Translate

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

कच्छ नहीं देखा ???

लाही लाही करणाऱ्या उन्हाचा सामना करत तुडूंब पावसात अदृश्य झालेलं कच्छचं वाळवंट हिवाळ्यात मिठानं उजळून निघतं. 200 वर्षांपूर्वी झालेल्या भीषण भूकंपानं कच्छचा उत्तर पूर्वेचा भाग समुद्रसपाटीपासून वर गेला. आणि तयार झालं मिठाचं वाळवंट.
गारठा वाढल्यावर परदेशी पक्षांनी तलाव नदी नाले समुद्रावर गर्दी करावी तसंच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या विस्तीर्ण खारट वाळवंटाला अनुभवण्यासाठी देश-विदेशातून लोकांची रीघ लागते. गुजरात टुरिझमकडून इथे रण उत्सव रंगतो आणि कच्छी हस्तकला, हस्तशिल्पाला जागतिक व्यासपीठ खुलं होतं.
पण सुरूवातीलाच तुम्हाला थोडं निराश करतो, इथे यायचं असेल तर खिसा थोडासा गरम ठेवा. कारण भूजपासून 80 किमीपर्यंत धोरडो गावाजवळच्या रण उत्सवला येण्यासाठी गुजरात सरकारची एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रायव्हेट गाडीवाले तुमच्याकडे अगदी 2 हजाराची मागणी करू शकतात. बार्गेनिंग करत करत तुम्ही त्यांना फार तर हजार बाराशेपर्यंत आणू शकता. पण फक्त तिथे जाण्यासाठी 1200 रुपये देणं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. शिवाय ओला उबेर किंवा तत्सम वाहतुकीचं कुठलंही अॅप इथे निकामी आहे. मोदींनी करोडो रुपये नुसता अमिताभ बच्चनला घेऊन रणच्या जाहिरातीवर खर्च केलाय. दोन बस सोडायला काही अवघड नव्हतं. एकही बस न सोडण्यामागे मोदींचा गुजराती दिमाग असू शकतो. पण सर्वसामान्य लोकांना रणला जाणं तसं अवघडंच आहे.
असो, तरीही तुम्ही हजार बाराशेची गाडी करून गेलात. किंवा रेन्टवर मिळणाऱ्या बाईक घेऊन गेलात तर भूज ते कच्छचं रण हा रस्ता तुम्ही दीड दोन तासात सहज पूर्ण करता. 100 रुपयांचा गेटपास घेऊन आत प्रवेश मिळतो. गेटपाससाठी तुम्हाला कुठलाही फोटो आयडी सोबत ठेवावा लागतो. हा सगळा परिसर सैन्यदलाच्या अखत्यारित येतो. आतमध्ये प्रवेश केल्यावर अथांग शुभ्रदलदलीचा प्रदेश आपल्या नजरेस पडतो. हेच कच्छचं रण. एका टोकावर हा पांढरा शुभ्र वाळवंट आणि आकाशातली ढग शेजारी बसून गप्पा मारतात की काय असा भास होतो.
कच्छचं हे रण फक्त पर्यटकांचंच आकर्षण आहे असं नाही. गेल्या 200 वर्षात मिठाची शेती हा एक मोठा उद्योग इथे उभा राहिलाय. नोव्हेंबरपासून इथल्या आदिवासींकडून मिठाची शेती पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहते. इथूनच भारताला एकूण मिठाच्या 75 टक्के मिठ मिळतं. देशाविदेशातून येणाऱ्या विविध प्राण्यांसाठी कच्छचं रण हे आपलं माहेरासारखं आहे. विविध पक्षांचे थवे ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान कच्छच्या किनाऱ्यावर आपली घरं बनवतात.
रणच्या वाळवंटात संध्याकाळ आणखीच शूभ्रधवल होते. सोनेरी किरणांनी निरोप घेणारा सूर्य इथल्या मिठाची गळाभेट घेत असतो. कुठल्यातरी कोपऱ्यात कच्छी संस्कृतीचे स्वर कानी पडत असतात. तर दुसरीकडे रास गरबा खेळणारी मंडळी. जगात आनंद खूप स्वस्त आहे. तो फक्त घेता आला पाहिजे. हा अनुभव कितीही पैसे देऊन जगात कुठेच विकत घेतला जाऊ शकत नाही. तो गोड अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या खारट वाळवंटावरच यावं लागतं.
अंधार पडल्यावर घोडागाडी, उंटगाड्यांची लगबग वाढते. उदास खिन्न मन तिथून बाहेर पडायला तयार नसतं. पण जड पावलांनी आपल्याला तिथून बाहेर पडावंच लागतं. असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा मंद शीतल प्रकाशामुळे इथले मिठाचे कण लखलखतात. पण दुर्दैवानं तो अनुभव घेता आला नाही. तसंही अपूर्णता हवीच, पुन्हा येण्यासाठीचं ते निमंत्रण असतं.
काला डुंगर. आपण त्याला डोंगर म्हणूयात. पण हा डोंगर रहस्यमयी आहे. एकतर इथून तुम्हाला समुद्र दिसतो, मिठाचं वाळवंट दिसतं, घनदाट वनराईचं जंगल दिसतं आणि त्यावर सुवर्णलेप म्हणजे तुम्ही कच्छच्या सर्वात उंच डोंगरावर उभे असता. हाच काला डुंगर. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर इथून फक्त 70 किमी आहे. दुर्बिणीतून तुम्ही थेट बॉर्डरची सैर करून येता. इथूनच तुम्हाला जगातला शेवटचा पूलही दिसतो. असं म्हणतात की दत्तात्रेयांचं काही काळ इथे वास्तव्य होतं. इथल्या मंदिरात दोन वेळा लांडग्यांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. मघाशी मी रहस्यमयी हा शब्द का वापरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारणही ऐका. हा डोंगर सर करताना एका ठिकाणी मॅग्नेटिक पॉईन्ट लागतो. या पॉईन्टवर गाडी आली की ती बंद करायची तरीही तुमची गाडी किमान 20 च्या स्पीडनं उंच डोंगर चढू लागते. आहे की नाही कमाल!
भूज शहर हे ऐतिहासिक आणि सुखी संपन्न आणि समाधानी लोकांचं शहर आहे. इथे कुणालाही घाई नाही. खासकरून मुंबईसारख्या शहरातून आलेल्या लोकांना इथलं आयुष्य संथ वाटू शकतं. पण तसंही धावपळ करून आपण तरी काय मिळवलं? असा प्रश्न आपसूक पडतो. हा शांतपणा सुखावणारा आहे. भूजमधला आईना महल आणि प्राग महल इथल्या राजेशाहीचा इतिहास जिवंत ठेऊन आहेत. स्वातंत्र्यानंतर राजेशाही संपुष्टात आली पण आजही इथल्या लोकांच्या मनात राजाविषयीचा आदर कायम आहे. इथलं स्वामीनारायण मंदिर सुंदरतेचा, कलेचा आणि भावभक्तीचा अनोखा मिलाफ आहे. भूजमधलं म्युझियम तर देखणं आहे. भूकंपाचे असंख्य हादरे सोसणारं भूज कसं बदलत गेलं ते म्युझियममध्ये बघायला मिळतं. भूज शहरावर भूकंपाच्या त्या जखमा आजही दिसतात.
भूजपासून 10 किमीवरच्या भुजोडी गावात हॅन्डलूमच्या वस्तू बनतात. अख्खं गाव त्यासाठीच प्रसिद्ध आहे इथल्या चादरी, बॅग्ज आणि खासकरून बांधणी वस्त्राची वीण अधिक घट्ट आहे. थोड पुढे गेलात तर अजरखपूर लागतं. इथल्या नैसर्गिक रंगांच्या साड्या, दुपट्टे जगात प्रसिद्ध आहे. इथल्या आदरातिथ्य आणि प्रेमाचा स्वाद कच्छच्या खाण्यात उतरलाय. भरपूर तेल्यातल्या मसालेदार भाज्या, जाडजूड तळलेल्या मिरच्या, मुगाची सात्विक खिचडी कढी आणि ताक. मन तृप्त होतं! मी पुन्हा भूजला जाईन तर ते खाण्यासाठीच.
या संपूर्ण प्रवासात मला अनेक नवीन मित्र भेटले. खरंतर मी बाहेर पडतो तेच मुळात नवीन लोकांचा शोध घेण्यासाठी. हे अनपेक्षित भेटलेले मित्र परत कदाचित आपल्याला कधीच भेटत नसतात पण त्यांच्या आठवणी छान असतात. देशी परदेशी लोकांसोबत बोलून आपल्याला आपला आवाका कळतो. लिफ्ट मागून मागून प्रवास करण्यात वेगळीच मजा आहे. ती अशा प्रवासांमधून मिळत जाते. कच्छनंही मला दोन दिवसात बरंच काही दिलं.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

