माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे प्रणेते पंडीत मदन मोहन मालवीय यांना बुधवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून यासंबंधी माहिती दिली. मालवीय यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. वाजपेयी यांचा गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे 'भारतरत्न' जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाजपेयी यांना 'भारतरत्न' देण्याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. केंद्रात सत्तापालट होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासूनच वाजपेयी यांना यंदा 'भारतरत्न' जाहीर होणार, या स्वरुपाची चर्चा सुरू झाली होती. २५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या वाजपेयी यांनी १९९८ ते २००४ या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषविले आहे. जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेले वाजपेयी यांनी केंद्रामध्ये विविध प्रकारची पदे सांभाळली आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासोबतच परराष्ट्रमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्त घेतलेल्या वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय ठरल्या आहेत.
पंडित मदन मोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते होते. जगातील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक सदस्य म्हणूनही मालवीय परिचित आहेत. राजकीय क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही कौतुकास्पद ठरते. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी दोन वेळा भूषविले होते. मालवीय यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर १८६१ असून, १२ नोव्हेंबर १९४६ रोजी त्यांचे निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा