आज जागतिक चिमणी दिन
चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे भ्रमणध्वनीचे मनोरे नव्हे, तर चिमण्यांचा अधिवास असणाऱ्या वृक्षांची होणारी कत्तल कारणीभूत आहे. चिमण्यांची संख्या कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जागतिक चिमणी दिवस सगळीकडे साजरा केला जातो, पण तिच्या कमी होण्यामागील मूळ कारणांकडे सर्वाचेच दुर्लक्ष असून त्याचे खापर मात्र भ्रमणध्वनी मनोऱ्यांवर फोडले जात आहे. त्याच चिमणीच्या नावावर कृत्रिम घरटी तयार करून त्याचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे.
बुलबूल पक्ष्यापेक्षा आकाराने थोडी लहान असलेली चिमणी भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशात आढळते. गेल्या काही वर्षांत शहरातूनच नव्हे, तर गावातूनही तिचे अस्तित्त्व नाहीसे होऊ लागले आहे. सुरुवातीच्या काळात भ्रमणध्वनीच्या मनोऱ्यातून निघणाऱ्या किरणांमुळे चिमण्या कमी होत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्या किरणांपेक्षाही चिमण्यांच्या अधिवासावर आलेली गदा तिच्या नष्टचर्यामागील मूळ कारण आहे. विकासाच्या दिशेने धावणाऱ्या शहरात झाडांची कत्तल करुन सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. खेडय़ातही मातीची व कौलारू घरे आता सिमेंटच्या घरात परावर्तित होत आहे. एकंदरीत चिमण्यांचा जो थोडाफार अधिवास गावांमध्ये शिल्लक होता तोही आता शहरी संस्कृतीत बदलत आहे. एका वेळी तीन ते चार अंडी देणाऱ्या चिमण्यांना मिलन काळात आंघोळीसाठी मातीची गरज असते, पण ती जागा आता सिमेंटने घेतली आहे. घरटी तयार करण्यासाठी त्यांना गवत आणि इतर नैसर्गिक काडीकचरा लागतो. तशी घरटी असतील तरच अंडय़ांसाठी लागणारे तापमान नियमन होते आणि प्रजननाचा दर वाढतो. गवत आणि हा काडीकचरा तिला मिळेनसा झाल्याने सिमेंटच्या घरातील वीज मोजणाऱ्या यंत्रावर किंवा सिमेंटच्या पानावर, असा कुठेतरी चिमण्या आसरा घेतात. तेथील तापमान त्यांना सहन होत नाही आणि झाले तरी उंचावरून पिले पडून बरेचदा मृत्युमुखी पडतात. रासायनिक प्रक्रियेतून जाणाऱ्या अन्नधान्याचाही चिमण्यांवर विपरीत परिणाम होतो. मुळातच या कारणांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. याउलट चिमण्यांचे अधिवास नष्ट होत आहे म्हणून तिला कृत्रिम अधिवास पुरवण्याच्या नादात अनेकांनी या कृत्रिम घरटय़ांचा व्यवसाय मात्र जोमात सुरू केला आहे. मात्र, त्यांनीच तिचा मूळ अधिवास परत मिळवून देण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही.
भारतात ७ प्रकारच्या चिमण्या
भारतात एकूण सात प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील आपल्या भागातील लाडकी चिमणी म्हणजे इंग्रजीत तिला ‘हाऊस स्पॅरो’ असे म्हणतात. ही भारतात सर्वत्र आढळते. ‘पासेरिडी’ कुळातील ही चिमणी आहे. आकार १४ ते १६ सेंटीमिटर आणि वनज २६ ते ३२ ग्रॅम असते. १९ ते २५ सेंटीमिटर पंखांचा विस्तार असतो.
पर्यावरण संतुलनासाठी महत्त्वाची
वर्षभर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायचा असेल, तर अंगणात वृक्षलागवड म्हणजेच, तिचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित राखणे गरजेचे आहे. कृत्रिम घरटी आवश्यकच असतील तर ती मातीची किंवा गवत आणि इतर नैसर्गिक कचऱ्यांपासून तयार केलेली असावी. पाणी आणि अन्न मातीच्या भांडय़ातच ठेवा आणि विशेष म्हणजे, चिमण्यांची घरटी घरात कुठे असतील, तर काढून फेकू नका. कारण, पर्यावरण संतुलनातील चिमण्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा