Translate

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५

अँड्रॉईड हॅकर्स

सध्या जगभरात अँड्रॉईड फोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र त्याचवेळी हॅकर्सची संख्याही वाढतानाच दिसत आहे.

2014 पर्यंत जगभरात विक्री झालेल्या मोबाईल्सपैकी 80 टक्के मोबाईल अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे होते असं समोर आलं आहे. जगभरात अँड्रॉईड मोबाईल्सना ग्राहकांची पसंती असतानाच, हॅकर्सही या संख्येने मोठ्या असलेल्या युझर्सना गंडा घालण्याच्या तयारीत  आहेत.

तुम्हीही अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर तुमचा फोन आणि डेटा हॅकर्सपासून कसा सुरक्षित ठेवायचा? त्याबाबत काही टिप्स

हॅकर्सची अँड्रॉईडलाच पसंती का?

रशियाच्या एका सायबर सुरक्षा कंपनीच्या मते, हॅकर्स हॅकिंगबाबत विचार करताना तीन बाबींकडे लक्ष देतो

1 – सर्वाधिक मोबाईल युझर्स कोणती ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस) वापरतात
2 – ओएसच्या प्रोग्रामबाबत दस्ताऐवज उपलब्ध आहेत की नाही.
3 -  यामध्ये काही त्रुटी, कमतरता आहे की नाही.

अँड्रॉईड मोबाईलमध्ये सर्वाधिक अॅप डाऊनलोड आणि इंस्टॉल करता येतात. त्यामुळेही हॅकर्सनी अँड्रॉईड मोबाईल्सना लक्ष्य केलं आहे.

अँड्रॉईड मोबाईल अॅप


काळजीचं कारण का?

बँक अकाऊंटमधून पैसे चोरी, पर्सनल डेटा, फोटो, व्हिडीओ यांची चोरी करण्याचा हॅकर्सचा हेतू असतो. त्यामुळेच सायबर सुरक्षा तज्ज्ञांसाठी ही डोकीदुखी ठरली आहे.

कॅमेरा आणि माईकद्वारेही हॅकिंग?

कॅमेरा, माईक यासारख्या फिचर्सद्वारेही अँड्रॉईड मोबाईल हॅक केले जाऊ शकतात, असं मोबाईल सुरक्षा कंपनी कूलस्पॅनचे सीईओ ग्रेग स्मिथ यांनी 2013 मध्ये फोर्ब्सला सांगितलं होतं. चिंतेची बाब म्हणजे यासारखे हॅकिंग टूल सहजासहजी ऑनलाईन उपलब्ध आहेत.

काही सॉफ्टवेअर जे अॅपसारखी दिसतात, त्याद्वारे अनेक अँड्रॉईड युझर्सना गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे असे सॉफ्टवेअर्सही मोफत उपलब्ध आहेत.

कोणत्या अॅपचा धोका?

तुमचे SMS वाचणारे, तुमच्या खर्चाच्या हप्त्यांचे SMS पाठवणारे अॅप धोकादायक आहेत.  त्यांची संख्या सध्या वाढत आहे. मात्र आता हॅकर्स तुमच्या फोनमधील बँक पासवर्ड चोरणारे बँकिंग अॅपही बनवत असल्याचं समोर आलं आहे.

हॅकर्स हे युझर्सना व्हायरसवाले अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळेच हॅकर्सचं काम सोपं होतं.

फ्री आणि अश्लिल व्हिडीओ अॅप

प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या फ्री आणि अश्लिल व्हिडीओसारख्या अॅपद्वारे हॅकर्स युझर्सना सहज गंडवू शकतात. यासारखे अॅप हे हॅकिंगसाठीच बनवले जात असल्याचंही सायबर सुरक्षा तज्ज्ञ सांगतात.

काय काळजी घ्यावी?

1. ‘काहीही’ डाऊनलोड करू नका

तुमच्या मोबाईलवरून कोणतंही अॅप डाऊनलोड करताना योग्य कंपनी आणि वेबसाईटवरूनच डाऊन करा. काही विशेष अॅप लाँच झाल्यानंतर आपल्यापैकी बहुतेकजण ते अॅप त्वरीत डाऊनलोड करतात. मात्र काही वेळा हॅकर्सनी रचलेली ती चाल असते. त्या अॅपद्वारे तुमचा फोन आणखी कोणी व्यक्ती वापरत असल्याचं तुम्हाला माहितही होणार नाही.

2. परमिशन/ परवानगी पेज लक्ष देऊन वाचा

कोणतंही अॅप डाऊनलोड करताना आपण बेधडक YES म्हणून अॅक्सेप्ट करतो. मात्र त्याआधी अॅपबाबत देण्यात आलेली पॉलिसी आपण अजिबात वाचत नाही.

काही अॅप तुमचं फोनबुक वाचण्याची परवानगी मागतं, मात्र आपण ते न वाचता YES म्हणतो, आणि तिथे फसवणूक होते. त्यामुळे असे अॅप इन्स्टॉल करू नका.

3. बॅकअप जरूर ठेवा

तुमच्या फोनमधील डाटाची जबाबदारी तुमचीच असते. त्यामुळे हा डाटा सांभाळून ठेवणे गरजेचं आहे. म्हणूनच या डाटाचा बॅकअप घेऊन ठेवा.

4. गुगल –फ्री अँड्रॉईडबाबत विचार करा

अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर ते गुगलसोबत करारबद्ध होतात, याची माहिती ग्राहकाला नसते.
कोणतंही त्रयस्त अॅप इन्स्टॉल न करणं हे ग्राहक/युझर्सच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मात्र थर्ड पार्टी अॅप/ त्रयस्त अॅप इन्स्टॉल करणे अँड्रॅईडमध्ये सहज सोपं असतं.

5. अपडेट करत राहा

कोणतंही एक सॉफ्टवेअर, अॅप हे एका दिवसात तयार होत नाही. त्याची सातत्याने चाचणी घ्यावी लागते. त्यामध्ये अनेकवेळा त्रुटीही असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही एखादं अॅप इन्स्टॉल केलं असेल,  आणि काही काळानंतर कंपनीला त्या अॅपबाबत त्रुटी आढळल्यास, कंपनी अपडेट जारी करतं.

हे अपडेट करणं आवश्यक आहे. अॅप अपडेट करणं मोफत आहे.

अँड्रॉईडचे विविध व्हर्जन पाहता, जुन्या ओएसच्या तुलनेत गुगलचं सध्याचं 5.0 लॉलीपॉप सर्वात सुरक्षित आहे. काही अँड्रॉईड कंपन्या अपडेट जारी करत नाहीत. त्यामुळे युझर्सना धोका असतो.

6. इन्क्रिप्शनचा वापर करा

तुमच्या फोनवर पूर्ण डिव्हाईस इन्क्रिप्शनचा वापर करा. सध्याच लाँच झालेल्या सॅमसंग, एलजी, एचटीसी, अॅपल आणि ब्लॅकबेरी स्मार्टफोनमध्ये (अॅपल आणि ब्लॅकबेरी अँड्रॉईडचा वापर करत नाही) याप्रकारची सुविधा आहे.

जर तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये अशी सुविधा नसेल तर इन्क्रिप्शन अॅपचा वापर करा.

7. असुरक्षित वाय-फायपासून सावधान

सध्या अनेक ठिकाणी वाय-फाय नेटवर्क उपलब्ध आहे. मात्र म्हणून त्याचा बेधडक वापर करू नका. त्याच्या सुरक्षिततेबाबतची योग्य माहिती तुम्हाला नसेल, तर फुकटचं वाय-फाय वापरू नका.

तसंच बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट/डेबिट कार्ड पासवर्ड याबाबतची माहिती सार्वजनिक वाय-फायवर शेअर करू नका.

8. अँटी व्हायरस आवश्य ठेवा

इंटरनेटचा वापर करताना फोन सुरक्षित ठेवण्यासाठी अँटी व्हायरस असणं आवश्यक आहे, याबाबतची माहिती सर्वांनाच आहे. हा अँटी व्हायरस वेळो-वेळी अपडेट करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे नव्या धोक्यांना सामोरं जाण्यास तुमचा अँटी व्हायरस सज्ज असेल.

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०१५

मुलाखतीची पूर्वतयारी

नोकरीसाठी अर्ज केलेल्या कंपनीतून अथवा कार्यालयातून मुलाखतीसाठी बोलावणे आल्यास आपण पाठवलेला रेझ्युमे कंपनीच्या पसंतीला उतरला आहे, असे मानायला हरकत नाही. प्रत्यक्ष नेमणूक होण्यासाठी मात्र मुलाखतीचा टप्पा यशस्वीपणे पार करणे आवश्यक असते. मुलाखतीच्या वेळेस जे मूलभूत प्रश्न विचारले जातात, त्याविषयी जाणून घेऊ या..

अननुभवी (फ्रेशर्स) उमेदवारांना विचारले जाणारे प्रश्न..
* कौटुंबिक पाश्र्वभूमी :
आई-वडील, भावंडे, घरातील इतर सदस्य यासंबंधीच्या माहितीवरून उमेदवार कोणत्या वातावरणात वाढला आहे, त्याला/तिला नोकरीची किती गरज आहे, याचा अंदाज घेतला जातो.
* शैक्षणिक पाश्र्वभूमी : शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले, यासंबंधी विचारणा होऊ शकते. विद्याशाखा अथवा स्पेशलायझेशनचा विषय निवडण्यामागचे कारण विचारले जाऊ शकते. शिक्षणात खंड पडला असेल तर त्यामागचे कारण कोणते, हेही ते जाणून घेतात. शिक्षण पूर्ण केल्याचा कालावधी आणि नोकरीसाठी केलेल्या अर्जात अधिक अंतर असेल तर या मधल्या कालखंडाचा उपयोग तुम्ही कसा केला याची माहिती
विचारली जाऊ शकते.
* स्वत:बद्दल सांगा : या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकदा फ्रेशर उमेदवार गोंधळतात. नोकरीचा पूर्वानुभव नसल्याने काय सांगायचे असे त्यांना वाटत असते. अशा वेळेस त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थाने, स्वत:ची महत्त्वाकांक्षा सांगून आपण या कंपनीसाठी कसे उपयुक्त ठरू शकतो हे कथन करणे अपेक्षित आहे.
* संगणकीय ज्ञान : संगणकाचा सफाईदार वापर करता येणे हे आजच्या घडीला उमेदवाराचे अत्यावश्यक कौशल्य मानले जाते. काही विशिष्ट प्रकारच्या पदांसाठी अर्ज केला असेल तर संगणकावर त्यासंबंधात प्रत्यक्ष कामही करून दाखवावे लागते. संगणक, िपट्ररच्या कार्यपद्धतीची जुजबी ओळख असावी लागते.
* संवाद कौशल्य : उमेदवाराची भाषा, संवाद कौशल्य तपासले जाते.
* लेखन कौशल्य : लेटर
ड्राफ्टिंग, कार्यालयीन पत्रव्यवहार व्यवस्थित हाताळता येईल का, याचा अंदाज घेतला जातो.
* संदर्भ : उमेदवाराची वर्तणूक, त्याचा स्वभाव, कार्यपद्धती, विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी संदर्भ (रेफरन्सेस) तसेच काही संपर्क क्रमांक उमेदवाराकडे मागितले जाऊ शकतात.
* संबंधित क्षेत्रातील सद्य घडामोडी : त्या कंपनीत अथवा संबंधित उद्योगक्षेत्रात घडलेल्या काही ठळक चालू घडामोडी, तत्संबंधी सरकारी नियम, कायदे याबद्दल विचारून उमेदवाराचे सामान्य ज्ञान तपासले जाते.

अनुभवी उमेदवारांना विचारले जाणारे प्रश्न..
अनुभवी उमेदवारांच्या बाबतीत काही गोष्टी गृहीत धरल्या जातात, उदा. संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य, कार्यक्षेत्राचे मूलभूत ज्ञान (संबंधित सरकारी कायदे, नियम, कागदोपत्री व्यवहार.) इत्यादी. अनुभवी उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, कौटुंबिक पाश्र्वभूमी, आवडीनिवडी यासंबंधीचेही प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आणखीही काही गोष्टींची पडताळणी केली जाते-
* रेझ्युमेत नमूद केल्यानुसार आधीच्या नोकरीतील अथवा नोकऱ्यांमधील त्यांच्या कामाचे स्वरूप काय होते, तसेच ग्राहक कंपन्या, पुरवठादार कंपन्या आणि सहकाऱ्यांविषयी विचारले जाते.
* नवीन नोकरी शोधण्याचे कारण जाणून घेतले जाते. आधीच्या नोकरीचा राजीनामा देताना किती दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे तसेच नोकरीत केव्हा रुजू होता येईल, याची विचारणा होते.
* तुम्ही रेझ्युमेत नमूद केलेली उल्लेखनीय कामगिरी, निभावलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांबद्दल सविस्तर माहिती विचारली जाते. यावरून या कामात तुमची भूमिका आणि योगदान नेमके कोणते आणि किती होते हे अजमावले जाते.
* 'रेझ्युमे'वर नजर फिरवल्यावर जर आधीच्या नोकऱ्यांचा कालावधी खूपच कमी आहे असे दिसून आले तर उमेदवार धरसोडवृत्तीचा व निवडीसाठी अयोग्य
मानला जातो.
* मुलाखत घेणारी कंपनी किंवा उद्योग हा तुमच्या सध्याच्या कंपनीचा स्पर्धक असेल तर कामकाजातील काही गुप्त ध्येयधोरणांबद्दल (पॉलिसी सिक्रेट्स) विचारणा होऊ शकते. यावर उमेदवाराचे उत्तर- ' नेमणुकीनंतर या गोष्टी मी नक्कीच बोलू शकेन' असे असायला हवे. कदाचित असे प्रश्न विचारून उमेदवाराची निष्ठा जोखण्याचा हेतू असू शकतो.
* सध्याच्या नोकरीत पार पाडत असलेल्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त नवीन कोणती आव्हाने स्वीकारायला आवडतील, असेही विचारले जाते.

आणखी काही महत्त्वाचे प्रश्न

*'रेझ्युमे'त नमूद केलेल्या विशेष छंदांबद्दल अथवा आवडीबद्दल जुजबी प्रश्न विचारले जाऊ शकतात..
* उमेदवार केव्हापासून नोकरीत रुजू होऊ शकतो, याची विचारणा होते.
* नजीकच्या भविष्यात उमेदवाराचे काय ध्येय आहे हे जाणून घेतले जाते. यावरून तुम्ही ही नोकरी सोडण्याची सोडण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज बांधला जातो.
* कामासाठी बाहेरगावी प्रवास करणे अपेक्षित असेल तर त्यासाठी उमेदवार तयार आहे का, हेही जाणून घेतात.