काय आहे ऑक्सिटोसीन ?

ऑक्सिटोसीन हे एक संप्रेरक आहे. या औषधांचा वापर होतो तो मुख्यत्वे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी. प्रसूतीनंतर स्तनदा मातांसाठी... प्रसुतीनंतर ऑक्सिटोसीनचा डोस दिला की लगेच नवजात बाळाला अंगावर पाजता येत नाही. सुरुवातीला येणारं आईचं दूध फेकून मग काही काळानंतर बाळाला दूध पाजण्याची परवानगी देता येते. मात्र ऑक्सिटोसीनचा वापर गरोदर बायकांच्या प्रसूतीऐवजी इतर ठिकाणीच अवैधरित्या जास्त केला जातो. या अवैध वापरांपैकी ऑक्सिटोसीनचा थेट मानवी शरीरावर गैरवापर होतो तो वेश्यावस्तीत...


ऑक्सिटोसीन हे लालबत्ती परिसरात सर्वात उपयोगी म्हणून ओळखलं जाणारं औषध आहे...आशादर्पण या संस्थेतल्या अनेक कार्यकर्त्यांशी मी प्रत्यक्ष जाऊन बोलले... तेव्हा देवता या त्यांच्यातल्याच एका कार्यकर्तीने सांगितलं की फक्त शरीरावरचे उभार खुलवण्यासाठीच नाही, तर वेगवेगळ्या कारणांसाठी इथल्या स्त्रिया वेगवेगळी औषधं घेतात...तुम्ही नेमकी कोणती औषधं घेता आणि का घेता हे विचारल्यावर तोंडावर पदर ठेऊन त्या स्त्रिया सुरुवातीला माझ्याकडेच संशयाने बघायला लागल्या... मग म्हणाल्या "हमे तो ऐसी दवा लेने की जरुरत नही, हम है वैसे ठिक है ऐसे वो मेडिकलवालाच बोला...लेकीन, हमारेमें जो नयी लडकीयाँ है उनको ये दवायी दी जाती हैं...कोई कोई इंजेक्शन लेता हैं, कोई गोली लेता हैं...बोलते है रंग गोरा करने के लिये, छाती चौडी करने के लिये लेता हैं...हमें तो दवा का नाम नहीं पता लेकीन, बोलते है आयुर्वैदिक है ले लो कुछ नहीं होयेगा"...

शेवटच्या वाक्याला मी हादरलेच... कारण, ऑक्सिटोसीनचा प्रयोग करताना तो डोळे झाकून करता यावा यासाठी त्याला आयुर्वेदाच्या वेष्ठनातही गुंडाळलं जात होतं.

यानंतर ऑक्सिटोसीनची अधिक माहिती घेण्यासाठी मी गेले ते कर्करोग तज्ञ असलेल्या डॉ. सुभाषचंद्रा यांच्याकडे.. ऑक्सिटोसीन यांसारख्या संप्रेरकांनी होणाऱ्या कर्करोगावर डॉ. सुभाषचंद्रा या शास्त्रज्ञाने बराच अभ्यास केलाय. ते म्हणतात की " ऑक्सिटोसीनचा प्रयोग हे अडलेल्या गरोदर बाईसाठी वरदान आहे. मात्र, ते देखिल योग्य प्रमाणात दिलं गेलं तरच. मात्र, अवैधरित्या होणारा ऑक्सिटोसीनचा प्रयोग हा वेगाने कर्करोग पसरवणारा आहे. बऱ्याचदा ही औषधं वेगवेगळ्या नावांनी रिब्रँडिंग करुन विकली जातात. आयुर्वेदाच्या नावाखालीही खपवली जातात. पिटोसिन हा त्याचा एक प्रसिद्ध असणारा ब्रँड आहे"

मात्र, ऑक्सिटोसीनचं हे विष फक्त लालबत्तीतच पेरलं जातंय हा समज डॉ. सुभाषचंद्रांशी बोलल्यावर तुटला. कारण, याच ऑक्सिटोसीनमुळे आधी मैलभर लांब असणारा कॅन्सर आता हातभर अंतरावर आलाय.

एफडीएच्या आतापर्यंतच्या धाडींमध्ये या ऑक्सिटोसीनचा प्रयोग भाज्या, फळं आणि दूभत्या जनावरांवर झालेला दिसून आलाय आणि हे खुद्द एफडीएने देखिल मान्य केलंय. डॉ.सुभाषचंद्रा यांच्या म्हणण्यानुसार "ज्या भाज्या, जी फळं आणि जे दूध तुम्ही घरी विकत आणता तेव्हा त्याची स्वच्छता तपासता...मात्र, त्याच्या उत्पादनाच्या वेळीच त्यात विष मिसळलं गेलं असेल तर नुसती स्वच्छता काय कामाची... कर्करोगासंबंधात जे पेशंट येतात त्यांना कोणतं ना कोणतं व्यसन असणार हे आम्ही गृहित धरलेलंच असतं. पण, सध्या अशा पेशंटची संख्या वेगाने वाढतेय ज्यांनी कधी दारु, सिगारेट, तंबाखु, गुटखा, मावा यांना स्पर्शही केला नाही आणि तरी त्यांना कॅसर झालाय...यात महिलांची संख्या जास्त आहे"

ऑक्सिटोसीन अवैधरित्या कुठे कुठे वापरलं जातं?

