Translate

गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

इंटरव्ह्यू

यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू ........ कल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू आपल्या वाट्याला आला तर.?
१) "मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?"
Ans:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !"
(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)

२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला..
"एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..?"
Ans:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)
ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला ! (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा? कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)

३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू?
Ans:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..)
तो उमेदवार म्हणाला - टी ! (?)
(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )

४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली?
या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.
Ans :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)
उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )

५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहातउभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?
Ans:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.? आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..
‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)

६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.?
‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.
उमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.
"असं का.. हीच जागा का. ?"
Ans:- उमेदवाराने उत्तर दिले- "सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.?
त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.
तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही..!

बुधवार, २९ एप्रिल, २०१५

मोटार वाहन कायदा-१९८८ रद्द ????

मोटार वाहन कायदा-१९८८ रद्द करून त्या जागी रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक केंद्र आणणार आहे. यामुळे एस.टी., बेस्ट बस आदी सार्वजनिक वाहतूक उपक्रम तसेच रिक्षा व टॅक्सी व्यवसायाचे खासगीकरण होणार आहे. तसेच यातील जाचक तरतुदींमुळे सर्वसामान्य नागरिकही भरडला जाणार आहे. त्याविरोधात उद्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. 
रिक्षा, टॅक्सी, एस.टी, बेस्ट बस बंद राहणार असल्याची माहिती 'नॅशनल फेडेरशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार, अधिकारी, स्वयंरोजगारी चालक-मालक संघटना फेडरेशन'चे निमंत्रक अ‍ॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, बुधवारी बेस्टच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनूसार बेस्ट या संपात सहभागी होणार नाही. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही महासंचालकांकडून देण्यात आला आहे. 
कोणताही नवीन कायदा आणायचा असेल तर त्याविषयी हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यावर चर्चा होते. मात्र हा प्रस्तावित कायदा फक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे सांगून आंबोणकर म्हणाले, बंदमध्ये भारतीय मजदूर संघासह हिंद मजदूर सभा, इंटक, सीटू, आयटक, कामगार आघाडी तसेच देशभरातील कामगार संघटना सहभागी होणार आहेत. 'मनसे'ने या बंद आंदोलनाला पाठिंबा दिला असून शिवसेनेच्या सर्व परिवहन कामगार संघटनांनी यात सहभागी व्हावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
संपूर्ण देशभरातील वाहतूक व परिवहन क्षेत्रातील ४० लाख कामगार या बंदमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्रातील एक लाख एसटी कर्मचारी, ५ लाख रिक्षाचालक, तसेच 'बेस्ट'कर्मचारी असे सुमारे ७ लाख कामगार-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

रिक्षा, टॅक्सी, एस.टी. बेस्ट बंद

* ६ ते १२ आसनी गाडय़ांना वाहतुकीसाठी परवानगी
* एसटी किंवा बसचे फायद्यातील मार्ग खासगी मालक विकत घेऊ शकतील
* एसटी व बेस्टकडे असलेल्या जमीनी भूमी अधिग्रहण कायद्याखाली ताब्यात घेतल्या जातील
* एसटी बसमध्ये वाहक असणार नाही. देशभरातील १० ते १२ लाख वाहकांचे काय होणार हा प्रश्न
* वाहन अपघातात माणूस दगावला तर चालकाला सक्तमजुरीची शिक्षा
* एक वर्ष 'कम्युनिटी सव्‍‌र्हिस' करावी लागेल, ती कशा स्वरुपाची हे स्पष्ट नाही

