पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर देशभरात काहीसे संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. काळय़ा पैशाचा नायनाट करण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका आपल्यालाही बसणार का, हा आजच्या घडीत प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. सरकारच्या या निर्णयानंतर काल बँकांचे आणि एटीएमएमचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आजपासून नागरिकांना बँक, पोस्ट कार्यालय किंवा रिझव्र्ह बँकेच्या देशभरातील १९ कार्यालयातून बदलून घेता येतील. मात्र, या नोटा बदलायला जाताना नागरिकांनी काही गोष्टी जरूर ध्यानात ठेवल्या पाहिजेत.
* तुम्ही जमा कराल तितकी रक्कम तुम्हाला दिली जाईल. यात कोणतीही वजावट नसेल. प्रति व्यक्ती केवळ ४ हजारांची रोकड बदलून घेता येईल. त्यापेक्षा अधिक रकमेच्या नोटा असल्यास त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वळती करण्यात येईल.
* आज सकाळी ८ वाजल्यापासून बँकेचे व्यवहार सुरू होणार आहेत.
* आज नोटा बदलण्याचा पहिलाच दिवस असल्याने बँक आणि टपाल कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आगामी दोन-तीन दिवस ही गर्दी अशीच राहू शकते. त्यामुळे बँकेत गेलात तरी आपल्याला गरज आहे तेवढ्याच मुल्याच्या नोटा बदलून घ्या. अचानक मागणी वाढल्यामुळे बँकांकडे असणाऱ्या १०० रूपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इतरांनाही नोटांची गरज आहे हे लक्षात घेऊन आपल्याला हव्या तेवढ्याच मुल्याच्या नोटा बदलून घ्या. तुमच्याकडे दैनंदिन व्यवहारासाठी १०० रूपयांच्या पुरेशा नोटा असल्यास बँकातील गर्दी कमी झाल्यावर नोटा बदलून घ्या. कारण नोटा बदलण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे.
* ग्राहकांच्या सोयीसाठी येत्या शनिवारी आणि रविवारी बँका सुरू राहणार आहेत.
* आज देशातील काही ठिकाणी एटीएमचे व्यवहारही सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार सरकारकडून अजूनही एटीएम मशिन्ससाठी नोटा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आजही एटीएमचे व्यवहार शक्यतो बंदच राहतील.
* तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी धनादेश, बँक व्यवहार, मोबाइल बँकिंग, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड यांचा वापर करू शकता.
* तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले खाते उघडू शकता. जनधन योजनेअंतर्गत खाते असणाऱ्यांनाही ही सुविधा लागू असेल. जर तुमचं कोणत्याच बँकेत खातं नसेल तर रिझव्र्ह बँकेने जारी केलेला नोटा बदली फॉर्म भरून सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड अशा आवश्यक कागदपत्रांसह बँकेत तुमची माहिती द्यावी लागेल. तिथे तुम्हाला नोटा बदलून मिळतील.
* ४ हजार रुपयांपर्यंतच्या रकमेच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊ शकता. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम तुम्हाला तुमच्याच बँक खात्यात जमा करावी लागेल.
* ज्यांच्याकडे बँक खाते नाही ते लोक मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यामार्फत नोटा बदलून घेऊ शकतात. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे त्यांची लेखी परवानगी असणं आवश्यक आहे.
* नोटा बदलण्यासाठी तुम्हीच बँकेत गेले पाहिजे, अशी सक्ती नाही. तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या प्रतिनिधीला परवानगी पत्र देऊन पाठवू शकता. प्रतिनिधीजवळ तुमचं एखादं ओळखपत्र असणंही गरजेचं आहे.
* बँकेत नोटा बदलून घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड अशी कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
* नोटा बदलताना काही अडचण आल्यास किंवा काही तक्रार असल्यास नागरिकwww.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात. शिवाय publicquery@rbi.org.in या ईमेलवर तुमची समस्या पाठवू शकता. किंवा ०२२-२२६०२२०१/०२२-२२६०२९४४ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
* जुन्या नोटा २४ नोव्हेंबपर्यंत बँका तसेच पोस्ट ऑफिसमध्ये बदलता येतील. त्यासाठी ४००० रुपयांची मर्यादा आहे. २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान ४,००० रुपयांहून अधिक मूल्याच्या नोटा जमा करता येतील. त्यासाठी आधार, मतदान ओळखपत्र तसेच पॅन कार्ड लागेल.
* १० नोव्हेंबरपासून बँकांच्या शाखा/पोस्ट ऑफिसमधून दिवसाला १०,००० रुपये व कमाल २०,००० रुपये आठवडय़ात विथ्ड्रॉल स्लिप अथवा धनादेश भरून काढता येतील.
* एटीएमवर १८ नोव्हेंबरपर्यंत प्रति दिन २००० रुपये तर १९ नोव्हेंबरनंतर दिवसाला ४००० रुपयेपर्यंत काढता येतील.
* खरेदी तसेच विविध देयकांसाठी आता ५०० व २००० रुपयांच्या नव्या नोटांद्वारेच व्यवहार करावे लागणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा