सियाचीन : सियाचीनच्या ग्लेशियरवर झालेल्या जीवघेण्या हिमस्खलानंतर भारतीय जवानांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. भारतीय लष्कराचे 200 जवान, दोन क्रेन, रडार यांच्यासह डॉट आणि मिशा हे दोन श्वान या शोधकार्यात मोलाची भूमिका निभावत होते.
डॉट आणि मिशा यांनी या शोधमोहिमेत जबरदस्त भूमिका बजावली. अशा श्वानांना याप्रकारच्या शोधकार्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं.
सियाचिनमधलं सोनम पोस्ट
19 हजार 900 फूट उंचीवर हनुमंतप्पा आणि इतर 9 जवान तैनात होते. त्याचवेळी झालेल्या हिमस्खलनाने बर्फाची एक मोठी भिंत या 10 जवानांवर चाल करून आली. काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं आणि शांतही झालं. 1 किलोमीटर रुंद आणि 800 मीटर उंचीच्या बर्फाच्या भिंतीनं अख्खा कॅम्प गाडून टाकला.
त्यानंतर बर्फवृष्टी, बर्फाळ वादळाचं सत्र सुरु झालं. दिवसा तापमान उणे 15 डिग्री… तर रात्री उणे 55 डिग्री. जवानांशी संपर्क तुटला… काहीतरी अघटित घडल्याची कुणकुण बेसकॅम्पला लागली. आणि सुरु झालं रेस्क्यू ऑपरेशन.
रेस्क्यू ऑपरेशन
लष्कराच्या रेस्क्यू टीममध्ये सुमारे 200 सदस्य होते. त्यात डॉक्टर्स, सियाचिन बॅटल स्कूलचे इस्ट्रक्टर्स, नाईंटीन मद्रास रेजिमेंटचे जवान आणि लडाख स्काऊटचे जवान सामील होते. इतकंच नाही, तर अॅव्हलांज रेस्क्यू मिशनचं श्वानपथकही या मोहिमेत सोबतीला होतं.
शिवाय इत्या उंचीवर पोहोचू शकणारं वायुसेनेचं एमआय सेव्हंटीन हेलिकॉप्टर आणि एएन थर्टीवन हे विमानही होतं.
हेलिकॉप्टर पोहोचणं अशक्य
अशा बर्फाळ परिस्थितीत घटनास्थळी हेलिकॉप्टर पोहोचणं अशक्य होतं. त्यामुळे रेस्क्यू टीमला पायी जावं लागलं. सगळ्यात आधी घटनास्थळी पोहचले, ते बाणा-पोस्टचे जवान. बाणा पोस्ट ही जगातल्या सर्वाधिक उंचीवर असलेली मिलिटरी पोस्ट आहे.
*बर्फाची ही भली मोठी भिंत फोडण्यासाठी बचाव दलानं सोबत एक खास रॉक ड्रिल आणलं होतं.
*शिवाय बर्फाला भगदाड पाडण्यासाठी अर्थ ऑगुअर नावाचं मशीनंही सोबत आणलं होतं.
*रेडिओ सिग्नल यंत्रणा पकडण्यासाठी खास रडारही रेस्क्यू टीमकडे होतं
*तर बर्फाळ भागात काम करण्यासाठी प्रशिक्षित केलेले डॉट आणि मिशा हे श्वानही सोबत होते.
बर्फाखाली सिग्नल पोहोचणं कठीण
बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवानांपर्यंत सिग्नल पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी थर्मल सिग्नेचर डिटेक्टरचा वापर प्रभावी ठरला. हे यंत्र जमिनीच्या आत अनेक फूट दडलेल्या मानवी शरिरातल्या उर्जेचा क्षणार्धात शोध घेतं.
बचाव दलानं सर्वात आधी घटनास्थळी वैद्यकीय उपचारांसाठी पोस्ट तयार केली. त्यानंतर एकूण 5 ठिकाणी चाचपणी केली. आणि रेडिओ सिग्नलचा शोध घेतला. प्रत्येक ठिकाणी अत्यंत बारकाईने खोदकाम सुरु झालं. बर्फाच्या भिंतींना तोडण्याचं कामही हाती घेण्यात आलं.
जवळपास 25 फूट खोदकाम झालं आणि पहिल्यांदाच आर्कटिक टेन्ट नजरेस पडला. सियाचिनमध्ये तैनात जवानांसाठी हे खास टेन्ट तयार केले जातात.
पहिला मृतदेह आणि चमत्कार
सुमारे दोन दिवसांच्या शोधानंतर सोमवारी पहिला मृतदेह नजरेस पडला.. आणि त्याच्या खालोखाल दिसला एक चमत्कार.. ज्या चमत्काराने सारेच थक्क झाले… कारण तिथं जिवंत होते… हणमंतप्पा. सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ सियाचिनमधला असल्याचा दावा केला जातोय… पण तो खरा नसला… तरी अशीच काहीशी स्थिती सियाचिनमधल्या त्या बचाव अभियानात होती.
तातडीने हालचाली सुरु
बचाव दलानं याची माहिती थेट कमांडिंग ऑफिसरला दिली… माहिती वायुवेगाने लष्करप्रमुखांपर्यंत पोहोचली… तातडीनं हालचाली सुरु झाल्या… वायुदलाचं एमआय सेव्हन्टीन हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झालं… आणि हणमंतप्पांना लडाखच्या ब्रिगेड हेडक्वार्टरच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
प्रकृती चिंताजनक असल्यानं हनुमंताप्पांना तातडीने दिल्लीला रवाना करण्यात आलं. एकीकडे दिल्लीतल्या आरआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु झाले आणि देशभरात हणमंतप्पांसाठी प्रार्थना सुरु झाल्या.
लान्स नाईक हनुमंथप्पा जिवंत सापडले
या शोधमोहिमेदरम्यान लान्स नाईक हनुमंथप्पा 6000 मीटर उंचीवर, आठ मीटर म्हणजेच सुमारे 25 फूट आत बर्फामध्ये जिवंत सापडले.
तीन फेब्रुवारीला झालेल्या हिमस्खलात 800×400 फूट बर्फाळ भिंत कोसळली आणि यामध्ये भारताचे 10 जवान गाडले गेले. मात्र 6 दिवसानंतर 9 फेब्रुवारीला एक जवान जिवंत सापडला, तो म्हणजे हनुमंथप्पा होय.
सर्वात उंच लढाऊ मैदान
सियाचीन हे जगातील सर्वात उंच असं लढाऊ मैदान आहे. इथे रात्रीचं तापण उणे 50 अंशापर्यंत खाली जातं. अशा तापमानात भारताचे जवान सीमेच्या रक्षणासाठी सज्ज असतात.
काश्मीरला लागून असलेल्या काराकोरम क्षेत्राच्या पूर्वेकडच्या सगळ्यात मोठ्या पाच ग्लेशियर्सपैकी एक म्हणजे सियाचीन. समुद्रसपाटीपासून 16 ते 20 हजार फूट उंचावर असलेलं सियाचीन भारत आणि पाकिस्तानसाठी मात्र युद्धभूमी आहे. तेही गेल्या 28 वर्षांपासून.2003 पासून इथं युद्धबंदी लागू आहे. मात्र तरीही दोन्ही देशांचे सैनिक इथं नेहमीच सज्ज असतात.
प्रतिकूल परिस्थिती
शत्रूच्या गोळीनं जितके सैनिक मारले नसतील त्याहून अधिक सैनिक इथल्या प्रतिकूल वातावरणानं मृत्यूमुखी पडलेत…70 किलोमीटरच्या या पट्ट्यात भारत आणि पाकिस्तानचे तब्बल अडीच हजार सैनिक या निष्ठूर बर्फाचे बळी ठरलेत…शून्याच्याही खाली ५० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या या निर्जन प्रदेशावर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या दोन्ही देशांनी आतापर्यंत 500 अब्जांपेक्षाही जास्त पैसा खर्च केला आहे. फक्त भारताबाबतच सांगायचं तर सियाचीनमध्ये असलेल्या भारताच्या संरक्षण दलाचा दिवसाचा खर्च १० कोटी रुपये एवढा अवाढव्य आहे.
सियाचीनवर भारताची पकड
सियाचीनवरील भारताची पकड खूपच मजबूत आहे…सियाचिन ग्लेशियरसोबतच इथल्या उत्तरेकडील सलतोरो पर्तरांगांवरही भारताचा ताबा आहे…पाकिस्तानी सैन्य भारतापेक्षा खूपच खाली आहे…सियाचीनचं संरक्षण करण्यासाठी भारताची तीन हजार सैनिकांची एक ब्रिगेड सदैव इथं तैनात असते…त्यांना पुरेशी रसद आणि सामान पोहचवण्यासाठी वायुदलाचे चेतक, चिता, एमआय – ८ आणि एमआय – १७ हे हेलिकॉप्टर सतत या परिसरात घिरट्या घालत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा