Translate

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

‘धरहरा टॉवर’ची कहाणी

‘धरहरा टॉवर’ची कहाणी

 नेपाळचे पहिले पंतप्रधान भीमसेन थापा यांनी आपल्या मुलीसाठी बांधलेला आणि आता भूकंपाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेल्या टॉवरची नेमकी कहाणी

‘धरहरा टॉवर’ काठमांडूची ओळखच. पण धरणीमाता कोपली आणि उरला फक्त दगडविटांचा ढिगारा.

नेपाळची ओळख असलेल्या धरहरा टॉवरच्या उभारणीची कहाणीही तितकीच विस्मयकारी आहे. ही कहाणी आहे नेपाळच्या पहिल्या पंतप्रधानांची. त्यांचं नाव होतं भीमसेन थापा.

भीमसेन थापा एका नेपाळी सैनिकाचे पुत्र होते. पण तेव्हाचे राजकुमार रणबहादुर थापाशी त्यांची पक्की मैत्री होती. याच मैत्रीनं भीमसेन थापा यांना नेपाळचा पहिला पंतप्रधान बनवलं.

पंतप्रधान बनल्यानंतर भीमसेन थापा यांनी 1826 साली आपल्या मुलीला एक अनोखी भेट दिली. ज्याचं नाव होतं भीमसेन मीनार अर्थात, धरहरा टॉवर

भीमसेन यांची कन्या याच टॉवरच्या शिड्यांवरून नवव्या मजल्यावर जात असे आणि अवघ्या काठमांडूचा नजारा पाहत असे. आपल्या मुलीला आपल्या पित्याच्या ताकदीचा गर्व होऊ नये यासाठी नवव्या मजल्यावर एक शिवलिंगही स्थापित करण्यात आलं होतं.

अनेक पर्यटकांनी याच टॉवरवरून काठमांडू आपल्या नजरेत साठवलं होतं. पण धरणीनं रौद्र रुप दाखवलं आणि 9 मजल्याचा टॉवर बनला फक्त मातीचा ढिगारा.

खरं तर भीमसेन यांनी असे दोन टॉवर बांधले होते. पण दोन्ही टॉवर 1934च्या भूकंपामध्ये जमीनदोस्त झाले.

तत्कालीन पंतप्रधानांनी त्यातला एक टॉवर पुन्हा बांधला आणि त्याचं नामकरण झालं धरहरा टॉवर. पण काळानं या टॉवरला पुन्हा कवेत घेतलं. शनिवारी सकाळी 160 पर्यटकांनी हा टॉवर पाहण्यासाठी तिकीट काढलं...

पण दि २५ एप्रिल २०१५ च्या  भूकंपाच्या एका झटक्यानं होत्याचं नव्हतं झालं. मीनार कोसळली. लोक मदतीसाठी धावले. पण मदतकार्य सुरु असताना पुन्हा एकदा उर्वरित भाग कोसळलाच.

2005 सालीच हा टॉवर पर्यटकांसाठी खुला झाला होता. पण 10 वर्षांच्या सेवेनंतर धरणीमातेनं त्याला पोटात घेतलं. उद्ध्वस्त झाला धरहरा टॉवर आणि काठमांडूचा गौरवही.

गेल्या तीन दशकांतील विनाशकारी भूकंप

*११ ऑगस्ट २०१२- इराणमधील तबरीझ शहराजवळ प्रत्येकी ६.३ व ६.४ क्षमतेच्या दोन भूकंपांमध्ये ३०६ ठार व ३ हजारांहून अधिक जखमी.

*११ मार्च २०११ - जपानच्या ईशान्य भागात सुनामीमुळे ९.० इतक्या प्रचंड क्षमतेच्या समुद्राखालील भूकंपामुळे १८,९०० लोक ठार. या भूकंपामुळे फुकुशिमा दाइची अणुभट्टीत आणीबाणीची स्थिती उद्भवली होती.

*२३ ऑक्टोबर २०११ - पूर्व तुर्कस्तानमध्ये ७.२ क्षमतेच्या भूकंपामुळे ६०० ठार व किमान ४,१५० जखमी.

*१२ जानेवारी २०१० - हैतीमध्ये ७.० क्षमतेच्या भूकंपाचा धक्का. यात अडीच ते तीन लाख लोकांचा बळी.

*१४ एप्रिल २०१० - वायव्य चीनच्या क्विंघाई प्रांतातील युशू परगण्यात ६.९ क्षमतेच्या भूकंपात ३००० लोक ठार व बेपत्ता.

*१२ मे २००८ - चीनच्या नैर्ऋत्य भागातील सिचुआन प्रांतात झालेल्या ८.० क्षमतेच्या भूकंपात ८७,००० लोक ठार किंवा बेपत्ता.

*२७ मे २००६ - इंडोनेशियाच्या योगकारता भागातील जोरदार भूकंपात ६ हजार लोक ठार व १५ लाख लोक बेघर.

*८ ऑक्टोबर २००५ - ७.६ क्षमतेच्या भूकंपात प्रामुख्याने पाकिस्तानचा वायव्य सीमा भाग आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ७५ हजारांहून अधिक लोक ठार व ३५ लाख लोक विस्थापित.

*२८ मार्च २००५ - सुमात्रानजीकच्या इंडोनेशियाच्या नीस बेटावरील भूकंपात ९०० ठार.

*२६ डिसेंबर २००४ - सुमात्रा बेटाच्या किनाऱ्यानजीकच्या समुद्राखालील प्रचंड भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीत इंडोनेशियातील १,६८,००० लोकांसह हिंदी महासागरालगतच्या देशांमधील २ लाख २० हजार लोक ठार.

*२६ डिसेंबर २००३ - इराणच्या बाम शहरात ६.७ क्षमतेच्या भूकंपात किमान ३१,१८४ लोक ठार व १८ हजार जखमी.

*२६ जानेवारी २००१ - गुजरातमध्ये ७.७ क्षमतेच्या भूकंपात २५ हजार लोक ठार व १,६६,००० जखमी.

*३० सप्टेंबर १९९३ - महाराष्ट्रातील किल्लारीनजीक ६.३ क्षमतेच्या भूकंपात ७,६०१ लोक ठार.

*२० ऑक्टोबर १९९१ - उत्तर प्रदेशातील हिमालयीन पायथ्याशी ६.६ क्षमतेच्या भूकंपात ७६८ लोक ठार.

*२० ऑगस्ट १९८८ - ६.८ क्षमतेच्या भूकंपात पूर्व नेपाळमध्ये ७२१, तर नजीकच्या बिहारमध्ये २७७ ठार.

*२८ ऑगस्ट १९७६ - उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील तांगशान येथे ७.८ क्षमतेच्या भूकंपात २,४२,००० लोक ठार झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे. मात्र काहीजणांच्या मते बळींचा आकडा याहून अधिक.