Translate

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

उन्हाळा आणि लघवीचा त्रास

'उन्हाळ्यात मुतखडय़ाचा त्रास अनेकांना उद्भवतो. लघवीतले क्षारांचे घटक, खर निघून जाण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मूत्रनलिकेत खडा अडकून पोट दुखण्याचा त्रास होऊ शकतो. २५ ते ५० वयोगटातल्या पुरूषांमध्ये प्रॉस्टेट ग्रंथींना सूज येऊन लघवीला आग आणि जळजळ होण्याची तक्रार दिसते. स्त्रियांमध्ये लघवीला आग होण्याबरोबरच ठणका लागणे, कळ येणे, क्वचित लघवीतून रक्त जाणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला बोली भाषेत 'उन्हाळी लागणे' असे म्हणतात. त्याबरोबर मूत्रमार्गाचा संसर्गही होऊ शकतो. लहान मुलांनाही 'शू'च्या जागी आग होण्याचा त्रास होतो. 
'उन्हाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असल्यामुळे भूक कमी होते. खाण्यात काही अबरचबर आले की पोट बिघडते. पोट बिघडले की लघवीच्या तक्रारीही वाढतात. आतडय़ात ई- कोलाय नावाचे जीवाणू असतात. पोट बिघडते तेव्हा हे जीवाणू उपद्रवी बनतात. या जीवाणूंनी उत्सर्जित केलेल्या विषारी द्रव्यांचा मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. मूत्रमार्गाला सूज आलेली असली तर त्या ठिकाणी जीवाणूंना वाढण्याची संधीच मिळते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठीही ते कारणीभूत ठरतात. 
प्रतिबंधासाठी- 
* पुरेसे पाणी पिणे अर्थातच गरजेचे. काहींना घाम अधिक येतो तर काहींना कमी. पण सर्वसाधारणपणे चोवीस तासांत शरीरात तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण कमीत कमी दोन ते अडीच लिटर असावे या हिशेबाने द्रवपदार्थ घ्यावेत. 
* माठातले वाळ्याचे पाणी प्यायले तरी चांगले. 
* शहाळ्याचे पाणी उत्तम
* नीरा देखील लघवी वाढवणारी असते परंतु ती शुद्ध असावी.
* कलिंगडाचा रस

डॉक्टरांकडे केव्हा जावे-
लघवीला होणारा त्रास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवलेले चांगले. उन्हाळी लागल्यावर काहींना लघवीतून रक्त जाण्यासारखे लक्षण दिसत असले तरी लघवीतून रक्त जाण्याची इतर कारणेही असू शकतात. त्रास नेमका कशामुळे होतो आहे याबद्दलची शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे जावे. मूत्रमार्गाचा संसर्ग असल्यास त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील.

जगातील पहिला स्वयंचलित व्हिडीओ कॅमेरा

भारतीय वंशाचे संगणक वैज्ञानिक श्री के. नायर यांनी कोलंबिया विद्यापीठातील संशोधन संस्थेत स्वयंचलित व्हिडीओ कॅमेऱ्याचा शोध लावला आहे. हा कॅमेरा स्वयंचलित असून तो वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाह्य़ विजेची गरज लागत नाही. अंतर्गत व्यवस्थेमध्ये देण्यात आलेल्या प्रणालीमधूनच ऊर्जानिर्मिती होऊन कॅमेरा काम करतो. 
सध्या आपण डिजिटल छायाचित्रण क्रांतीच्या मध्य युगात आहोत. स्वयंसिद्ध कॅमेरा विकसित करण्याचे आमचे ध्येय होते. कॅमेऱ्यामधून छायाचित्र काढणे हे जसे स्वयंचलित प्रणालीद्वारे होऊ शकते तशीच कॅमेरा वापरण्यासाठीची ऊर्जाही अंतर्गत प्रणालीद्वारे निर्माण होणे गरजेचे होते, असे मत नायर यांनी व्यक्त केले. नायर हे कोलंबिया विद्यापीठाच्या संगणक विभागातील प्रयोगशाळेचे प्रमुख आहेत. या कॅमेऱ्यामध्ये इमेज सेंसर वापरण्यात आला आहे. तसेच पिक्सेल्सची चीपही वापरण्यात आली आहे. यातील पिक्सेल हे फोटोडिओडचे असल्यामुळे ज्या वेळेस उजेड पडतो तेव्हा त्यात विद्युतप्रवाह निर्माण होतो. यामध्ये जे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये पडणाऱ्या उजेडाची घनता मोजण्याचीही क्षमता आहे. या प्रकल्पाचे ह्य़ुस्टन येथील राइस विद्यापीठात २४ ते २६ एप्रिलदरम्यान प्रथम सादरीकरण करण्यात येणार आहे.