आजही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार गुप्तपणे व झटपट करण्याचा दोन्ही पक्षाचा हेतू असतो. आपल्याला जमिनीचा चांगला भाव मिळत आहे, जमीन घेणारी व्यक्ती व्यवहारात नवीन आहे त्यामुळे त्याला हक्क व वारस यांची फारशी माहिती नाही यामुळे घाई करणे व विषय गोपनीय ठेवणे उचित असे विविध कारणाने जमीन खातेडी विक्रीचा व्यवहार गोपनीय राहतो. प्रत्येक्षात जमिनीच्या मालकी हक्काची नोंद होते त्यावेळी अडचणी निर्माण होतात किंवा होण्याचा संभव जास्त असतो. त्यात वारस हक्क,कायदेशीर व्यवहार न होणे ,पैसे कमी मिळणे ,ठरलेल्या व्यवहारापेक्षा नंतर जास्त पैसे मागणे, दबावाने होणारी विक्री ,राजकीय व सामाजिक कारणांमुळे नोंदीत अडवणूक इ.कारणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो.
भविष्यात अश्या अडचणी होऊ नये म्हणून जमीन खरेदी करते वेळी जास्तीत जास्त बाबी तपासल्या पाहिजे. व्यवहारात सामान्य ज्ञानासाठी ३ टप्प्यात वर्गीकरण करता येईल.
अ.पहिला टप्पा -जमीन खरेदी पूर्वी तपासण्याच्या महत्त्वाच्या बाबी—
1.जमिनीचा चालू ७/१२ काढून त्यावर मालकांचे नावे तपसावीत.
2.सदर जमीन विक्री करणार्याच्या नावावर कशी झाली आहे यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात.
3.जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का?
4.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये बँक,सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भर आहे का?
5.जमीन हि प्रत्येक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का?
6.जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का?
7.सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर,झाडे इ.बाबत प्रत्येक्ष पाहणी करून खात्री करावी.
8.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये कुल अथवा अन्य व्यक्तीचे हक्क आहे का ?
9.जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेल्या कायद्याचा भंग होतो का?
10.पाट पाणी पाइपलाईन,वहिवाट रस्ता, झाडे इ. हक्क कसे आहेत.
ब.दुसरा टप्पा -जमीन खरेदी व्यवहार करते वेळी घ्यावयाची काळजी —
1.भारतीय कायद्यान्वये १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मिळकतीबाबत व्यवहार हा रजिस्टर असावा लागतो.म्हणजेच जमीन व्यवहार हा रजिस्टर असला तरच तो कायदेशीर ठरतो.
2.खरेदीखत लिहिते वेळी त्यातील मजकूर हा तज्ञ, माहितगार किंवा वकिलाच्या मार्फत केल्यास भविष्यात अडचणी येत नाहीत.
3.खरेदीखतामध्ये सामाईक विहीर, पाण्याचा साठा,फळझाडे ,बांधावरील झाडे,वहिवाट,रस्ते ,घर इ.बाबत स्पष्ट उल्लेख येतो कि नाही हे तपासले पाहिजे.
4.व्यवहाराने ठरवलेली जमिनीची रक्कम कशी दिली जाणार आहे त्याप्रमाणे व्यवहार व त्याचा उल्लेख खरेदीखतात यावा.
5.खरेदीवेली असलेले साक्षीदार हे नंतर न पलटनारे व शब्द पाळणारे असावेत.त्यासाक्षिदारांचे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड झेरोक्स बरोबर असावी.
6.व्यवहार रजिस्ट्रेशन साठी शासन नियमांचे स्टँप ड्युटी व नोंदणी फी भरावी.
क.तिसरा टप्पा – जमीन खरेदीनंतर नोंद —-
1.प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मागील महिन्याच्या झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची माहिती रजिस्टर कार्यालयातून तह्शीलदार व त्यांच्याकडून तलाठ्याकडे जाते.
2.जर तलाठी ह्यांचे कडे माहित आली नसेल तर स्वताहून त्यांच्याकड खरेदीखताची प्रत जोडून अर्ज करावा.
3.तलाठी यांच्याकड अर्ज सादर करताना खरेदिखातासोबत खरेदी केलेल्या जमिनीचे ७/१२,८ अ चे उतारे व विक्री करणारा मालकाचे पत्ते द्यावेत.
4.अर्ज दिल्यानंतर त्याची नोंद फेरफार नोंद लिहिली जाते.
5.फेरफार नोटीस संबंधिताना देण्यात येते यात खरेदी दिनांक,गट क्र,क्षेत्र,आकार,दस्त क्रमांक,सर्व व्यक्तींची नावे,यात अचूकता आहे कि नाही हे तपासणे.
6.नोटीस पाठविल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी देण्यात येतो.
7.कोणत्याही प्रकारची कोणाची हरकत आली नाही तर मंडळ अधिकारी १५ दिवसानंतर नोंद प्रमाणित करतात. त्यात ते नोंदणीकृत खारेदिखातावरून पडताळून पाहिले संबधितांना नोटीस रुजू. नंतर हरकत नाही असा शेरा देतात.
8.फेरफार नोंद प्रमाणित झाल्यानंतर लगेचच ७/१२ नोंदीची कार्यवाही करण्यात येते त्यात नावांची दुरुस्ती केली जाते. व असे दुरुस्तीचा ७/१२ व ८ अ चा उतारा प्राप्त झाल्यानंतर खरेदी नंतरची नोंद पूर्ण होते
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत— त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत.
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते. जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
*ग्रामपंचायत*
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्यक असलेली माहिती गाव कामगार तलाठी च्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.
खरेदी खत करतेवेळी जमिनीचा नकाशा नसेल चालेल
उत्तर द्याहटवाNo
उत्तर द्याहटवाउपयोगी माहिती
उत्तर द्याहटवामी १ गुंठा जमिन खरेदी केली ती नावावर होइल का
उत्तर द्याहटवाArdha guntha navavrti hoto ka
उत्तर द्याहटवाHo
हटवा1967 ला माझ्या वडिलांनी व शेजारील व्यक्तींनी त्याच्या वावरत विहिर खंडली होती.त्यामध्ये 50 टक्के लागणाऱ्या मालाची रक्कम दिलेली आहे.आता तो म्हणतो माझ्या जाग्यावर बांधली म्हणून त्याचा मला मोबदला द्या.(त्याचे मुले म्हणतात तो मयत झाला )ह्या वेळेस काय निर्णय घ्यावा.
उत्तर द्याहटवा2 गुंठे खरेदी होऊ शकते का 7/12 उताऱ्यावर नाव येईल का
उत्तर द्याहटवा