Translate

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

गजानन दिगंबर माडगूळकर

1 ऑक्टोबर, साल 1919. माणदेशातील एक दुर्गम, दुष्काळी व दारिद्र्याने पिचलेले एक खेडेगाव शेटफळ गावच्या कुलकर्ण्यांची सून घरी बाळंतपणासाठी आलेली. गावात कुठलीच वैद्यकीय सुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता. संध्याकाळी गावच्या सुईणीने मोठ्या मुश्किलीने सुनेची सुटका केली. मुलगा झाला म्हणून सर्वांना आनंदही झाला. पण बाळ काही रडेना. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी. कितीतरी वेळ ते बाळ निपचित पडून होते. अनुभवी बायका अनेक प्रकार करून त्या बाळाला जागे करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण ते बाळ कोणताच प्रतिसाद देत नव्हते. अशा स्थितीतच काही तास गेले. कुणीतरी जवळच्या गावातील वैद्यांना बोलावून आणले. त्यांनी नाडी पाहिली. बाळाचा श्वासोश्वासही त्यांना जाणवेना. त्यांनी त्या दुर्दैवी बालकाला मृत घोषित केले. त्या घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरामागच्या परसात खड्डा काढला गेला. आई काही आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती. पण तिच्या वडिलांनी ते बाळ आपल्या हातात घेतले आणि सर्वजण घरामागे त्या बालकाच्या अंत्यविधीसाठी निघाले. इतक्यात त्या म्हाताऱ्या सुईणीने त्यांना क्षणभर थांबण्याची विनंती केली. ती उठली. बाळंतिणीच्या बाजेखालील कोळश्याच्या शेगडीतला एक रसरसता निखारा तिने हातात घेतला आणि नुकत्याच जन्मलेल्या त्या बाळाच्या बेंबीजवळ चटका दिला. आणि काय आश्चर्य, निखाऱ्याने भाजलेले ते बाळ कळवळून रडले. आईच्या अंगावर तर काटाच आला, काही क्षणांचाच फरक, नाहीतर सारेच संपणार होते. 

त्या बाळाच्या आईइतकीच तमाम मराठी जनताही त्या सुईणीचे ऋण विसरू शकणार नाही. कारण जन्मजात मृत घोषित केलेल्या त्या बाळाने मराठी भाषेलाच नवसंजीवनी दिली. महाराष्ट्र शारदेचा मंडप भान हरपून नाचून गाऊन जगता ठेवणारे ते बाळ म्हणजे महाराष्ट्रवाल्मिकी महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर...........

आज त्यांच्या जन्मदिनी या महाकवीला शतशः प्रणाम.

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

अँड्रॉईड ‘ओ’ 8.0 (ओरिओ)

अँड्रॉईड ‘ओ’ 8.0 चं अखेर नामकरण करण्यात आलं आहे. जगातील नंबर वन ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉईडचं पुढचं व्हर्जन ‘ओरिओ’ या नावाने ओळखलं जाणार आहे. हे सर्वात वेगवान आणि स्मार्ट व्हर्जन असेल, असं गुगलने म्हटलं आहे. तिचे उदघाटन दि. २१ ऑगस्ट २०१७ च्या रात्री १२.१० ला झाले. 
अँड्रॉइडच्या ‘ओ’ आवृत्तीचे सर्व फीचर्स आधीच जाहीर करण्यात आले होते, मात्र त्याचं नाव अद्याप जाहीर न झाल्याने अँड्रॉईड यूझर्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. अखेर ओरिओ या नामकरणामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बॅटरी लाईफ, स्पीड आणि सिक्युरिटी या तीन गोष्टींवर नव्या आवृत्तीत भर देण्यात आला आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच अँड्रॉइड ‘ओ’चा पहिला प्रिव्ह्यू सादर करण्यात आला होता. यानंतर मे महिन्यात झालेल्या गुगलच्या परिषदेत या प्रणालीचं सादरीकरण करण्यात आलं. गुगल पिक्सल फोन, गुगल पिक्सल एक्सएल, गुगल पिक्सल सी, गुगल नेक्सस 6 पी, गुगल नेक्सस 5 एक्स आणि नेक्सस प्लेअर या मॉडेल्समध्येच ही प्रणाली वापरता येत होती. 

ओरिओ म्हणजे काय?
ओरिओ हे एक बिस्कीट असून यात चॉकलेटच्या दोन चीप्समध्ये क्रीम भरलेलं असतं. जगातल्या बहुतांश देशांमध्ये ओरिओ हा ब्रँड प्रसिद्ध आहे.
स्वीट्सच्या नावांची परंपरा
अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना आजवर जगाच्या विविध भागात लोकप्रिय असणारे गोड पदार्थ, चॉकलेट्स, डेझर्टस् यांची नावे देण्यात आली आहेत. यात इंग्रजी अल्फाबेटनुसार पहिल्या दोन आवृत्तींना अल्फा आणि बीटा ही नाव देण्यात आली. त्यानंतर सी पासून कपकेक (1.5), डोनट (1.6), इक्लेअर्स (2.0, 2.1), फ्रोयो (2.2, 2.2.3), जिंजरब्रेड (2.3, 2.3.7), हनीकोंब (3.0 आणि 3.2.6), आईस्क्रिम सँडविच (4.0, 4.0.4), जेली बीन (4.1, 4.3.1), किटकॅट (4.4, 4.4.4 आणि 4.4W, 4W.2), लॉलिपॉप (5.0 आणि 5.1), मार्शमेलो (6.0) आणि नोगट (7.0). आता अँड्रॉइड ओ म्हणजेच 8.0 ही आवृत्ती ओरिओ या नावाने ओळखली जाणार आहे.