Translate

मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

लहान बाळांची काळजी

आयुष्यात नुसत्या उंची व वजनावर यशस्वी होता येत नाही. वजन हे वाढीचे परिमाण असू शकत नाही. बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे कान सूक्ष्म ऐकू येईल असे बनत आहेत का, सूक्ष्म वास त्याला येतो की नाही, त्याला चव कळते की नाही, त्याची जागरूकता किती आहे, त्याचे मल-मूत्र विसर्जन कसे आहे, याही गोष्टी तितक्‍याच महत्त्वाच्या असतात. त्यासाठी आईचे दूध तान्ह्या बाळाला द्यायला हवे. आईच्या दुधापाठोपाठ गाईचे दूध अप्रतिम समजले जाते.
अन्नामुळे शरीर तयार होते असे आपण म्हणतो. बाळाने शरीर नीट धरावे, त्याचा योग्य विकास व्हावा व बाळ पटपट मोठे व्हावे असे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येक वस्तूच्या वाढीचा एक ठराविक वेग असतो. त्या वेगापेक्षा अधिक वेगाची अपेक्षा करणे बरोबर नाही. त्याची योग्य वाढ होण्यासाठी शरीराची वाटचाल नैसर्गिक प्रकारे व्हावी. यासाठी जे इंधन म्हणजेच अन्न द्यावे लागते त्याचा विचार करायला हवा.
तीन महिन्यांत उंची वाढून आपले मूल सर्वांत स्मार्ट दिसावे हे म्हणणाऱ्यांनी रोपटे वाढत आहे का हे पाहण्यासाठी कुंडीत लावलेले रोप पुन्हा पुन्हा ओढून पाहण्यासारखे आहे. रोपाला भलतेच खत घातले तर नैसर्गिक वेगापेक्षा अधिक वेगाने वाढल्यासारखे दिसेलसुद्धा, पण त्याची ताकद कमी पडेल व त्याचा नाश होण्याची वेळही जवळ येईल. प्रत्येक गोष्टीचा काळ-काम-वेग ठरलेला असतो.
बाळ धष्ट-पुष्ट असावे, त्याची वाढ नीट असावी हे म्हणत असताना बहुतेक पालक बाळाची उंची व वजन मोजत राहतात. पण उंचीतील व वजनातील वाढ पुढे आयुष्यात नकोशी होणार आहे हेही लक्षात घ्यायला हवे. आयुष्यात नुसत्या उंची व वजनावर यशस्वी होता येत नाही. जपानी कुस्तीगीर आपले वजन कसे वाढेल याच्या प्रयत्नात असतात असे दिसते, पण हा अपवाद आहे. वजन हे वाढीचे परिमाण असू शकत नाही. बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे कान सूक्ष्म ऐकू येईल असे बनत आहेत का, सूक्ष्म वास त्याला येतो की नाही, त्याला चव कळते की नाही, त्याची जागरूकता किती आहे, त्याचे मल-मूत्र विसर्जन कसे आहे, याही गोष्टी तितक्‍याच महत्त्वाच्या असतात. म्हणून बाळाच्या आहाराची योजना करत सर्व गोष्टींची योजना करणे आवश्‍यक ठरते.
तान्ह्या बाळासाठी आईचे दूध हा सर्वांग परिपूर्ण आहार ठरतो. आईच्या दुधाला तोड नाही. आईचे दूध बाळाला पचत नाही असे सहसा होत नाही. बाळाला आईच्या दुधाची ऍलर्जी आहे असे म्हणून बऱ्याच वेळा बाळाला बनावटी दूध दिले जाते. नंतर जरा मुले मोठी झाली की दुधात अमुक घातल्याने स्मरणशक्‍ती वाढेल, तमुक घातल्याने उंची वाढेल, हे घातले की बुद्धी वाढेल असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. पण त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. स्पर्धेचे जग असले तरी प्रत्येकाला पहिले येता येत नाही. आणि मुख्य म्हणजे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यातच खरे यश असते; याही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात.
बोटाला थेंबभर मध लावून अधून मधून बालकाच्या जिभेवर चोळल्याने त्याच्या रक्‍तशुद्धीसाठी, रक्‍ताभिसरणासाठी मदत होते व त्याला मधाच्या चवीचाही आनंद मिळविता येतो. बाळाला आईचे दूध चालू असताना आईचा आहार सकस व षड्रसपूर्ण असावा, केवळ जिभेला चटकदार अन्न नसावे. आईच्या आहारात असे चटकदार अन्न असले तर बालकाचे पोट फुगणे, लाळ गळणे, उलटी होणे, शौचाला पांढरी होणे, शौचाला न होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे बालक आईचे स्तन्यपान करत असेपर्यंत मातृप्रेम पूर्णत्वाने विकसित असावे. स्वतःच्या चैनीसाठी पण बालकाच्या अकल्याणाचे असे काहीही हातून घडणार नाही यासाठी दक्ष असावे.
बाळाला आईचे दूध सोडल्यानंतर बाहेरचे दूध देण्याची सुरवात करताना त्यात साखर वगैरे मिसळण्याची गरज नसते. बालकाला बाहेरचे दूध सुरू केल्यावर त्याच्या वेळा ठराविक असाव्यात. बालकाला रोज नव्या नव्या चवीचे पदार्थ लागतात असे नव्हे. तेव्हा त्याला नको नको ते वेगवेगळे पदार्थ खायला देणे बरोबर नसते.
बाहेरचे दूध बाळाला पचत नाही असे होण्याचे कारण म्हणजे ते दूध भ्रष्ट असते. गाईला किंवा म्हशीला नको नको ते पदार्थ खाऊ घातलेले असतात. गायी-म्हशीपासून दूध थोडे जास्त यावे या हेतूने तिला हॉर्मोन्सची इंजेक्‍शन देण्यात येतात. तिला अति पौष्टिक आहार देण्यात येतो, जेणेकरून असे दूध बाळाला जड पडल्यामुळे पचत नाही. यावरचा सोपा इलाज असा की दुधाच्या पावपट पाणी, चिमूटभर सुंठीचे चूर्ण व चिमूटभर वावडिंग पूड टाकून मंद आचेवर उकळावे. वरून घातलेल्या पाण्याच्या यातील 20 टक्के पाणी उडून जाईपर्यंत (म्हणजे पाच टक्के पाणी आत राहील) दूध उकळावे. हे दूध गाळून घेऊन बाळाला पाजल्यास बहुतेक वेळा बाळाला पचते.
बाळाची वाढ नीट व्हावी या हेतूने बरेचसे चाटण्यासारखे पदार्थ बाळाला देण्यास सुचविण्यात येते. यापैकी कशाचा किती उपयोग होतो हे पाहण्यासाठी घरात एक डॉक्‍टर कायमसाठी हजर हवा म्हणजे ते मूल डॉक्‍टरचेच हवे. ज्याअर्थी बाळाला असे काही खाऊ घातलेले आहे त्याअर्थी त्याचा विकास उत्तम होत आहे असा भ्रम करून घेतला तर पुढे अडचण येऊ शकते. कशाची तरी पेस्ट करून बाळाला खाऊ घालणे बरोबर नसते.
बाळाचे उष्टावण वेळच्या वेळी व्हावे. बालकाच्या उष्टावणीच्या वेळीसुद्धा रव्याची दूध व साखर घालून केलेली खीर देण्याची पद्धत आहे. त्याला एकदम चिवडा-चकलीसारखे पदार्थ दिले जात नाहीत. उष्टावणीनंतर काही दिवसांनी बालकाला दात आल्यावर कडक असले तरी पटकन मोडले जाणारे खुसखुशीत पदार्थ दिले जावेत. जेणेकरून नव्याने आलेल्या दातांना, त्यांच्या मुळांना त्रास होणार नाही. बालकाचे अन्न हे चतुर्विध असावे असे सांगितलेले आहे, ज्यामुळे बाळाचे धातू पुष्ट होतात. असे असताना बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत त्याला मिक्‍सरमध्ये बारीक केलेले अन्न चमच्याने किंवा पातळ करून दुधाच्या बाटलीने देण्याने केवळ बाळाच्या प्रकृतीत बिघाड होऊ शकतो.
आईच्या दुधापाठोपाठ गाईचे दूध अप्रतिम समजले जाते. सध्या हेही सिद्ध झालेले आहे की दूध हे गीर, कांकरेज, पंढरपूर वगैरे देशी वंशाच्या गाईचे असावे. या गाईंना शक्‍यतो चारा खाऊ घातलेला असावा, तिला मीठ चाटवलेले असावे, कडबा दिला तरी तिच्या पोटाला भार होईल एवढ्या प्रमाणात दिलेला नसावा. अशा गाईचे दूध बालकाला सहज पचते, त्याच्या शरीराचाच विकास होण्याबरोबर त्याच्या मेंदूचा विकास योग्य होतो, त्याचा मेंदू संवेदनशील व उत्तम बौद्धिक क्षमता असणारा असतो.
नैसर्गिक वस्तूंमधून शरीराला लागणारे सर्व घटक मिळविणे ही प्रक्रिया लहान मुलांच्या अंगवळणी पडली की पुढे सुद्धा खाल्लेल्या पदार्थांमधून शरीराला आवश्‍यक असणारे घटक मिळत राहतात. अशी सवय नसली की म्हातारपणी त्रास होऊ शकतो. शरीरात अमुक व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, तमुक धातू कमी आहे असे लक्षात आल्याने आहाराचे नियोजन करणे कठीण होऊन बसते.

बहुउपयोगी एरंडेल

बहुउपयोगी एरंडेल
एरंडेल तेलाला अमृताची उपमा : 
एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.
.
कमला ( कावीळ ) :
सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.
शूल : 
पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.
संदिवात बरा होण्यास मदत :
- आमवात संधिवात
सांध्यांना विचंवाने दंश करावा अशा वेदना. हातापायाची हालचाल होत नाही. साध्यांना सूज, चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप असतो, कष्ट सहन होत नाहीत, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखाच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातपायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीहि बरे होण्यास फार मोठी मदत होते.
कंबरेचा व पाठीचा शूल :
कंबर वाकता येत नाही. पाठही दूखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेली एरंडमुळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.
गळवे :
अनेकांना गळवे होतात. लवकर फुटत नाहीत. गळवावर एरंडाची मुळी पाण्यात उगळावी व गरम करुन गळवावर लेप द्यावा. लेप सुकला म्हणजे एरंडाचे पान वर बांधावे. आराम वाटतो.
रक्तदोष :
अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे.
झोप येत नाही, डोके गरम - विकार: 
अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. डोके गरम राहते. टाळुचा भाब गरम होतो, डोक्यावर घण मारल्यासारखे होते, सारखे डोके दुखत असते, चैन पडत नाही, विचार मालिका सुरु झाली म्हणजे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे व तळपायांनाहि तेल लावावे व डोके, तळहात व तळपाय यांना एरंडाचे पान बांधवे. हि गोष्ट सातत्याने व्हावी. गुण खात्रीने येतो.
उदर :
हात, पाय, नाभी यांन सूज येते, सांधे ढिले पडतात. कंबरेपासून जड वाटते, पोट मोठे होते. अशावेळी ताजे गोमुत्र एक कप गाळुन घ्यावे व त्यात दोन तोळे एरंडेल तेल घालुन रोज घेत जावे म्हणजे जुलाब होऊन पोट साफ राहते व उदर बरा होण्यास मदत होते. 
वृषण वृद्धि : 
वृषणाची वृद्धि होते व हवेने भरलेल्या पिशवीसारखे वृषण लागते.या अवस्थेत सुरुवातीस एरंडेल तेलाचे सावकाश मसाज करावे व एरंडास पानतूप लावून वृषणास बांधून घट्ट पट्टा अगर लंगोट घालावा.
दमा : 
सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.
गंडमाळा : 
गळ्याभोवती गाठी उठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचित प्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.
ऋदयशूल :
पुष्कवेळा छातीत दुखण्याचा तक्रार असतात. सारखे बारीक छातीत दुखत असते. क्वचित बारीक कळा येतात. हे सर्व पोटातील वायुमुळे होण्याचा संभव बऱ्याच वेळा असतो. यावेळी एरंडाचा प्रथम जुलाब घ्यावा. नंतर एरंडमुळाचा काढा दोन गुंजा जवखार घालुन देत जावा. गर्भारशीबाईने नियमीतपणे एरंड तेल निदान चार दिवसांनी तरी घेत जावे. यामुळे सुलभ प्रसुती होते. 
पोटासंबंधी कोणत्याही विकारावर एरंडेल तेल हे एक रामबाण औषध आहे. अगदी लहान मुलांना (जन्माला आलेल्या बालकालासुद्धा) मध आणि एरंडेल तेल देतात. हे अत्यंत चांगले रेचक आहे. इंजिनाला ज्याप्रमाणे तेल घालून साफसूफ करतात त्याप्रमाणे एरंडेल तेलाच्या विरेचनाने साध्य होते.
ओठ फुटणे :
अनेक वेळा थंडीने किंवा उष्णतेने सुद्धा ओठांना भेगा पडतात. भेगा तडतडतात, रक्त येते. अश वेळी रात्री एरंड्या बारीक वाटुन त्यात थोडे दुध घालावे व ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम वाटतो.
पीनस :
नाक ओढल्यासारखे होते. नाकातून वारंवार पांढरा अगर धुम्रवर्ण कफ निघतो. श्वासाला दुर्गंधी येते. नाकातून रक्त पडते. वास येत नाही. अशा वेळी एरंडेल तेल व थोडे तूप एकत्र करुन नाकात वरचेवर घालीत जावे. 
खुपऱ्या :
डोळ्यात खुपऱ्या असतात. डोळे लाल होतात. पाणी येते. चिकटतात. लाल एरंडाचा चीक डोळ्यात घालीत जावा.
शरीरामध्ये होणाऱ्या कोणत्याही शुलावर एरंडाचा युक्तीने उपयोग करावा.
जुन्या संधिवाताचा त्रास :
तोळाभर एरंडमुळ, थोडे कुटुन अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा (मंदग्नीवर). तो गाळून त्यात अर्धा चमचा मध टाकुन ते प्यावे. त्याने सांध्याची सूज कमी होते. एरंडाचाई पाने वाटून गरम करऊन सुजेवर बांधावी किंवा आस्कंदाचे वस्त्रगाळ चूर्ण पावलीभार, सांजसकाळ ३ मासे तुपातून, चारच दिवस घ्या. संधिवातचे दुखणे आटोक्यात येईल. 
कावीळीवर उपयुक्त : एरंड :
एरंडाचे झाडे हे बहुतेक जागी आढळणारे आहे. याच्या बियापासून तेल काढले जाते. कुंपणासाठी व बहुधा पडिक जागेवर आढळणारे हे झाड तसे औषधोपयोगी आहे. एरंडाचा कावीळीवर फार चांगला उपयोग होतो. गोड्या एरंडाची पाने बारीक वाटून त्याची साधारण बोराएवढी गोळी करुन दुधात कालवून घ्यावी. एका आठवड्यात कावीळ बरी होते. अथवा एरंडाच्या पालाचा रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घ्यावा.

स्त्रि व अंगावर पांढरे जाणे.......

स्त्रि व अंगावर पांढरे जाणे
अंगावरून पांढरा स्त्राव जाणं म्हणजेच ल्यूकोरिया आणि यामुळेच योनीमार्गाचा बाहेरील भाग जास्त प्रमाणात ओला राहतो. हा पांढरा स्त्राव किंवा हा जादा ओलसरापणा कोणत्याही वयात होऊ शकतो. जन्माच्या पहिल्या दिवसापासूनही मुलीच्या अंगावर पांढर जात असल्याची उदारहरणं आढळत असतात. ज्या अर्भकाच्या अंगावर पांढरं जात असतं, तिची आई किंवा नर्स यांच्या ते लक्षात येऊ शकतं. चार पाच वर्षापर्यंतच्या मुलीच्या अंगावर जात असेल तर, तेही आई किंवा नर्सला समजू शकतं. कारण या वयापर्यंतच्या मुलीची अंघोळ, स्वच्छता त्याच करीत असतात. चौदा दिवसांपर्यंत ज्या मुलींच्या अंगावर जातं तो पांढरा स्त्राव जास्त चिकट असू शकतो. अर्थात हा स्त्राव लक्षात आल्यावर त्याची गंभीर दखल घेण्यासारखं काही नसतं. निर्जंतूक कापसाच्या बोळ्यानं तो अवयव स्वच्छ ठेवावा एवढी काळजी मात्र घ्यावी. इतर कोणत्याही उपचाराची आवश्यकता नाही. जवजात अर्भकाच्या अंगावर पांढरा स्त्राव जायचं कारण म्हणजे आईची हार्मोन्स अर्भकाच्या रक्तात मिसळतात.

पाच वर्षांवरची मुलगी, पांढरा स्त्राव होऊ लागला, तर त्याबद्दल आईला सांगू शकते. परंतु तरीसुद्धा वयाच्या बारा वर्षांपर्यंतच्या काही मुलींना डॉक्टरांकडे नेलं जातं. कारण या वयातही बऱ्याच मुली अशा स्त्रावाबद्दलची तक्रार करीत नाहीत. वाढत्या मुलींच्या बाबतीत असा स्त्राव जाऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. डॉक्टरांनी पूर्णपणे आतून तपासणी करणही काही वेळा आवश्यक असतं. कारण योनीमार्गात बियासारख्या वस्तू अडकलेल्या नाहीत ना याची खात्री करून घेता येते. शाळेतील मोठ्या मुली आणि लग्नाच्या आधीच्या मुली अंगावर जास्त पांढर जाण्याबद्दल तक्रार करतात. त्याची, लग्न झालेल्या स्त्रियांची तपासणी जशी करतात, तशी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. पांढरं जाण्याची काही कारणं लग्न झालेल्या आणि अविवाहित स्त्रियांच्या बाबतीत सारखी असू शकतात.
जास्त स्त्राव केव्हा होतो ?
कधी जास्त प्रमाणात अंगावर जाउ लागतं. तेही तसं त्यावेळेपुरतं नॉर्मलच असतं. हा काळ म्हणजे –
(१) वयात आल्याबरोबरचा काळ.
(२) मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी किंवा बंद होण्यापूर्वीचा काळ.
(३) दोन पाळ्यांमधील दोनतीन दिवसांचा काळ, यातला स्त्राव चिकट असतो.
(४) लैंगिक भावना उद्दीपित झाल्यावर किंवा समागम झाल्यानंतरचा काळ.
(५) गर्भारपणाचा काळ.
(६) बाळंतपणानंतरचा २ ते ४ आठवड्यांचा काळ ( म्हणजेच रक्तस्त्राव थांबल्यावर )
या काळातील अंगावर जाण्याचं प्रमाण जास्त नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. पण नंतर केव्हा डॉक्टरांकडे स्त्री जाईल तेंव्हा ती घटना त्यांच्या कानावर घालावी हे उत्तम.

स्त्रावाचे स्वरूप व कारणे
अंगावर जाण्याचं स्वरूप- म्हणजे कमी जास्त प्रमाण, कमी अधिक चिकटपणा, रंग स्त्रीनं डॉक्टरांना अचूक सांगण आवश्यक आहे. स्त्राव कधी पातळ, तर कधी चिकट, घट्ट, बारीकबारीक कणांच्या स्वरूपातही असू शकतो. अंगावर जात असताना इतर आणखी काही लक्षणे दिसत असतात. घाण वास येणं, कंबर दुखने, योनीमार्गाची जळजळ होणं, टोचत राहणं, योनी मार्गाच्या बाहेरचा भाग काहीवेळा ओला झालेला व सुजलेला आढळतो. अशा तऱ्हेच्या तक्रारी अचानक उद्भवतात असं वाटलं, तरी बहुतेकवेळा त्या खूप जुन्हाही असू शकतात. योनीमार्ग किंवा गर्भाशयमुखाशी जंतुसंसर्ग झाल्यामुळं अंगावर पांढरं जात असतं हे जंतू अत्यंत सूक्ष्म असतात. त्यात बुरशीचे जंतूही असतात हे जंतू एकमेकीत पसरायला वेळ लागत नाही. अस्वच्छ संडास, कमोड्स, मोरी किंवा एकच टॉवेल वापरणे यामुळे हे जंतू एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे जायला वेळ लागत नाही. समागमामुळेही हे जंतू पसरू शकतात आणि जंतूंचा प्राडूर्भाव वरचेवर होत राहतो. पुरुषातही हे जंतू जातात, पण सामान्यतः त्याची काहीच तक्रार नसते. बाळंतपणात योगीमार्ग योग्यपणे शिवला गेला नाही तर हे जंतू सहजपणे स्त्रीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. वाढत्या वयाच्या मुली आणि वयस्कर स्त्रियांकडून या अवयवांची नीट स्वच्छता राखली गेली नाही तर त्यांना या जंतूंचा बालपणीच संसर्ग होऊ शकतो. यासाठीच मुलांना गुदद्वार पुढच्या बाजून मागच्या बाजूला हात नेऊन धुण्याची शिकवण द्यावी. मागून, पुढे गुदद्वार धुण्याची पद्धत अयोग्य आहे. त्यामुळे मल कण पुढील भागात येऊन मूत्राशयात, योनीमार्गात जाण्याची शक्यता असते. योनीद्वारात जंतूंचा विशेषतः बुरशीच्या जंतूंचा संसर्ग हा सर्वसामान्यपणं गर्भारपणात होतो. तसंच मधुमेह असलेल्या स्त्रियांना किंवा लघवी वाटे साखर जाणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा जंतू संसर्ग गुप्तरोगामुळे होऊ शकतो. पेशंटनं जर सविस्तरपणे सर्व लक्षणं डॉक्टरांना सांगितली तर डॉक्टर तपासणी करून नेमकं कारण ठरवू शकतात. त्यामुळे त्यावर योग्य तो उपचारही करता येतो.

उपचार पद्धती
उपचार हा अर्थातच कारणांवर अवलंबून असतो. कधीकधी तोंडातून घ्यावयाच्या गोळ्या पतिपत्नी दोघांनाही घ्याव्या लागतात. तसंच दहा ते पंधरा दिवस समागमही टाळावा लागतो. याव्यतिरिक्त आणखी जे उपचार आहेत त्यात पेंट, गोळ्या किंवा मलम यांचा समावेश होत, ( या आत ठेवायच्या असतात ) पण याचवेळी मधुमेह वगैरेसारखे विकार ताब्यात ठेवणे अत्यावश्यक आहे. अंगावर जाणे हा विकार एकाच उपचाराने प्रत्येकवेळी नाहीसा करता येत नाही हे प्रत्येकीनं लक्षात ठेवायला हवं. त्यासाठी विविध चाचण्या घ्याव्या लागतात. या विकारासंबंधी इथं एक महत्त्वाचा इशारा देणं आवश्यक आहे. हा इशारा विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण, गरीब स्त्रियांना द्यायला हवा. या स्त्रिया नऊवारी साडी नेसत असतात.त्या काष्टा घालतात. त्यांना स्त्राव होतो. त्याकडे पांढरं जातं आहे म्हणून दुर्लक्ष करतात. त्यांचे साडीवर पडणाऱ्या डागाकडे लक्ष नसते. त्यात रक्ताचाही अंश असण्याची शक्यता असते, ते केवल पांढरं जाणं नसतं. काष्ट्यामुळे तिकडे लक्ष जात नसतं आणि समजतही नसतं, जर स्त्रावातून रक्ताचा अंश जात असेल तर गर्भाशयाच्या कॅन्सरची दाट शक्यता असते आणि त्या डागांकडे बऱ्याच काळपर्यंत दुर्लक्ष झाल्यामुळं हा कॅन्सर प्रगत आणि बरा न होण्याची पायरी गाठतो. नेहमीपेक्षा केवळ जास्त प्रमाणात अंगावर जात आहे अशी समजूत स्त्रियांची होत असल्याने कॅन्सर प्राथमिक अवस्थेत उघडकीला येऊ शकत नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं याक्डे दुर्लक्ष न करणं तिच्याचं हिताच आहे.

लठ्ठपणा....

स्त्रियांमधील लठ्ठपणा
वयाच्या तिसीनंतर वजन स्थिर असणे हे योग्य वजन होय. लठ्ठपणा म्हणजे नेमके काय ? उंचीच्या प्रमाणपेक्ष शारीरिक वजन वाढणे आणि प्रामुख्याने शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे. थोडक्यात शरीर अति गुटगुटीत दिसू लागते; की जे दिसावयास बरे दिसत नाही- आणि तसे असणे मानसिक व शारीरिक आरोग्याचे दृष्टीनेही गैर असते.आपल्या शरीतात जे चरबीचे प्रमाण असते ते वय, लिंग व शारीरिक श्रम यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जन्मतः १२ टक्के वजन चरबीचे असते. बाळ ६ महिन्याचे होते तेव्हा ते ३० टक्क्यांपर्यंत वाढते आणि नंतर हळूहळू घटत जाऊन वयाच्या १० व्या वर्षी ते साधारणपणे १८ टक्क्यांवर येते. मुली वयात येतात तेव्हा त्या प्रमाणात बरीच वाढ होते. वयाच्या १८ व्या वर्षी पुरुषात हे प्रमाण १५ ते १८ टक्के, तर स्त्रियामध्ये ते २० ते २५ टक्के वाढते. आणि पुढे ते साधारण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढते.

शरीरातील घटकांचे प्रमान शरीर कष्टांवर बरेचसे अवलंबून असते. जेव्हा शारीरिक श्रम सुरू असतात तेव्हा चरबी घटते आणि पुढे जेव्हा श्रम थांबतात तेव्हा उलट होते. यासाठी नियमित शरीर श्रम (व्यायाम) चालू ठेवणे आवश्यक अहे. लठ्ठ होण्याचा कल विशेषतः काही व्यक्तीमध्ये कुटुंबात आढळतो. पण ज्याला आपण आनुवंशिकता म्हणतो त्या तत्त्वांवर हे ठरविणे अवघड आहे. स्त्रियाच्यात लठ्ठपणा सामान्यतः बाळंतपणानंतर दिसू लागतो आणि बाळंतपणाची संख्या जशी वाढत जाते तसा लठ्ठपणाही वाढत जातो. “जे लठ्ठ आहेत ते लठ्ठ नसलेल्यापेक्षा शरीर श्रम कमी करतात असे सर्वसामान्य विधान करता येईल. आणि त्यावरून असेही प्रतिपादन करता येईल की, माणसाचा आहार आणि त्याचे शरीर श्रम त्याचे वजन ठरवीत असतात. दुसरे असे की, जास्त कष्ट केले की जास्त आहार घेतला जातो हा समज मात्र चुकीचा आहे, उलट कमी कष्ट करणारे जास्त खादाड असतात. तेव्हा भुकेवर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव मार्ग लठ्ठपणा कमी करण्याचे दृष्टीने महत्त्वाचा आहे.
लठ्ठपणाची कारणे
आनुवंशिकता :
अति लठ्ठपणा हे बहुतांशी आनुवांशिक असते आणि पालक लठ्ठ असताना मुलेही लठ्ठ होण्याची शक्यता अधिक असते.

लिंग :
स्त्रियांच्यात पुरुषांपेक्षा चरबीचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांची हार्मोन्स व स्थूलता याचा निकटचा संबंध आहे. अशी हार्मोन्स जास्त प्रमाणात देण्यात आल्यास लठ्ठपणा वाढतो.

मानसिक :
ज्या स्त्रिया आपल्या बालकाची अधिक काळजी घेतात. सुरुवातीपासूनच अधिक खाऊ घालतात त्यांची मुले अधिक स्थूल होतात. ह्यामागे मातेच्या अस्थिर मनोवृत्ती, चिंता हे होय. सामान्यतः स्त्रिया स्वयंपाक करताना झालेल्या पदार्थाची चव बघणे, मुलांनी व नवऱ्याने न खाल्लेले अन्न वाया जाऊ नये म्हणून खाणे व सर्वाबरोबर जेवणे या सर्व गोष्टीमुळे जास्त खाल्ले जाते. स्त्रियांच्या रोजच्या जीवनात नवरा मुले यांची चिंता करणे, घरातील गोष्टींकडे पाहाणे अशा दैनदिन मानसिक ओढाताणीमुळे पुषकळशा स्त्रियांना ह्या गोष्टी विसरण्यासाठी खाण्याची सवय लागते आणि खूप खाणे हा त्यांच्या जीवनात मनोरंजनाचा ( मानसिक दडपण कमी करण्याचा ) मार्ग होतो. त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदारी व वेळेचा अभाव यामुळे व्यायामाला व खेळांना स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेळ कमी मिळतो.पुष्कळदा हे कळत नाही की, दोन व्यक्ती एकसारखा आहार व एकसारखे शारीरिक श्रम करीत असतानासुद्धा एक लठ्ठ होते, तर दुसरी तशीच राहाते. याचे कारण त्या व्यक्तीची लठ्ठ होण्याकडे असणारी आनुवंशिक प्रवृत्ती हेच होय, आणि शरीरातील घटनेमध्ये व चयापचयामधील फरक होय. ( सकाळ संध्याकाळ फिरण्याचा व्यायाम घेतल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदतच होते.

मानसिक कारणे :
सर्वसाधारणपणे खुशाल चेंडू वृत्ती आणि लठ्ठपणा हे अविभाज्य भाग समजले जातात. पण याविषयी थोडा अधिक विचार करणे आवश्यक आहे. खरे म्हणजे हा आनंदाचा आभास आहे, स्थूल लोकांच्या जीवनात धडपड-हालचाल कमी असते. त्यामुळे ते शांत सुखी खोट्या अर्थाने वाटतात. याउलट काही लोकांन शारीरिक वजन हे सहाध्यायी असावेत असे वाटते आणि आपल्या मनातील न्यूनगंड लपवण्यासाठी ते जाड होत राहातात. गोल शरीर, मोठे स्तन मोठे नितंब हे स्त्रीच्या शारीरिक आकर्षणाचा भाग असतात असे बऱ्याच स्त्रियांना वाटते. पण ते किती मोठे असावेत, कोठे थांबावे हे लक्षात न आल्याने बऱ्याचशा स्त्रिया जास्त जास्त लठ्ठ होत जातात.
ज्या लोकांना प्रेम, स्नेह मिळत नाही ते आपले दुःख विसरण्यासाठी खाण्यापिण्यात आनंद मिळवू पाहतात.
(१) आईबापांचे प्रेम न मिळणारी मुले.
(२) अविवाहित स्त्री पुरुष.
(३) वंध्यत्व.
(४) मानसिक ताण आणि कौटुंबिक प्रेमाचा अभाव.

लठ्ठ व्यक्तींचा लठ्ठपणाविषयी दृष्टिकोन
बऱ्याचशा लठ्ठ व्यक्तींना त्यांच्या बेढव शरीराची जाणीव असते आणि इतरांनी त्यांच्याकडे सहानुभूतीने पहावे अशी त्यांची मनोधारणा असते. तर काहींना इतर पुरुष अथवा स्त्री आपल्याशी लठ्ठपणामुळे शरीर संबंध ठेवू इच्छिणार नही, सुख मिळवू शकणार नाही, अशी भीती वाटते.

लठ्ठ लोकांविषयी इतरांचा दृष्टिकोन
इतरांचे दृष्टीने लठ्ठमाणूस हा जेष्ठेचा व मजेचा विषय असतो. आणि यामुळे लठ्ठ माणसाचा न्यूनगंड अधिक वाढत जातो. लठ्ठ असल्याने खरोखरीच काही बिघडते का ? लठ्ठपणाचा आरोग्यावर परिणाम स्थूलपणा असणाऱ्या व्यक्तींमध्ये आयुर्मान कमी असते. पुरुषात ११ टक्के व स्त्रियात ७ टक्के आयुष्य केवळ लठ्ठपणाने कमी होऊ शकते. लठ्ठपणाने हृदयाचे काम वाढते आणि शरीराबरोबरच हृदयाचा आकारही वाढत जातो. रक्तदाब वाढतो, फुप्फुसाचे काम देखील बिघडते, लठ्ठे स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवतात. लठ्ठ स्त्रियांना नोकरी मिळण्यास, लग्न ठरण्यास अडचणी येतात. याशिवाय गलेलठ्ठ व्यक्ती ही सर्वांच्या चेष्टेचा विषय होते. स्थूल माणसाच्या बाबतीत ऑपरेशनच्या वेळी अडचणी जास्त येतात आणि त्यांच्यात अपघाताचे प्रमाणही जास्त असते.

लठ्ठपणा कसा टाळता येईल ?
लठ्ठपणा बहुतांशी टाळता येणार आहे. पण आहारनियंत्रण बरीच वर्षे आणि पुष्कळदा आयुष्यभरच सांभाळणे अवघड जाते. तेव्हा स्त्रियांचए बाबतीत आहारनियंत्रणाइतकेच खेळ व व्यायाम यांना महत्त्व आहे. स्त्रियांनी विशेषतः मासिक पाळी सुरू होताना. बंद होताना व बाळंतपणाचे वेळी अधिक काळजी घेणे जरूर आहे. बाळंतपणावर व गर्भारपणी जे अधिक खाल्ले जाते ते टाळले पाहिजे. तसेच गर्भारपणी फिरायला चालत जाणे व बाळंतपणानंतर थोडे चालणे व घरच्याघरी पोटाचे व्यायाम करणे जरूर असते. ज्या स्त्रियांमध्ये लठ्ठ होण्याची प्रवृत्ती दिसून येते त्यांनी कुटुंब नियोजनाच्या गोळ्या सोडून इतर साधने वापरावयास हवीत.

लठ्ठपणावरील उपाय
या प्रकारच्या उपचारात रुग्णांचे मानसिक बळ उत्तम लागते आणि ते तसे असणे उपचारांच्या यशासाठी महत्त्वाचे आहे आणि चिकित्सा करणारे डॉक्टर यांनीही पेशंटच्या मानसिक प्रश्नांचा चांगला अभ्यास करणे जरूर आहे, त्याचबरोबर पेशंटबद्दल सहानुभूती असायला हवी.
(१) आहार नियंत्रण :
सुरुवातीला रुग्णाच्या आहाराचा पूर्ण अभ्यास करून त्याला नवा आहार सुचवावा. दिवसाला ५०० कॅलरी नेहमीपेक्षा कमी केल्यास ७ दिवसात १ पौंड वजन घटते. थोडे दिवस उपाय केल्यास वजन त्वरेने घटू शकते. आहारनियंत्रण चालू असताना प्रोटिन्स व सेल्यूलोज ( फायबर ) जास्त असलेले पदार्थ खाण्यास ठेवावेत.

(२) मानसिक ताण विचार :
खादाड स्त्रियांच्या सवयींच्या मुळाशी काय कारण आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रेमाचा अभाव, घरी व बाहेर होणारी हेटाळणी या गोष्टींचा विचार केल्यास चिकित्सा करताना सोपे जाते आणि पेशंटचेही योग्य सहकार्य मिळते.

(३) व्यायाम :
शरीर कष्ट आणि त्याला लागणाऱ्या कॅलरीज यांचे खालील कोष्टक महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील घटनांचा त्यात उल्लेख आहे.

(अ) झोप : ०.८ ते १.२ कॅलरीज / मिनिटाला
(ब) आडवे होणे, हलके काम : १ ते १.४ कॅलरीज /मिनिटाला
(क) बसून काम करणे : १.५ ते २ कॅलरीज /मिनिटाला
(ड) हलके काम. घरात आधुनिक साधने नसताना ते २ ते २.५ कॅलरीज /मिनिटाला
(इ) मध्यम शारीरिक कष्ट ३.५ ते कॅलरीज /मिनिटाला ( उदा. शेतावर कम/नृत्य/खेळ)
(फ) अतिकष्ट ७ ते १२ कॅलरीज /मिनिटाला (शेतमजूर स्त्रिया / बांधकामावर मजूर स्त्रिया )
यावरून त्या व्यक्तीच्या रोजच्या कॅलरीज किती खर्च होतात ते काढता येते आणि त्यावरून आहार ठरवता येतो.
सर्वसाधारणपणे नियमित आहारनियंत्रण ठेवल्यास औषधांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे वजन नियंत्रण करता येते.

औषधांचे प्रकार
(१) भूक कमी करणारी
(२) कॅलरीज जाळणारी
(३) चरबीचा चयापचय बदलणारी
(४) आतड्यातून अन्न शोषण कमी करणारी
सर्वसाधारणपणे भूक कमी करणारी औषधे जास्त वापरली जातात.

शस्त्रक्रिया
ज्याचे वजन अपेक्षेपेक्षा ५० किलोने जास्त आहे व ज्यांना नियमितपणे औषध व अन्न नियंत्रण करूनही फायदा होत नाही. त्यांनी शस्त्रक्रियेचा विचार करावा.

शस्त्रक्रियेचे प्रकार :
(१) आतड्याची लांबी करणे : ( Bya pass Suragery > याने अन्नाचे शोषण कमी होते.
(२) जठराचा भाग कमी करणे ( Gastric Bypass )
(३) व्हेगसनर्स कापणे ; (Vagotory ) याने भूक कमी लागते.
(४) वरचे व खालचे दात स्टील वायरने बांधून टाकणे : यामुळे फक्त पातळ आहारच घेता येतो.

हे सर्व जरी असले तरी आपल्या मनावर नियंत्रण ठेवून फाजील आहारावर नियंत्रण ठेवून आणि रोज भरपूर फिरणे, काम आणि व्यायाम घेऊनच लठ्ठपण निश्चितच कमी करता येईल. त्यामुळे उत्साहही वाढतो. आपले वडील, बेढब लठ्ठ शरीर, बारीक सडसडीत सुडौल, करण्यासाठी लठ्ठ स्त्रियांनी अधिक वेळ न दवडता लठ्ठपणा कमी करायला सुरुवात केली पाहिजे आणि आपले वजन आपल्या हातीच ठेवले पाहिजे !

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

कोण होता हा सँडफर्ड फ्लेमिंग

आज गूगलने आपलं ‘डू़डल’ सँडफर्ड फ्लेमिंग या संशोधकावर बनवलंय. आईनस्टाईन, एडिसन यासारख्या मोठमोठ्या शास्त्रज्ञ, संशोधकांची नावं आपण नेहमीच एेकतो. पण सँडफर्ड फ्लेमिंगसारखे अनेक संशोधक प्रसिध्दीच्या झोतापासून दूर राहत शांतपणे काम करत सामान्य लोकांसाठी महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. आज फ्लेमिंग यांची १९०वा जन्मदिवस आहे. पाहुय़ात कोण होता हा सँडफर्ड फ्लेमिंग


१. १८२७ साली स्काॅटलंडमध्ये जन्मलेल्या फ्लेमिंगनी ‘स्टँडर्ड टाईम झोन्स’ म्हणजेच प्रमाणवेळेची कल्पना मांडली. रेल्वे तिकिटावर चुकीची वेळ छापली गेल्याने त्यांची एकदा ट्रेन चुकली. यातूनच त्यांना जागतिक प्रमाणवेळ तसंच स्थानिक प्रमाणवेळेची कल्पना सुचली. यावेळी ते ४९ वर्षांचे होते. जागतिक प्रमाणवेळेचं ‘स्टँडर्ड’ इंग्लंडमध्ये ग्रीनिचला असावं असं त्यांनी सुचवलं आणि प्रमाणवेळेच्या गणितांची रचना केली. १८८४च्या इंटरनॅशनल मेरिडियन परिषदेत त्यांची कल्पना अमान्य झाली पण ही पध्दत सोयीची असल्याने १९२९ पर्यंत ती जगभर रूढ झाली.

२. इंजिनियर असलेल्या सँडफर्ड फ्लेमिंग यांनी उत्तर अमेरिकेत रेल्वेचं जाळं वाढवण्यात मोठी कामगिरी बजावली

३. फ्लेमिंग यांच्याकडे व्यापारी दृष्टीही होती. १८८२ साली त्यांनी कॅनडामध्ये कापूस उत्पादन करणारी कंपनी स्थापन केली.

४. त्यांना शेतीमध्ये रस होता. कॅनडामधल्या ओटावा शहरात ते शेतकरी गटांमध्ये सहभागी व्हायचे.

५. त्यांच्या या सगळ्या कामगिरीमुळे १८९७ साली इंग्लंडच्या राणीने त्यांचा ‘सर’ ही पदवी देत सन्मान केला..

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

सिंधुताई सपकाळ -- अनाथांच्या आई


आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. 


             सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणतात. माई मुळच्या विदर्भातल्या, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वाळण्याचं काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेले, शहरी सुविधाचा स्पर्श नसलेले. कुणालाही शिक्षणाचा गंध नाही, अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहिण आहे. मुलीनं शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणुन माईंना गुर राखायला पाठवत असे. इकडे माई शाळेत जाऊन बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीच शिकता आले. अल्पवयात लग्न झाले. चिंधा साठे ची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी प्रचंड सासुरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुर वळणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुर ही शेकड्याने असायची त्यांचे शेण काढता काढता कंबर मोडायचे. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्या बद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही, म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपल असल्याच खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून दिले. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली. पोट भरण्यसाठी भिक मागण्याची वेळ माईवर आली. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचा काय? एक मृत देह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली.
एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.

             निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते ? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती , पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात.

              आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहे. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. माईना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे.
माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे... घेता घेता देणा-याचे हात घ्यावे.