Translate

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

महाराष्ट्रात 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. 

समितीला 31 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन करुन घाटाखालील मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव खामगाव या सहा तालुक्यांचा समावेश खामगाव जिल्ह्यात केला जाणार आहे.

राज्यात 1988 नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या 36 जिल्हे 288 तालुके आहेत. मात्र सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे तसेच काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा तालुकानिर्मितीची मागणी केली आहे.

एका जिल्हा निर्मितीसाठी तब्‍बल 350 कोटी खर्च

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दालनात या संदर्भात बुधवारी एक बैठकही पार पडली. एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान 350 कोटी रुपये खर्च येतो. राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अशा परिस्थितीत जिल्हानिर्मितीवर खर्च करणे शक्य नसतानाही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्याने सरकारने 22 नवीन जिल्हे निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

अचलपूरसाठीही पाठपुरावा

सध्या अस्तित्वात असलेल्या 18 जिल्ह्यांचे विभाजन करुन 22 नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत नेत्यांनी काँग्रेस आघाडी सरकारला पत्रे पाठवली होती. आता राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

प्रस्तावित नवीन जिल्हे

बुलडाणा(खामगाव)
यवतमाळ (पुसद)
अमरावती (अचलपूर)
भंडारा (साकोली)
चंद्रपूर (चिमूर)
गडचिरोली (अहेरी)
जळगाव (भुसावळ)
लातूर (उदगीर)
बीड (अंबेजोगाई)
नांदेड (किनवट)
अहमदनगर (शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर)
नाशिक (मालेगाव, कळवण)
सातारा (मानदेश)
पुणे (शिवनेरी)
पालघर (जव्हार)
ठाणे (मीरा भाईंदर, कल्याण)
रत्नागिरी (मानगड)
रायगड (महाड)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा