ये कविताही करु लागला. बादशाह बहादूर जफर यांना अटक करून रंगूनला नेत असताना त्यांना डिवचण्यासाठी त्या इंग्रज अधिकाऱ्यानं उर्दुमध्ये शेर म्हटला,
"दमदमें में दम नही है, खैर मांगो अब जान की ,
ऐ जफर, ठंडी हुई, शमशेर हिंदोस्तां की"
आपले बहादूशाह जफर तर जातीवंत शायर. त्यांनी लगेच त्याला उत्तर दिलं.
"गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की,
तख्त-ए- लंदन तक चलेगी तेग हिन्दुस्तान की"
योगायोग बघा, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर बरोबर 21 वर्षांनी 13 मार्च 1940 रोजी याच धरतीच्या सुपुत्रानं लंडनच्या केक्सटन हॉलमध्ये क्रुरकर्मा जनरल डायर याचा गोळी घालून वध केला. बहादूर शाह जफर यांचे शब्द 80 वर्षांनी का होईना...खरे ठरले. जालियनवाला बागेच्या संग्रहालयात शहीद उधमसिंग यांच्या पवित्र अस्थींचं दर्शन घेण्याचं भाग्य मला मिळालं.
जालियनवाला बागेतल्या हत्याकांडानंतर शेकडो क्रांतीकारक तरूण पेटून उठले. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त ते डायरचा वध करणारे उधमसिंग या सर्वांच्या मनात या हत्याकांडाविषयी बदल्याची भावना होतीच. आणि खऱ्या अर्थाने इथूनच इंग्रज शासनाची उलटी गिनती सुरू झाली. 1997 साली इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी या स्मारकावर श्रद्धांजली वाहिली.
2013 साली ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनीही जालियनवाला बागेत येऊन या स्मारकाचं दर्शन घेतलं. "इतिहासातली सर्वात लांछनास्पद घटना!" असा उल्लेख त्यांनी इथल्या व्हिजिटर बूकमध्ये केला होता. आजही इथल्या भिंतींवरच्या गोळ्यांच्या त्या खुणा बघून काळीज हेलावून जातं.
जालियनवाला बागच्या बाहेर पडल्यावर अगदी दोन मिनिटांवर आहे, हरमंदिर साहिब अर्थात शिखांचं सर्वांत पवित्र धर्मक्षेत्र सुवर्ण मंदिर. हे मंदिर अद्भूत आहे. भारतात ताजमहालनंतर सर्वांत जास्त लोक कुठे येत असतील, तर ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात. मंदिरात जाण्याआधी जरा या शहराच्या नावाविषयी कथा दंतकथा आहेत त्या बघू.
शिखांचे चौथे गुरू श्रीरामदासजी यांनी ई.स. 1577 साली हे शहर वसवलं. त्यामुळे या शहराला रामदासपूर नावानं ओळखलं जायचं. पण इ.स 1604 मधे हरमंदिर साहिब गुरुद्वाराची स्थापना झाल्यावर शहराचं नाव अमृतसर पडलं.
यासंदर्भात एक पौराणिक कथाही आहे.वाल्मिकी ऋषींचं वास्तव्य याच ठिकाणी असल्याचे संदर्भ पुराणात सापडतात. इथेच सीतामाईने लव कुश यांना जन्म दिला. जेव्हा श्रीरामचंद्रांनी अश्वमेध यज्ञासाठी घोडा सोडला, तो घोडा लव आणि कुश यांनी पकडला. त्यानंतर रामाचं सैन्य आणि लव कुश यांच्यात युद्ध झालं. ज्यामध्ये रामाचं सैन्य मारलं गेलं. मग युद्धासाठी स्वतः श्रीराम आले पण त्यांना वाल्मिकी ऋषींनी रोखलं. सैन्याला पुन्हा जीवंत करण्याची विनंती श्रीरामांनी वाल्मिकी ऋषींकडे केली. त्यावेळी वाल्मिकी ऋषींनी अमृताचा पाऊस पाडला. सर्व सैन्य जीवंत झाल्यावर प्रभू श्रीरामांनी ते अमृत तिथल्याच भूमीमध्ये जीरवलं. गुरू रामदासजींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी शहराचं नाव बदलून अमृतसर ठेवलं.
हरमंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिर हे लोकसहभाग आणि सेवाभावाचं उत्तम उदाहरण आहे. इथे येणारा प्रत्येक जण हा समान असतो. श्रीमंत असो वा गरीब. प्रत्येकाला डोक्यावर रुमाल किंवा स्वच्छ वस्त्र बांधल्यावरच इथे प्रवेश मिळतो.
मंदिराचा हा पांढराशुभ्र परिसर... त्यात अमृत सरोवर आणि पाण्यात मधोमध हरमंदिर साहिब गुरुद्वारा. खास बाब म्हणजे, जितके शिख बांधव या गुरुद्वारात दर्शनाला येतात, त्यापेक्षा जास्त हिंदू आणि इतर धर्मीय बांधवही येतात. जात, धर्म, पंथ, श्रीमंत-गरीब, स्री-पुरुष सगळी बंधनं इथे प्रवेश करताच गळून पडतात. ज्या काळी दलितांना मंदिर प्रदेश निषिद्ध मानला जायचा, तेव्हाही या गुरुद्वाराचे 4 भव्य दरवाजे सर्वधर्मियांचे स्वागत करायचे.
दिवसरात्र गुरुबाणीचे कर्णमधुर स्वर परिसर भारावून टाकतात. रांगेतून तासभर पुढे सरकत मी गुरुंचं दर्शन घेतलं. गुरुबाणी गाणारी मंडळी तिथे खंड न पडता भजनं गात असतात. दर्शन घेतल्यावर बाहेर थोडावेळ बसणं ही एक विलक्षण आनंददायी आध्यात्मिक अनुभुती असते. शब्दांमध्ये कदाचित ते मला मांडता येणार नाही. प्रत्येकानं तो मनःशांतीचा अनुभव स्वतःच घ्यावा. चांगला तासभर मी सुवर्ण मंदिराच्या समोर बसून होतो. दर्शन घेऊन पुन्हा अमृत सरोवरच्या बाहेर पडायचं असतं. साजूक तुपातला प्रसाद तिथे आपली वाट बघतच असतो. खालसा पंथात शुद्ध भोजनाच्या परंपरेला फार महत्व आहे. इथला शुद्ध तुपातला प्रसाद खाल्ल्यावर आपल्याला ते पटतं.
दर्शन घेतल्यावर माझी पावलं आपसूकच लंगरकडे वळली. गुुरुद्वाराची दारं ही फक्त आध्यात्मिक शिकवण देत जगण्याचा मार्ग दाखवत नाहीत. तर त्यांचं पोट भरण्यासाठी 24 तास खुली असतात. फ्री मिल्स किंवा ज्याला इंग्रजीत 'कम्युनिटी किचन' म्हणतात, तो लंगर शिख धर्माचा एक वैशिष्ट्यपूर्ण स्तंभ आहे. लंगर म्हणजे आपण भंडारा म्हणू शकतो. पण सुवर्ण मंदिरातला लंगर बघून मी अवाक् झालो. इथे दर दहा मिनिटाला हजारो लोक जेवण करुन उठत होते. वर्षाचे 365 दिवस सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी लंगर विनामूल्य सुरु असतो. काय व्यवस्थापन असेल विचार करा. हातात प्लेट वाटी चमचा देऊन आत सोडलं जातं. आत गेल्यावर एका हॉलमध्ये अंथरलेल्या पट्ट्यांवरती जाऊन बसायचं. काही सेकंदातच जेवण वाढलं जातं. जमिनीवर बसून गरीब-श्रीमंत इथे मांडीला मांडी लावून गुरुच्या प्रसादरुपी लंगरच्या या सहभोजनाचा लाभ घेतात.
लंगरची सुरुवात 500 वर्षांपूर्वी शिखांचे पहिले गुरु गुरुनानकदेवजी यांनी केली. एके दिवशी गुरुनानकजींना त्यांच्या वडिलांनी व्यापारासाठी काही पैसे दिले. जेव्हा ते व्यापारासाठी सामान घेण्यासाठी बाहेर पडले तेव्हा रस्त्यात त्यांना काही साधू उपाशीपोटी भजन करताना दिसले. त्या साधूसंतांकडे खाण्यासाठी अन्न नव्हतं. गुरुनानकदेवजींनी स्वतःजवळच्या व्यापाराच्या पैशांतून या साधू संतांना पोटभर जेवण दिलं. तेव्हापासून लंगरची प्रथा सुरु झाली ती आजही नित्यनेमानं सुरू आहे.
हिंदुस्तानवर अधिराज्य गाजवणारा अकबर बादशाह एकदा शिखांचे तिसरे गुरु अमरदासजींना भेटण्यासाठी आला. अमृतसरजवळच गोविंदवाल साहिबमध्ये ते राहत होते. जो कोणी मला भेटायला येईल त्याला आधी लंगरमध्ये जेवावं लागेल, तरच मी भेटेन, असा नियमच त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे अकबर बादशाहसुद्धा लंगरमध्ये जेवला. अकबर बादशाहला ही पद्धत प्रचंड आवडली. लंगर प्रथा सुरू राहावी यासाठी अकबर बादशहाने मदतही केली.
आपल्या घरी दोन माणसं जेवायला आली, तर आपली किती तारांबळ उडते. पण इथे रोज लाखो लोक जेवतात. लोकांची श्रद्धा आणि दानशूर लोक इथे पैसे, अन्नधान्याच्या स्वरुपात दान करतात. काही लोक तर दिवसभर भाज्या निवडणे, कणिक मळणे, लसूण-कांदा आणि मसाल्याचे पदार्थ उपलब्ध करून देणे, ही सेवा देत असतात. प्लेट वाटपापासून ते जेवण वाढणे आणि ताटं धुण्यापर्यंत हजारो हात अव्याहतपणे लंगरमध्ये राबत असतात. लोकांची सेवा हीच गुरुंची सेवा ही शिख धर्माची सर्वात मोठी शिकवण. साधं आणि शुद्ध भोजन ही लंगरची परंपरा आहे. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" ते हेच..
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लंगरमध्ये जेवायला भाग्य लागतं. मी करत असलेल्या भटकंतीला, स्वत:ला शोधायला निघालेल्या अनेकांना हा गुरुद्वारा खूप काही शिकवण देतो. दररोज लाखो लोकांच्या पोटाची आग विझवणारी ही जागा माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वांत सुंदर आणि पवित्र जागा होती.
दुपारी साडेतीन-चार वाजता सुवर्ण मंदिराच्या बाहेर पडलो. सुवर्ण मंदिरासारखंच दुर्ग्याना मंदिर अमृतसरमध्ये आहे. म्हणजे या मंदिरासारखंच ते तलावात बनवलंय. वास्तुही तशीच आहे, असं ऐकण्यात आलं. त्यामुळे तिथे जाण्यासाठी मी rapido app वरून बाईक बोलावली. साधारण पंचविशीतला एक मुलगा मला घ्यायला आला. बाईकवरुन दुर्ग्याना मंदिराकडे निघालो.
सरदारजींनी विचारलं, "भाईजी, कहां से आये हो आप?"
मी 'मुंबई'म्हटल्यावर तो म्हणाला, "यार, क्या भीड होती है मुंबई में! मैं बस एक ही बार आया हूं, तभी तय किया था वापिस नहीं आऊंगा"
तो अगदी इनोसन्टली बोलत होता. ते ऐकून मला हसू आलं.
मी म्हटलं, "आप क्या करते हो?"
तो म्हणाला "अभी तो जॉब ढूंढ रहा हूं, बीएस्सी करने के बाद लगा था कोई जॉब मिल जायेगा.. लेकीन दो सालसे जॉब नही है, यहा पे इंडस्ट्री अभी आना भी बंद हो गयी है, इसलिए तो यह छोटे मोटे काम कर लेता हूं"
त्याच्या बोलण्यातून पंजाबची बेरोजगारी आणि महाराष्ट्राची बेरोजगारी किती सारखी आहे हे जाणवलं. बोलता बोलता दुर्ग्याना मंदिर आलं.
गाडी थांबवत तो म्हणाला, "ये लो भाईजी, आ गया मंदिर!"
दोनच किमीवर हे मंदिर होतं. त्यामुळे फक्त 10 रुपये बिल झालं. मी 20 रुपयांची नोट देऊन त्याला म्हटलं, "यह 20 रु रहेने दिजिए"
दुर्ग्याना मंदिरात गेलो. इथे सगळं अगदी सुवर्ण मंदिरासारखं करण्याचा प्रयत्न केलाय. पण ते फार काही जमलं नाहीये. मी दर्शन घेऊन बाहेर आलो. बाजूलाच हनुमानाचं मंदिर आहे. अश्वमेध यज्ञाचा घोडा लव कुशकडून परत घेऊन जाण्यासाठी हनुमान इथे आले होते. पण लव कुश यांनी हनुमानाशी युद्ध करुन त्यांनाही पराभूत केलं होतं. मंदिरातून दर्शन घेऊन मी आता शेवटचं ठिकाण म्हणजे गोविंदगड किल्ल्याकडे निघालो.
गोविंदगड किल्ला इथून फक्त एक किमीवर असल्याने मी चालत निघालो. हा भाग अमृतसरचा जुन्या शहराचा भाग आहे. मात्र नुकताच पाऊस पडून गेल्याने रस्त्यांची स्थिती भीषण झाली होती. खड्डे तर होतेच, पण रस्त्याच्या कडेला चिखलही झाला होता. मुंबई.. पुणे असो की अमृतसर शहरी लोकांच्या समस्या सारख्याच आहेत. कशीतरी वाट काढत मी गोविंदगड किल्ल्याजवळ पोहोचलो.
शहराच्या अगदी मध्यवस्तीमध्ये हा किल्ला उभारण्यात आला. आधी या किल्ल्याला 'गुजर सिंह किला' या नावाने ओळखलं जायचं. पण नंतर 1805 साली महाराजा रणजीत सिंग यांनी या किल्ल्याला शिखांचे दहावे गुरु गुरुगोबिंद सिंग यांचं नाव दिलं.
गोविंदगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला 'नलवा गेट'म्हणतात. हरी सिंग नलवा यांचं नाव या प्रवेशद्वाराला दिलंय. किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार आहे. तिथून पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाण्यासाठी सुरंग होता. तो मार्ग आता बंद केलाय. बाकी अर्ध्या किल्यामध्ये आता रेस्टॉरंट्स सुरू करण्यात आली आहेत. तर काही भागात म्युझियम्स आहेत.
किल्ल्याच्या बाहेर आलो तेव्हा संधीप्रकाश होता. दिवे लागायला सुरुवात झालीच होती. मी पुन्हा बाईक मागवून हॉस्टेल गाठलं. थोडा आराम केल्यावर रात्री पुन्हा बाहेर पडलो, तेव्हा हे शहर आणखीच खुललं होतं. सुवर्ण मंदिराच्या अगदी जवळ राहात असल्यानं मी पुन्हा त्या परिसरात आलो. जालियनवाला बाग पासून ते सुवर्ण मंदिरापर्यंत लख्ख दिव्यांनी रस्ते उजळून जातात. पंजाबी ड्रेसेस्, कलरफूल फुलकारी, बॅग्ज घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. इथल्या कुल्फी आणि पाणीपुरीचे स्टॉल्सवर लोकांची गर्दी होते. लक्ष दिव्यांनी सुवर्ण मंदिराची वास्तू उजळून निघाली. मी पुन्हा सुवर्ण मंदिरात गेलो. रात्रीच्या वेळीही भाविकांची गर्दी तसूभरही कमी झालेली नव्हती. उलट रात्री अमृत सरोवरात डुबकी लगावण्यासाठी गर्दी वाढली. गुरुबाणीच्या स्वरलहरी वातावरण प्रसन्न करत होत्या
'कर किरपा तेरे गुण गावा
नानक नाम जपत सुख पावा'
अमृत सरोवराच्या काठाशी बसून हे सूर कानावर पडत होते. समोर मनोहारी सुवर्ण मंदिर
बराच वेळ बसल्यावर मंदिराच्या बाहेर पडलो. हॉस्टेलकडे जाताना मध्ये लस्सीचं दुकान लागलं. पंजाबी लस्सी म्हणजे कमाल असते. एकतर आपल्यापेक्षा दुप्पट मोठा ग्लास आणि त्यात चमचा टाकला तर तो उभा राहिल इथकी घट्ट लस्सी. खाणं हाच इथल्या लोकांचा शौक. पंजाबी माणूसही या लस्सीसारखाच दिलदार आहे. "पंजाबशिवाय जगात काय ठेवलंय?" अशा आविर्भावात इथला माणूस मोठ्या मानानं जगतो ते उगीच नाही. सहजच बोलता बोलता आपण सरदारजींवर विनोद करतो, त्यांची खिल्ली उडवतो. पण इथली लोकं तशी नाहीत. देशाला पुरेल इतका गहू उत्पादन करण्याची क्षमता इथल्या कष्टकरी शेतकऱ्यामध्ये आहे. सैन्यदलात सर्वांत जास्त सैनिक याच पंजाबनं दिले. पंजाबी गाणी बॉलिवूड संगीताचं अभिन्न अंग आहे. याच धरतीनं गुरुनानक देवजींपासून भगतसिंग, उधमसिंग पर्यंतची अनेक रत्नं दिली. तैमुर, सिकंदर, मुघल, अफगाणी आणि परकीयांची शेकडो आक्रमणं यांनीच तर आपल्या छातीवर झेलली. स्वातंत्र्याच्या आधी सगळ्यात मोठा नरसंहार जालियनवाला बागेत झाला. इथल्या मातीमध्ये शहीदांच्या लहूचा रंग मिसळलाय. अमृतसरच्या या पवित्र धरतीवरचा माणूसही मोठा दलेर आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मी मुंबईला जाण्यासाठी स्टेशन गाठलं. अमृतसर-कोच्चवेल्ली एक्सप्रेस मार्गस्थ झाली. गेले 12 दिवस मी तहान-भूक, रात्र-दिवस विसरून फिरत होतो. काय शोधत होतो ते माहित नाही. पण या प्रवासात बरंच काही सापडत गेलं. हा12 दिवसांचा प्रवास आता संपला. पण खरा प्रवास तर यापुढे सुरू झालाय.
जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल.
वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरुजी दी फतेह.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा