मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणजे बाहुबली. 10 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसात 300 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आणि अजूनही बॉक्स ऑफिसचे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड्स तोडत यशस्वी घोडदौड सुरुच आहे. काल्पनिक युद्धावर अधारित असलेल्या या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत वेगळी छाप पाडली आहे. ‘बाहुबली’ पाहिल्यानंतर सिनेरसिकांमध्ये चित्रपटाची कथा आणि त्यातील अभिनायापेक्षा जोरदार चर्चा सुरु आहे ती त्यामधील व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजेच व्हीएफएक्सची.
कोणत्याही भारतीय चित्रपटात ‘बाहुबली’सारखे व्हिज्युअल इफेक्ट्स नाहीत
‘बाहुबली’मध्ये काल्पनिक युद्ध दाखवलं आहे. काल्पनिक रणभूमी आणि युद्ध पाहून केवळ देशातीलच नव्हे, जगभरातील सिनेरसिक, समीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. केवळ भारतीय चित्रपटसृष्टीबाबत विचार केला, तर अशाप्रकारे व्हिज्युअल इफेक्ट्स आतापर्यंत कोणत्याही भारतीय प्रादेशिक चित्रपटात किंवा बॉलिवूडमध्येही वापरलेले नाहीत. देशातील कोणत्याही चित्रपट समीक्षकांना अशाप्रकारच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची अपेक्षा नव्हती. मात्र, ‘बाहुबली’ने ते करुन दाखवलं.
बाहुबलीच्या यशामागचा चेहरा
‘बाहुबली’चे दिग्दर्शक राजमौलींनी तीन वर्षांपूर्वी अवाढव्या दृश्य असलेला चित्रपट तयार करण्याचं एक स्वप्नं पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरलं. मात्र, राजमौलींचं हे स्वप्नं सत्यात उतरवण्याचं काम केलं ते व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट वदलामुदी श्रीनिवास मुरली मोहन यांनी.
बाहुबलीच्या यशानंतर श्रीनिवास यांचीच चर्चा
श्रीनिवास यांच्यामुळेच बाहुबली बलवान वाटतो...अवाढव्य वाटतो...ताकदवान वाटतो. साधारणत: एखाद्या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, तर त्याचं संपूर्ण श्रेय दिग्दर्शक किंवा अभिनेत्याला दिलं जातं. मात्र, ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक आणि अभिनेत्यासोबत चर्चा सुरु आहे ती व्हीएफएक्स आर्टिस्ट श्रीनिवास यांची. तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले श्रीनिवासन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट आहेत, असे म्हटले तरी वावगं ठरु नये.
पोटापाण्यासाठी ट्रक क्लिनर म्हणून कामाला सुरुवात
सामान्य कुटुंबातून अलेल्या श्रीनिवासन यांचा आतापर्यंतचा प्रवास अतिशय आयुष्य खडतर आहे. “घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं सुरुवातील ट्रक क्लिनर म्हणून काम केलं. त्याचवेळी ते इलेक्ट्रिक वायरिंगचंही काम करत असत. त्यातून पोटापाण्यासाठी चार पैसे मिळत असत. त्यानंतर ऑडिओ आणि व्हिडिओ प्लेयरच्या दुरुस्तीचं काम सुरु केलं. यादरम्यान, काही मित्रांनी कम्प्युटर शिकण्याचा सल्ला दिला आणि मी माझा मोर्चा कम्प्युटरकडे वळवला. अफाट मेहनतीनंतर अखेर सॉफ्टवेअर इंजिनिअर बनलो.”, असे श्रीनिवास सांगतात.
विवाहसोहळ्यांच्या व्हिडिओचा टायटल डिझायनर
“सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर काही मित्रांना लोगो डिझायनिंग करताना पाहिलं. मला ते काम आवडलं... मग मीही लोगो डिझायनिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक दिवस विजयवाडामध्ये विवाहसोहळ्यांच्या व्हिडिओचे टायटल डिझाईन करण्याचं काम केलं.”, असे श्रीनिवास यांनी सांगितले.
…आणि चेन्नई गाठली!
विजयवाडामधील हे काम पाहून काही लोकांनी श्रीनिवास यांना चेन्नईला जाऊन कुठलातरी मोठा कोर्स करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर श्रीनिवास यांनी ताबडतोब चेन्नई गाठली आणि इथूनच सुरु झाला व्हिएफएक्सच्या क्षेत्रातील एक महान कलाकाराचा प्रवास...
चेन्नईत आल्यानंतर श्रीनिवास यांनी क्षणभराचाही वेळ न दवडता श्रीनिवास यांनी थ्रीडी स्टुडिओ मॅक्सच्या पहिल्या व्हर्जनचा अभ्यास केला. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘इंडियन आर्टिस्ट कम्प्युटर ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ नामक कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. श्रीनिवास सध्या या कंपनीचे सीईओ आहेत.
“काही काळाने मला चित्रपटांचे लोगो आणि टायटल डिझायनिंगची संधी मिळाली. पहिल्यांदा ए. एम. रत्नम यांच्या ‘इंडियन’ चित्रपटाचे टायटल डिझायन केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते एस, शंकर.”, असे श्रीनिवास यांनी सांगितले.
व्हिज्युअल इफेक्ट्सच्या जगतात श्रीनिवास कसे आले?
चित्रपटांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सचं काम करणं अद्याप श्रीनिवास यांच्यापासून कोसो दूर होतं. मात्र, नशीब आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांना 2003 साली पहिला चित्रपट मिळाला. 2003 मध्ये दिग्दर्शक एस. शंकर यांनी श्रीनिवास याने पहिला मोठा ब्रेक दिला. ‘रोबोट’ आणि ‘शिवाजी’ हे चित्रपट बनवणारे एस. शंकर हे त्यावेळी ‘बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. बॉईज चित्रपटाच्या साऊंड सिक्वेंसचं काम श्रीनिवास यांनी केलं. त्यांचं काम एस. शंकर यांना एवढं आवडलं की, त्यानंतर एस. शंकर यांच्या शिवाजी, रोबोट, आय इत्यादी सुपरहिट चित्रपटांच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची कामं श्रीनिवास यांनीच केली.
‘बाहुबली’चे दिग्दर्शक राजमौली यांच्यासोबत श्रीनिवास यांची पहिली भेट
‘बाहुबली’चे दिग्दर्शक राजमौली यांच्यासोबत श्रीनिवास यांनी याआधीही केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपट ‘ईगा’दरम्यान श्रीनिवास यांनी राजमौलींशी मुलाख झाली. ‘ईगा’ चित्रपटाच्या काही भागासाठी श्रीनिवास यांनी काम केलं. आणि हेच काम पाहून राजमौली यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बाहुबली’साठी श्रीनिवास यांनी निवड केली. बाहुबलीसारख्या चित्रपटात व्हीएफएक्स आर्टिस्ट म्हणून काम करणं कोणत्याही आर्टिस्टचं स्वप्नं असेल, असं श्रीनिवास यांनी सांगतात. बाहुबलीदरम्यान राजमौलींशी अनेक मुद्द्यावर मतभेद होत असत. मात्र, अशा मतभेदांमधूनच नवे काहीतरी निघत असे, असे श्रीनिवास सांगतात.
व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट नक्की काय करतात?
एखाद्या चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्री, सांगीतकार, गायक, दिग्दर्शक, स्टंटमॅन, नृत्यदिग्दर्शक इत्यादींना प्रेक्षक ओळखतात किंवा त्यांच्याबद्दल थोडी तरी माहिती असते. मात्र, व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्टबाबत कुणालाही काहीच माहिती नसते, हे दुर्दैव आहे. दिग्दर्शकाने शूट केलेले दृश्य वास्तवदर्शी वाटण्यासाठी कम्प्युटर जेनेरेटे इमेजरीमध्ये (CGI) जुळवण्याचे काम व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट करत असतात. ‘बाहुबली’साठी श्रीनिवास यांनी तब्बल 16 स्टडिओंकडून काम करुन घेतलं. ‘बाहुबली’च्या व्हिज्युअल इफेक्ट्सचं 80 टक्के काम भारतातच झालं आहे.
“भारतीय तरुणांमध्ये कला आहे, मात्र उत्तम ट्रेनिंगची गरज”
भारतीय चित्रपटांच्या बजेटबाबत आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की, भारतीय चित्रपटसृष्टीत बजेटची अडचण नाही, अडचण आहे ती उत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्टची. भारतात हुशार तरुणांनी काही कमी नाही. मात्र, त्यांना चांगल्या ट्रेनिंगची गरज आहे, असे श्रीनिवास सांगतात.
श्रीनिवास सध्या एस. शंकर यांच्या नव्या चित्रपटावर काम करत आहेत. “एस. शंकर यांचा हा चित्रपट तंत्रज्ञान आणि बजेटच्या दृष्टीने ‘बाहुबली’पेक्षाही दोन ते तीन पटीने मोठा आहे. त्या चित्रपटाचं नाव अद्याप नक्की झालेलं नाही.”, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा