Translate

शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

औषधाविना उपचार : पाणी कसे व किती प्यावे?

कुणी सांगतं पाणी भरपूर प्या, कुणी सांगतं पाणी आवश्यक तेवढंच प्यायला हवं.. नेमकं काय करायचं? मुळात पाणी कशासाठी प्यायचं? घरच्याघरी साध्या सोप्या पद्धतीने पाणी शुद्ध कसं करून घ्यायचं?

आपल्या सृष्टीत सर्वच जीवांकरता, वनस्पती विश्वासकट सर्वच प्राणिमात्रांकरता दैनंदिन जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रकारांनी पाण्याचे महत्त्व 'आश्वासकराणां श्रेष्ठम्' असे अत्यंत समर्पकपणे वर्णन केले आहे. आपणाला जगायचे असेल तर किमान तीन मूलभूत गरजा- हवा, पाणी व अन्न- आवश्यक असते. दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण आली तर आपणास एखादा मार्गदर्शक, आपले वडीलधारे, जवळचे मित्र आपणास 'तू भिऊ नकोस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत,' असे आश्वासन देतात. तसेच पाण्याचे महत्त्व घोटभर पाणी पी या सहज प्रेरणेने सगळय़ांनाच तत्क्षणी दिलासा देणारे आहे. एकवेळ अन्न नसले तरी चालते, पण तुम्हा-आम्हाला प्यायला पाणी हवेच.
शास्त्रकारांनी या द्रवद्रव्याचा फार बारकाईने विचार केला आहे. अष्टांगहृदयकार वाग्भटाचार्य सू.अ. ५ मध्ये 'आकाशात पतितं तोयम्;' आकाशात पडणाऱ्या पाण्याचे, अंतरिक्ष जगाचे विस्ताराने वर्णन केले आहे. जगभर मानवी जीवनाला शुद्धच पाणी मिळावे म्हणून पाणी शुद्ध करण्याचे, शुद्धच पाणी पुरवठय़ाचे २४ तास प्रयत्न चालू असतात.
शरद ऋतूमध्ये आकाश स्वच्छ असते. वातावरणात धूळ अजिबात नसते. या काळातील पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध जल होय. त्याला 'अमृतजल' अशी संज्ञा आहे. ज्यांच्या निवासात, गच्चीत किंवा उंच इमारतीत टेरेसवर मोकळी जागा आहे, त्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात मोठय़ा भांडय़ांना स्वच्छ फडके बांधून ठेवावे. पावसाचे पडणारे पाणी साठवावे. ते कधीही खराब होत नाही. त्यामध्ये किडे, जंतू अजिबात नसतात. पावसाळय़ाच्या सुरुवातीच्या काळात हवेत खूपच धुळीचे कण असतात. त्यामुळे जून, जुलै या वर्षां ऋतूच्या काळात पडणाऱ्या पाण्याची व्यवस्थित शुद्धी करूनच ते वापरावे लागते. या पाण्याला आम्लविपाकी पाणी असे संबोधतात. जगभर आमांश, अॅमिबायसिस, पोटदुखी, अतिसार या रोगांनी लोक हैराण असतात. आपल्या प्रजेला सुरक्षित पाणी मिळावे म्हणून सर्वच शासनयंत्रणा आपापल्या परीने प्रयत्न करत असतातच. पण आपल्या स्वास्थ्याकरिता जे पाणी प्यावयाचे ते उकळून गार करून प्यावे हे मी सांगावयास नकोच. पण अशा उकळलेल्या पाण्यात आपल्या अपेक्षेप्रमाणे थोडी सुंठ पूड मिसळून पाणी पिण्याकरिता वापरले तर ते सर्वात आरोग्यदायी पाणी असेल.
आजकाल मोठय़ा संख्येने लोक पर्यटनाला जातात. लहान-मोठे प्रवास करतात, लडाख, काश्मीर, कैलास, मानस सरोवरासकट ट्रेकिंग यात्रा करतात. बाटलीबंद पाण्याचे प्रचंड प्रस्थ माजले आहे. त्याऐवजी नागरमोथा या वनस्पतीचे चूर्ण- एक लिटर पाण्याकरिता पाच ग्रॅम या हिशोबात वापर केला तर प्रवासात कसलेही पाणी मिळाले तरी 'वॉटरबोर्न' रोगांची चिंता बाळगावी लागणार नाही. नागरमोथ्याचे कंद पाणथळ जागी उगवतात. त्यांना एक विलक्षण सुगंध असतो. नागरमोथा चूर्ण उपलब्ध न झाल्यास आणखी एक प्रकारचे शुद्ध जल आपणास आपल्या घरी करता येईल. त्याचे नाव आहे 'सुधाजल.' लाईम वॉटर असा इंग्रजी शब्द आहे. दिवसाला आपणास किती पिण्याचे पाणी लागते त्या हिशोबाने हे सुरक्षित पाणी विनासायास, विनाखर्चाचे तयार करता येते. विविध रंगाची माती, चुना विकणाऱ्या दुकानातून खालच्या थरांत असणारी चुनखडी आणावी. ती विरी न गेलेली, स्पर्शाला थोडी गरम असलेली असावी. रात्री एक लिटर पाण्याकरिता १० ग्रॅम या हिशोबाने चुनखडी पण स्टीलच्या भांडय़ात भिजवावी. सकाळी ते पाणी स्वच्छ फडके, टिपकागद किंवा फिल्टर पेपरने गाळावे. खाली चुना येऊ देऊ नये. २०० मिलीच्या पाच बाटल्यांत भरावे. या बाटल्यांत मोकळी जागा ठेवू नये. असे पाणी कधीही खराब होत नाही. जगाच्या अंतापर्यंत ते टिकते. लहान मुलांच्या व महिलांच्या विविध विकारांत, वजन घटणे, गंडमाळा, भूक नसणे, वाढ न होणे, कॅन्सरसारख्या गाठीच्या विकारात असे पाणी विकारांना लवकरच काबूत आणते. सुरक्षित पाण्याचे अंतरिक्ष जल, सुंठ सिद्ध जल, नागरमोथा चूर्णयुक्त पाणी व चुन्याची निवळी यांचे प्रयोग दैनंदिन जीवनात जरूर करा, अनुभवा, अनेक रोगांपासून मुक्ती मिळवा. 
पाणी प्यावे? केव्हा, किती, कोणी? का?
प्रत्येक जीवमात्राला मग तो मनुष्य असो, पशू-पक्षी, लहान जनावरे, मासे, कीटक, मुंग्या या सर्वानाच कमी-अधिक प्रमाणात पाण्याची गरज असते. जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असले तरी मनुष्यमात्राच्या हिताकरिता व्यक्तीनुरूप, कथानुरूप, कालानुरूप, व्यवसायानुरूप कमी-जास्त रोग लक्षणांप्रमाणे किंवा खाण्यापिण्याच्या पद्धतीनुसार पाण्याची मात्रा घेण्याची पद्धत, काल हे नेहमीच विचारात घ्यायला लागते.
सर्वसामान्यपणे तहान लागली तरच पाणी प्यावे, हे तत्त्व सगळेच पाळतात. कडक उन्हाळा, ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू, मे महिना किंवा ऑक्टोबर महिना या काळात ठरवून पाणी प्यावे. ज्यांना वजन वाढवायचे आहे, जे कृश आहेत त्यांनी जेवणानंतर थोडय़ा वेळाने जरूर पाणी प्यावे. कृश व्यक्तीने जेवणाअगोदर किंवा जेवणामध्ये पाणी पिऊ नये. ज्यांना खूप बोलण्याचा व्यवसाय आहे, डोकेदुखी, चक्कर, पित्त होणे या तक्रारी आहेत, त्यांनी रात्री दहा-पंधरा चांगल्या दर्जाच्या मनुका, बिया काढून भिजत टाकाव्यात. सकाळी मनुका खाव्यात व वर ते पाणी प्यावे. कृश व हृदयरोगाच्या तक्रारी असणाऱ्यांनी या प्रकारेच दोन खजूर भिजत टाकून सकाळी त्याचे पाणी घ्यावे. त्यामुळे दुखण्याच्या तक्रारींकरिता इतर गोळय़ा घ्याव्या लागत नाहीत. कॉलरा, जुलाब, उलटय़ा या विकारात, शरीरातील ओलावा कमी झाला असल्यास पाणी, गूळ किंवा साखरपाणी काही काळ घ्यावे. स्थूल व्यक्तींनी शक्यतो पाणी कमी प्यावे. आपल्या शरीराचे बरेचसे वजन हे पाण्याचे असते. ज्यांना शोष पडतो, अशा स्थूल व्यक्तींनी जेवणाअगोदर पाणी प्यावे, त्यामुळे आहार कमी जातो, वजन वाढत नाही.
यकृताचे विकार, कावीळ, उदरविकार, जलोदर या विकारात पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी दूध, गोमूत्र, कोरफड रस असे पातळ पदार्थ घ्यावेत. जुनाट त्वचाविकार, कंड, इसब गजकर्ण, नायटा, पू वाहणे, व्रण, मधुमेहाच्या किंवा महारोगाचा जखमा, मधुमेह, स्थूल व्यक्तींचा रक्तदाब विकार, सूज, शय्यामूत्र, सर्दी पडसे या विकारात शक्यतो पाणी पिऊ नये. या विविध विकारात शरीराला पाण्याची गरज नसते. फाजील जलतत्त्वाने शरीरात पू तयार होतो. त्वचाविकार आणि जखमा सुकत नाहीत. संधिवात, आमवात, पाठ-कंबर-मान किंवा गुडघेदुखी या वात विकारात स्थूल व्यक्तींनी पाणी पिऊ नये. प्यावयाचे झाल्यास थोडे आणि सुंठचूर्ण मिश्रित पाणी प्यावे. पोटदुखी विकारात पोट केव्हा दुखते, या कालावर पाणी केव्हा प्यावे, किंवा पिऊ नये हे अवलंबून आहे. जेवणानंतर लगेचच पोट दुखत असेल किंवा रिकाम्यापोटी पोट दुखत असेल, तर पाणी पिऊ नये. प्रथम अन्नपचनाला, आतडय़ांत अन्न आपणहून सरकण्याची संधी द्यावी. जेवणानंतर तीन-चार तासाने पोट दुखत असेल तर पाणी जरूर प्यावे. क्रॉनिक रिनल फेल्युअर सी.आर.एफ्. या विकारात संपूर्ण दिवसात एकूण पाणी वा द्रव ५०० मिली. एवढेच प्यावे. 
लहान वयातच मुलांना चष्मा लागणे, वर्ष सहा महिन्यांनी चष्म्याचा नंबर वाढता असणे, ही मोठीच समस्या अनेक बालकांत दिसून येते आहे. ज्यांना चष्म्याचा नंबर कमी करावयाचा आहे, त्यांनी नाकाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. त्यामुळे डोळय़ाचा अश्रू मार्ग मोकळा राहतो. सुरुवातीला नाकाने पाणी पिणे जमले नाही तर चमच्याने नाकात पाणी सोडावे. मानवी तोंडापेक्षा नाक हा अवयव उत्तम फिल्टर आहे.
एकाएकी उसण भरणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, अस कळा येणे; तसेच खूप नाक वाहणे, अस सर्दी-पडसे होणे. या अनुक्रमे वात व कफप्रधान विकारांत, एकदम गरम-गरम पाणी, दरदरून घाम येईल अशा पद्धतीने पिणे हा एक 'अक्सर' इलाज आहे.
आपण अनुभवा, अनुभवाचा फायदा झाला तर इतरांना सांगा. शुभं भवतु!
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

सोमवार, ५ जानेवारी, २०१५

तारीख पे तारीख.............

पॅलेस्टिनला स्वतंत्र राज्याचा दर्जा देतानाच वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेम इस्रायलच्या ताब्यातून मुक्त करण्यासंबंधीचा जॉर्डनने मांडलेला ठराव नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने फेटाळला. ही समिती असते १५ सदस्यांची. त्यातले चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे कायमचे सदस्य. बाकीचे दोन वर्षांसाठी निवडले जातात. समितीत कोणताही ठराव मंजूर होण्यासाठी नऊ मते आवश्यक असतात; पण तीही पॅलेस्टिनला मिळू शकली नाहीत. चीन, फ्रान्स, रशिया, जॉर्डन, चाड, चिली, लक्झेम्बर्ग यांनी त्याला पािठबा दिला. अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली. हा ठराव हाणून पाडण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी झटून प्रयत्न करीत होते. त्यातूनही तो मंजूर होण्याची वेळ आलीच तर अमेरिका आपला नकाराधिकार वापरेल असेही जाहीर करण्यात आले होते. जॉर्डनने हा ठराव घाईगडबडीने आणला हे खरे. पॅलेस्टिनी नेतृत्वाच्या दबावाशिवाय हे झालेले नाही हेही खरे. नव्या वर्षांत आपण किमान सुरक्षा समितीपर्यंत तरी पोचावे ही पॅलेस्टिनी नेत्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली, पण त्याचा उपयोग मात्र काहीही झाला नाही. हा ठराव मंजूर झाला असता, तर तो इस्रायलने किती मान्य केला असता हा भाग आहेच. पण इस्रायलवर असा कोणताही दबाव आणणे मुळातच अमेरिकेला मान्य नव्हते. याचे कारण इस्रायल आणि अमेरिका यांच्या संबंधांत जेवढे आहे, तेवढेच ते इस्रायलच्या अंतर्गत राजकारणातही आहे. यंदा इस्रायलमध्ये निवडणुका होत आहेत आणि इस्रायलला ताब्यातील भूभाग सोडण्यास बाध्य करणारा ठराव मंजूर झाला असता तर सत्ताधारी पक्षाला दारुण पराभवाशिवाय अन्य काहीही दिसले नसते. केरी यांनी हा ठराव नामंजूर व्हावा यासाठी दोन दिवसांत विविध देशांच्या प्रतिनिधींना तेरा वेळा दूरध्वनी केला. इस्रायल आणि पॅलेस्टिन संघर्ष चच्रेतून, वाटाघाटींतून सुटावा अशी अमेरिकेची याबाबतची भूमिका आहे. त्यासाठी स्वत: केरी गेले अनेक महिने प्रयत्न करीत होते, पण त्याला यश आलेले नाही. ते येण्याची शक्यताही नाही. कारण मुळातच इस्रायल हा देश स्वत:चे राष्ट्र म्हणून जगण्याचा हक्क ठासून मांडत असताना दुसऱ्यालाही तो हक्क असू शकतो हे मानण्यासच तयार नाही. पॅलेस्टिनी स्वातंत्र्यवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया, त्यात मारले जाणारे निरपराध इस्रायली नागरिक यांच्या आडून इस्रायलची दडपशाही सुरू असते हे या संघर्षांतील एक वास्तव आहे. गेल्या वर्षीच्या जुलमध्ये संयुक्त राष्ट्रांनी एका ठरावाद्वारे या वास्तवालाच दुजोरा दिला होता. गाझामध्ये इस्रायलने जो 'गरजेपेक्षा अधिक बलप्रयोग' चालविला होता, त्याचा निषेध करणाऱ्या या ठरावाच्या बाजूने भारतही उभा राहिला होता. पॅलेस्टिनला स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचा दर्जा असता तर इस्रायलच्या कारवायांना सीमेपलीकडचा दहशतवाद असे म्हटले जाऊ शकले असते. असा दर्जा मिळावा यासाठी पॅलेस्टिन अथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि १९६७च्या सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने बळकावलेली गाझा पट्टी मिळून पॅलेस्टिन हे एक राष्ट्र व्हावे, असे त्यांचे स्वप्न आहे. मात्र पॅलेस्टिनच्या पदरात पडला तो केवळ संयुक्त राष्ट्रांच्या असदस्य निरीक्षक राष्ट्राचा दर्जा. या वर्षी पुन्हा एकदा पॅलेस्टिनला राष्ट्राचा दर्जा देण्यासंबंधीचा ठराव मांडण्यात येईल, असे ब्रिटनने म्हटले आहे. त्यातून काय हाती लागेल याबाबत पॅलेस्टिनी नेते साशंकच दिसतात. एकंदर संयुक्त राष्ट्रांची अवस्था ही 'दामिनी' चित्रपटातील त्या गाजलेल्या संवादात वर्णन केल्याप्रमाणे झालेली आहे. जेथे न्याय मिळत नाही, तर मिळते केवळ तारीख. पॅलेस्टिनलाही अशीच पुढची तारीख मिळाली आहे. तोवर त्या भागातील लोकांच्या नशिबात अन्यायाचेच साम्राज्य आहे.