फळं, भाज्या अकाली पिकवण्यासाठी, त्यांचा आकार आणि उत्पादन वाढवण्यासाठी हे इंजेक्शन अवैधरित्या वापरलं जातं.

दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी गायी-म्हशींवरही याचा प्रयोग होतो.

ऑक्सिटोसीनसारख्या संप्रेरकांचा प्रयोग केलेल्या भाज्या, फळं, दूध यांच्या सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता वाढते आणि वेश्यावस्तीत, लालबत्तींच्या उजेडात तर खुलेआम हेच इंजेक्शन देऊन कोवळे जीव अकाली प्रौढ केले जातात.

एवढं भयानक विष आणि त्याचा होणारा गैरवापर पाहता खरं तर ऑक्सिटोसीन खुलेआम विकण्यावर बंदी येणं आवश्यक आहे. आतापर्यंत सरकारच्या लेखी ऑक्सिटोसीन हे कर्नाटका अँन्टिबॉयोटिक्स या पब्लिक सेक्टरच्या कंपनीतच निर्माण होतं आणि तिथून हे देशभरातल्या रुग्णालयांना, प्रसुतीगृहांना वितरीत होतं. मात्र, ऑक्सिटोसीनचं रिब्रँडिंग सहज केलं गेलं आणि ते मेडिकल स्टोअरवर अवैधरित्या विकलंही गेलं. त्यानंतर भारत सरकारने या औषधाला एच या कँटेगिरीत टाकलं. एच वर्ग म्हणजे जी औषधं प्रिस्क्रीप्शन शिवाय देता येत नाहीत. मात्र, याच्या अवैध विक्रीला धरबंध राहिला नाही आणि भारत सरकारने आणखी एक परिपत्रक काढून ऑक्सिटोसीनची गणना एच वर्गातून कीढून एच वन या वर्गात केली. एच वन वर्गातील औषधे म्हणजे संवेदनशील ड्रग्ज...जे विकतांना त्याची नोंदणी होणं आवश्यक आहे, खरेदी करणाऱ्याचे नाव आणि खरेदीचे कारणही नोंद होणं गरजेचे आहे. अर्थातच एच वन वर्गातील औषधांसाठी डॉक्टरांची परवानगी गरजेची आहेच. पण, आजपर्यंत जे फाट्यावर मारले जातात तेच नियम अशी ज्यांची व्याख्या आहे तसेच नियम सध्या लागू आहेत.

भारत सरकारच्या परिपत्रकानुसार आजपर्यंत ऑक्सिटोसीन जे सामान्य मेडिकल दुकानांवर उपलब्ध होऊ शकत नव्हतं ते आता सहज उपलब्ध होईल. त्याच्या विक्रीवर बंधन असणार नाही. ऑक्सिटोसीनच्या विक्रीसाठी नियम मात्र असतील. मात्र, डॉक्टरांची परवानगी, प्रिस्क्रीप्शन, ऑक्सिटोसीन विकल्याची नोंदणी हे सर्व नियम आधीही धाब्यावर बसवले गेले आणि आताही ते तुडवलेच जातायेत... कोवळ्या जिवांना निब्बर करण्याची गेंड्यांची कातडी ज्यांच्याकडे आहे ते असले नियम पाळतायेत कशाला?

खरं तर ऑक्सिटोसीनच्या मेडिकल स्टोअरवरच्या विक्रीला ऑल इंडिया फुड अँन्ड ड्रग्ज लायसन होल्डर फाऊंडेशनने सुरुवातीपासूनच विरोध केला...मात्र, मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने मेडिकल स्टोअरवर या ड्रगच्या उपलब्धतेसाठी आग्रह धरला. तसंच, एकाच कंपनीकडून पुरवठा होत असल्याने प्रसूती गृहात, रुग्णालयात ऑक्सिटोसीनचा तुटवडा देखिल जाणवायला लागला. यासाठी नियम कठोर करुन ऑक्सिटोसीनच्या खुल्या विक्रीला परवानगी देण्यात आली.

मात्र, हे नियम कसे पायदळी तुडवले जातात ही बातमी करतेवेळी मी एक स्टिंग ऑपरेशन केलं...मुंबईतल्या सायन, परळ भागांतल्या अगदीच मोजक्या म्हणजे 5-6 मेडीकल स्टोअरवर मी गेले आणि तिथे ऑक्सिटोसीन मागितलं...अगदी तिसऱ्या प्रयत्नातच माझ्या हातात ऑक्सिटोसीनचं इंजेक्शन होतं. हे इंजेक्शन विकत घेताना मला कुणीही माझं नाव-गांव विचारलं नाही. इतर कारणाची वगैरे चौकशी करण्याचा काही प्रश्नच नाही. हे औषध घेतांना माझ्याकडे डॉक्टरांचं प्रिस्क्रीप्शन आहे का हे ही कुणी तपासलं नाही. अगदी सहज एखादी डोकेदुखीची गोळी घ्यावी तसं हे ऑक्सिटोसीन नावाचं विष मला फक्त 17 रुपयांत विकण्यात आलं. इतर मेडिकल दुकानदारांनी स्टॉक तासाभरांत येईल असं सांगितलं, एकाने तर फक्त एक इंजेक्शन देणार नाही अख्खा खोकाच घ्यावा लागेल म्हटलं, एकाने मला होलसेलमध्ये खरेदी केली तर 10% सूट देण्याचंही कबुल केलं. तर एकाने, ऑक्सिटोसीन देईन पण विदाऊट बिल घ्यावं लागेल ते ही दुपारच्याच वेळेत असंही सांगितलं.

हा अनुभव घेऊन मी अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएकडे गेले...तिथल्या अमृत निखाडे या सहआयुक्तांना याबाबत माहिती दिली, त्यांनी तात्काळ सायनमधील मेडिकलवर कारवाईचे आदेश दिले...मात्र, आम्ही नियमांच्या अधीन राहूनच ऑक्सिटोसीनच्या अवैध विक्रीवर बंदी घालू असं ते म्हणाले.

या सगळ्यांतून माझ्या एकच लक्षात आलं ते म्हणजे ऑक्सिटोसीनचं हे मार्केट चालू ठेवणं ही काहींची गरज असावी...मी ऑक्सिटोसीन विरोधात काम करणाऱ्या ऑल इंडिया फूड अँन्ड ड्रग्ज लायसन होल्डर फाऊंडेशनच्या अध्यक्षांना अभय पांडेंना भेटले. त्यांच्या म्हणण्यानुसार " ऑक्सिटोसीनवर काढलेलं नवं परिपत्रक आणि एच वन वर्गात केलेला समावेश ही केवळ एक भलावण आहे. प्रत्यक्षात या ऑक्सिटोसीनच्या अवैध व्यापाराचा भाग असणारे अनेकजण या रॅकेटमध्ये आहेत. जेव्हा सरकारने हे परिपत्रक काढलं आणि जाहीर केलं की ऑक्सिटोसीन आता नियमांच्या अधीन राहून खुलेपणाने मेडिकल स्टोअरवर विकता येईल तेव्हा त्या पत्रकात लोकांच्या, संस्थांच्या हरकती, सूचनाही मागवल्या गेल्या. मात्र, या हरकती, सूचनांसाठी केवळ सात दिवसांचीच मुदत देण्यात आली. या सात दिवसांतले चार दिवस सार्वजनिक सुट्टीचे होते"  यावरुन खरोखरंच सरकारला आणि प्रशासनाला ऑक्सिटोसीनबाबत किती गांभीर्य आहे हे लक्षात येतं.

सध्या ऑक्सिटोसीनचं हे विष खुलेआम फक्त सतरा रुपयांत विकलं जातंय. निव्वळ सतरा रुपयांत रोजचा भाजीपाला, फळं यात विष पेरुन अनेकजण लाखोंचा नफा कमावतायेत. निव्वळ 17 रुपयांत दुभत्या गायी-म्हशींना क्षमतेपेक्षा जास्त पिळून घेतलं जातंय आणि दूधातून ऑक्सिटोसीनचं विष घराघरात पोहोचवलं जातंय. पोटाची खळगी भरण्यासाठी देहाचा खेळ मांडणाऱ्या स्त्री देहावर वासनांचे किळसवाणे उभार आणले जातायेत. ते ही फक्त सतरा रुपयांत. कणाकणाने जवळ येणाऱ्या मरणाची, शरीरात भीनत जाणाऱ्या विषाची, चेहऱ्यावरच्या हरवलेल्या निरागसतेची, कोवळ्या उमलत्या शरीरांची आणि अखेर निब्बर झालेल्या कातडीचीविझत जाणाऱ्या डोळ्यांची किंमत आहे फक्त सतरा रुपये.