अंतराळात वस्ती करण्याची स्टीफन हॉकिंग यांची सूचना

आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून अंतराळ संशोधनात व भौतिकशास्त्रात महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवजातीला शक्य तितक्या लवकर अंतराळात वस्ती करण्याचा इशारा दिला आहे.
हॉकिंग यांनी शनिवारी होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरून केंब्रिज येथील आपल्या कार्यालयातून ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊस येथील श्रोत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. 
पृथ्वीवरील वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मानवी स्वभावातील आक्रमकता आणि क्रौर्य यामुळे मानवजातीपुढील आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे पुढील १००० वर्षांत येथील वातावरण मानवजातीच्या अस्तित्वाला पोषक राहणार नाही. मानवजातीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण शेजारील ग्रहांवर आणि अंतराळात तातडीने वस्ती करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याकडे मानवजातीच्या अस्तित्वाचा विमा अशा अर्थाने पाहिले पाहिजे, असे हॉकिंग म्हणाले. आपले विश्व कसे अस्तित्वात आले, विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपली नेमकी काय भूमिका आहे, येथील घटकांचा परस्परसंबंध काय आहे, अंतराळातील विविध घटनांचा कार्यकारणभाव काय आहे, या सर्वाचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. आपले लक्ष आपल्या पायांकडे नाही तर आकाशातील ताऱ्यांवर असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. 
सैद्धांतिक भौतिकशास्त्राविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देताना हॉकिंग यांनी सध्याच्या करमणूक क्षेत्रातील उदाहरणे देऊन श्रोत्यांशी जवळीक साधली. जगभरच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला इंग्रजी गायक झायन मलिक याने 'वन डायरेक्शन' हा बँड सोडून 'द एक्स फॅक्टर' या मालिकेत प्रवेश केल्याने लाखो तरुणींची मने दुखावली आहेत. त्याचा वैश्विक शास्त्रावर कसा परिणाम होईल, असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हॉकिंग यांनी सांगितले की, सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास असे शक्य आहे की झायन एका विश्वात अजूनही 'वन डायरेक्शन'मध्ये काम करत आहे आणि दुसऱ्या समांतर विश्वात तो हा प्रश्न विचारणाऱ्या महिलेचा पती आहे. 
कार्यक्रमाच्या शेवटी हॉकिंग यांनी स्टार ट्रेक मालिकेतील संदर्भ घेत 'बीम मी अप स्कॉटी' असे म्हटले. त्यानंतर त्यांची सभागृहातील आभासी प्रतिमा दिसेनाशी झाली.

नेपाळचा भूकंप

प्रलंयकारी भूकंपाने नेपाळचा अक्षरश: कणाच मोडला आहे. मात्र, नेपाळ सारख्या छोट्या देशाला सावरण्यासाठी अख्खं जग धावून आलं आहे. या भूकंपानंतर काय-काय घडलं यावर टाकूया एक नजर:

1. नेपाळमधील महाभयंकर भूकंपमध्ये आतापर्यंत तब्बल 5 हजार नागरिकांचे जीव गेले आहे. मात्र हा आकडा 10 हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

2. नेपाळमधील भूंकपाने भारतातील काही भाग देखील प्रभावित झाला आहे. भारतातही आतापर्यंत 70 जण मृत्युमुखी पडले आहेत. यात सर्वाधिक बळी हे बिहारमध्ये गेले.

3. नेपाळमध्ये आलेला भूकंप हा गेल्या 80 वर्षातील जगामधील सर्वात मोठा भूकंप आहे. 1934 साली प. बंगाल आणि राजस्थानमध्ये अशाप्रकारचा भूकंप आला होता.


4. या भूकंपामुळे पृथ्वीच्या 7200 किमी भाग जवळपास 3 मीटरने सरकला आहे. तर 7.9 एवढ्या तीव्रतेचा भूंकप हा 79 लाख टन टीएनटी उर्जेच्या बरोबरीचा आहे.


5. हिरोशिमावर करण्यात आलेल्या अणू हल्लाऐवढीच या भूकंपाची तीव्रता आहे. हिरोशिमामध्ये अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर 90,000 ते 1,66,000 जणांचे बळी गेले होते.

6. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे या धक्क्यामुळे काठमांडू हे शहर 10 फुटांनी सरकले आहे.


7. भारतीय वायुसेनेने नुकतेच 2246 भारतीयांना सुखरुपपणे मायदेशी आणलं आहे. एकूण 5,600 भारतीयांना नेपाळमधून मायदेशी आणण्यात वायुसेनेला यश आलं आहे.


8. हजारो ब्लँकेट, अन्न आणि पाणी, तंबू, डॉक्टरांच्या टीम, आपत्कालीन व्यवस्थापनचे जवान यासारख्या अनेक गोष्टी म्हणजे भारताला जेवढं  शक्य आहे ते नेपाळच्या मदतीसाठी तातडीने रवाना करण्यात आल्या आहेत.


9. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपल्या एक महिन्याचा पगार नेपाळमधील भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी देऊ केला आहे.

10. शीख समाजाने देखील मोठ्या प्रमाणात नेपाळच्या नागरिकांसाठी मदत देऊ केली आहे. दिल्लीच्या दोन शीख संस्थांनी जवळपास दररोज 25 हजार खाण्याचे पॅकेट नेपाळमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

भारतीय राज्यव्यवस्था आणि कारभार प्रक्रिया

आजच्या लेखामध्ये नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या ‘भारतीय राज्यव्यवस्था आणि कारभार प्रक्रिया’ या अभ्यासघटकाच्या तयारीचा ऊहापोह करणार आहोत. या अभ्यासघटकामध्ये भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना, कारभार प्रक्रिया (Governance), राजकीय प्रक्रिया, सार्वजनिक धोरणे, हक्कविषयक मुद्दे यांचा समावेश होतो. या विषयाला ऐतिहासिक, आíथक, समकालीन व राजकीय पलू आहेत. परिणामी, या विषयाची तयारी राज्यघटनेच्या अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता उपरोक्त पलू ध्यानात घेणे आवश्यक ठरते.
गेल्या चार वर्षांमध्ये या विषयावर साधारण १० ते २५ प्रश्न आलेले आहेत. या विषयाची सर्वागीण तयारी केल्यास जवळपास सर्व प्रश्न सोडवता येऊ शकतात आणि २० ते ५० गुणांचे पाठबळ मिळू शकते. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास या विषयावर दोन प्रकारे प्रश्न विचारले जातात. एक- पारंपरिक घटक, या विषयामध्ये राज्यघटनेचे प्राबल्य असल्याने राज्यघटनेच्या सर्व घटकातील बारीकसारीक तरतुदींवर प्रश्न विचारले जातात. उदा. २०१४ मध्ये विचारलेले प्रश्न पाहू- ‘पक्षांतरबंदीची तरतूद कोणत्या ुसूचीमध्ये आहे? भारतीय संविधानामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांना उत्तेजन देण्याविषयीची तरतूद कोणत्या घटकामध्ये आहे? राज्यपालांचे विवेकाधिन अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळ्या विषयातील अधिकार क्षेत्र आदींचा समावेश होता.
दुसऱ्या प्रकारामध्ये, राज्यघटनेतील संकल्पनांचा वा तरतुदींचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये (applied) वापर कसा केला जाऊ शकतो यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. राज्यनिर्मितीची तरतूद कोणत्या भागामध्ये व अनुच्छेदामध्ये सांगितली आहे, २०११ मध्ये ७३ व्या घटनादुरुस्तीसंबंधीचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर न झाल्यास काय होईल,  अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
या अभ्यासघटकावर येणाऱ्या प्रश्नांची रचना वस्तुनिष्ठ व बहुविधानी स्वरूपाची असते. परिणामी, असे प्रश्न गोंधळात टाकतात, कारण दिलेल्या सर्व पर्यायांमध्ये सूक्ष्म फरक असल्याने चुकीचे अथवा अचूक विधान शोधणे, या विषयातील सर्व संकल्पना, बारकावे ज्ञात करून घेतल्याशिवाय शक्य होत नाही. परिणामी, राज्यघटनेची वरवरची तयारी धोक्यात आणू शकते. 
‘भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया’ या घटकाच्या समकालीन स्वरूपामुळे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. दिल्ली विधानसभेची निवडणूक पार पडली. त्या आधी दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट होती. दिल्लीचा इतर केंद्रशासित प्रदेशापेक्षा असणारा वेगळा दर्जा, दिल्लीविषयीची घटनादुरुस्ती आदी बाबींची माहिती करून घ्यावी. या वर्षी डॉ. आंबेडकरांची १२४ वी जयंती पार पडली. या निमित्ताने त्यांचे घटनानिर्मितीमध्ये असणारे योगदान या विषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून देशामध्ये धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसदीय मुद्दे, संघराज्यवादाविषयी बराच ऊहापोह होताना दिसत आहे. या मुद्दय़ांविषयी राज्यघटनेमध्ये असणाऱ्या तरतुदींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. चालू घडामोडींवर आधारित प्रश्न सोडविण्यासाठी आधीच्या वर्षभरातील घडामोडींचे बारकाईने अवलोकन करावे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दय़ांची राज्यघटनेच्या संदर्भाने तयार करणे उचित ठरेल.
या बरोबरच राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानविषयक पलूंचे अध्ययन करणे फायद्याचे ठरते. यामध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील  (Preamble)  स्वातंत्र्य, समता, बंधूता म्हणजे काय? सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आदी संकल्पना यांचा अर्थ जाणून घ्यावा. मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये या घटकातील तत्त्वज्ञानविषयक पलू माहीत करून घ्यावे. २०१३ च्या पेपरमध्ये ‘आíथक न्याय’ (Economic Justicec) संबंधीचा प्रश्न व मार्गदर्शक तत्त्त्वांमध्ये गांधीवादी मूल्ये अंतíनहित असणारी कलमे कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत. या अभ्यासघटकामध्ये राज्यघटना विषयाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे प्रश्नांची भाषाही कायदेशीर स्वरूपाची व क्लिष्ट असते. अशा वेळी प्रश्नाचे नीट आकलन न झाल्यास आपले उत्तर चुकू शकते. याकरता या घटकाची तयारी सुरू करण्यापूर्वी राज्यघटनेतील सर्व संज्ञा, संकल्पना, त्यातील शब्दांचे अर्थ उदा. अनुच्छेद व अनुसूचीतील फरक, मूलभूत संरचना, राज्य म्हणजे काय, संविधानिक व वैधानिक यातील फरक, संसदेतील वेगवेगळ्या ठरावांचा अर्थ समजावून घ्यावा. यामुळे हा विषय सोपा होऊन जातो.
या घटकाच्या तयारीमध्ये राज्यघटना विषयाचा सर्व भाग, अनुच्छेद, अनुसूची, घटनादुरुस्त्या आपल्याला माहीत असणे क्रमप्राप्त आहे. यासाठी या सर्व बाबींचा तक्ता करून भूगोलातील नकाशासारखा आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवून सातत्याने उजळणी करणे श्रेयस्कर ठरेल. या अभ्यासघटकाची तयारी करताना महत्त्वाच्या घटकाचा प्राधान्याने विचार करावा. मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ व न्यायमंडळ यांचे अधिकार; काय्रे याविषयीचे महत्त्वपूर्ण पलू, राष्ट्रपती, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल यांची नियुक्ती व बडतर्फी, त्याचबरोबर महाधिवक्ता, वित्त आयोग, नियंत्रक व महालेखापाल, निवडणूक आयुक्त, संघ लोकसेवा आयोग इत्यादी महत्त्वपूर्ण संविधानिक अधिसत्ता व प्राधिकारण, महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे इ. घटक  महत्त्वाचे ठरतात.
राज्यघटनेतील सर्व घटकांचे तुलनात्मक अध्ययन फायदेशीर ठरू शकते. उदा. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय, संघ लोकसेवा आयोग, महाधिवक्ता (Attorney General), सातवी अनुसूची (केंद्रसूची) इ. घटकांचे अध्ययन करताना लगेचच राज्य पातळीवर त्यांच्याशी साधम्र्य असणाऱ्या पदांचा व संस्थांचा अभ्यास केल्यास फायदेशीर ठरते व वेळेचीही बचत होते. सर्व 
बाबी दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यासाठी मदत होते.
या अभ्यासघटकाच्या तयारीसाठी सर्वात प्रथम ‘एनसीईआरटी’चे ‘इंडियन कॉन्स्टिटय़ूशन अ‍ॅट वर्क’ हे क्रमिक पुस्तक अभ्यासावे. त्यानंतर ‘इंडियन पॉलिटी’- एम. लक्ष्मीकांत, ‘अवर कॉन्स्टिटय़ूशन’ व ‘अवर पार्लमेंट’- सुभाष कश्यप; त्याचबरोबर ‘भारतीय संविधान व भारतीय राजकारण’, ‘भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया’ हे संदर्भग्रंथ  महत्त्वाचे आहेत. यांच्या बरोबरीने ‘इंडिया इयर बुक’ मधील ‘पॉलिटी’ हे तिसरे प्रकरण, पी.आय.बी., पी.आर.एस. इंडिया आदी संकेतस्थळांबरोबरच ‘द िहदू’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांचे नियमित वाचन करणे फायद्याचे ठरते.

‘धरहरा टॉवर’ची कहाणी

‘धरहरा टॉवर’ची कहाणी

 नेपाळचे पहिले पंतप्रधान भीमसेन थापा यांनी आपल्या मुलीसाठी बांधलेला आणि आता भूकंपाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेल्या टॉवरची नेमकी कहाणी

‘धरहरा टॉवर’ काठमांडूची ओळखच. पण धरणीमाता कोपली आणि उरला फक्त दगडविटांचा ढिगारा.

नेपाळची ओळख असलेल्या धरहरा टॉवरच्या उभारणीची कहाणीही तितकीच विस्मयकारी आहे. ही कहाणी आहे नेपाळच्या पहिल्या पंतप्रधानांची. त्यांचं नाव होतं भीमसेन थापा.

भीमसेन थापा एका नेपाळी सैनिकाचे पुत्र होते. पण तेव्हाचे राजकुमार रणबहादुर थापाशी त्यांची पक्की मैत्री होती. याच मैत्रीनं भीमसेन थापा यांना नेपाळचा पहिला पंतप्रधान बनवलं.

पंतप्रधान बनल्यानंतर भीमसेन थापा यांनी 1826 साली आपल्या मुलीला एक अनोखी भेट दिली. ज्याचं नाव होतं भीमसेन मीनार अर्थात, धरहरा टॉवर

भीमसेन यांची कन्या याच टॉवरच्या शिड्यांवरून नवव्या मजल्यावर जात असे आणि अवघ्या काठमांडूचा नजारा पाहत असे. आपल्या मुलीला आपल्या पित्याच्या ताकदीचा गर्व होऊ नये यासाठी नवव्या मजल्यावर एक शिवलिंगही स्थापित करण्यात आलं होतं.

अनेक पर्यटकांनी याच टॉवरवरून काठमांडू आपल्या नजरेत साठवलं होतं. पण धरणीनं रौद्र रुप दाखवलं आणि 9 मजल्याचा टॉवर बनला फक्त मातीचा ढिगारा.

खरं तर भीमसेन यांनी असे दोन टॉवर बांधले होते. पण दोन्ही टॉवर 1934च्या भूकंपामध्ये जमीनदोस्त झाले.

तत्कालीन पंतप्रधानांनी त्यातला एक टॉवर पुन्हा बांधला आणि त्याचं नामकरण झालं धरहरा टॉवर. पण काळानं या टॉवरला पुन्हा कवेत घेतलं. शनिवारी सकाळी 160 पर्यटकांनी हा टॉवर पाहण्यासाठी तिकीट काढलं...

पण दि २५ एप्रिल २०१५ च्या  भूकंपाच्या एका झटक्यानं होत्याचं नव्हतं झालं. मीनार कोसळली. लोक मदतीसाठी धावले. पण मदतकार्य सुरु असताना पुन्हा एकदा उर्वरित भाग कोसळलाच.

2005 सालीच हा टॉवर पर्यटकांसाठी खुला झाला होता. पण 10 वर्षांच्या सेवेनंतर धरणीमातेनं त्याला पोटात घेतलं. उद्ध्वस्त झाला धरहरा टॉवर आणि काठमांडूचा गौरवही.

गेल्या तीन दशकांतील विनाशकारी भूकंप

*११ ऑगस्ट २०१२- इराणमधील तबरीझ शहराजवळ प्रत्येकी ६.३ व ६.४ क्षमतेच्या दोन भूकंपांमध्ये ३०६ ठार व ३ हजारांहून अधिक जखमी.

*११ मार्च २०११ - जपानच्या ईशान्य भागात सुनामीमुळे ९.० इतक्या प्रचंड क्षमतेच्या समुद्राखालील भूकंपामुळे १८,९०० लोक ठार. या भूकंपामुळे फुकुशिमा दाइची अणुभट्टीत आणीबाणीची स्थिती उद्भवली होती.

*२३ ऑक्टोबर २०११ - पूर्व तुर्कस्तानमध्ये ७.२ क्षमतेच्या भूकंपामुळे ६०० ठार व किमान ४,१५० जखमी.

*१२ जानेवारी २०१० - हैतीमध्ये ७.० क्षमतेच्या भूकंपाचा धक्का. यात अडीच ते तीन लाख लोकांचा बळी.

*१४ एप्रिल २०१० - वायव्य चीनच्या क्विंघाई प्रांतातील युशू परगण्यात ६.९ क्षमतेच्या भूकंपात ३००० लोक ठार व बेपत्ता.

*१२ मे २००८ - चीनच्या नैर्ऋत्य भागातील सिचुआन प्रांतात झालेल्या ८.० क्षमतेच्या भूकंपात ८७,००० लोक ठार किंवा बेपत्ता.

*२७ मे २००६ - इंडोनेशियाच्या योगकारता भागातील जोरदार भूकंपात ६ हजार लोक ठार व १५ लाख लोक बेघर.

*८ ऑक्टोबर २००५ - ७.६ क्षमतेच्या भूकंपात प्रामुख्याने पाकिस्तानचा वायव्य सीमा भाग आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ७५ हजारांहून अधिक लोक ठार व ३५ लाख लोक विस्थापित.

*२८ मार्च २००५ - सुमात्रानजीकच्या इंडोनेशियाच्या नीस बेटावरील भूकंपात ९०० ठार.

*२६ डिसेंबर २००४ - सुमात्रा बेटाच्या किनाऱ्यानजीकच्या समुद्राखालील प्रचंड भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीत इंडोनेशियातील १,६८,००० लोकांसह हिंदी महासागरालगतच्या देशांमधील २ लाख २० हजार लोक ठार.

*२६ डिसेंबर २००३ - इराणच्या बाम शहरात ६.७ क्षमतेच्या भूकंपात किमान ३१,१८४ लोक ठार व १८ हजार जखमी.

*२६ जानेवारी २००१ - गुजरातमध्ये ७.७ क्षमतेच्या भूकंपात २५ हजार लोक ठार व १,६६,००० जखमी.

*३० सप्टेंबर १९९३ - महाराष्ट्रातील किल्लारीनजीक ६.३ क्षमतेच्या भूकंपात ७,६०१ लोक ठार.

*२० ऑक्टोबर १९९१ - उत्तर प्रदेशातील हिमालयीन पायथ्याशी ६.६ क्षमतेच्या भूकंपात ७६८ लोक ठार.

*२० ऑगस्ट १९८८ - ६.८ क्षमतेच्या भूकंपात पूर्व नेपाळमध्ये ७२१, तर नजीकच्या बिहारमध्ये २७७ ठार.

*२८ ऑगस्ट १९७६ - उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील तांगशान येथे ७.८ क्षमतेच्या भूकंपात २,४२,००० लोक ठार झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे. मात्र काहीजणांच्या मते बळींचा आकडा याहून अधिक.

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

'कॅम्पस इंटरव्ह्यू'ची तयारी

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी खुल्या व्हाव्यात, म्हणून उद्योगक्षेत्राच्या मदतीने अनेक दर्जेदार महाविद्यालयांमध्ये 'कॅम्पस इंटरवूज' मोहीम राबवली जाते. आजवर केवळ दर्जेदार अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांत कॅम्पस इंटरव्ह्य़ूजचे आयोजन केले जायचे. मात्र, अलीकडे पारंपरिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या (प्रामुख्याने गणित, सांख्यिकी, रसायनशास्त्राच्या पदवीधरांसाठी) निवडक महाविद्यालयांमध्येही 'कॅम्पस इंटरवू' होतात. अशा मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कुठली पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते, याचे कानमंत्र.

पूर्वतयारी 
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांकडून तसेच अन्य माजी विद्यार्थ्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्य़ू संदर्भात असलेल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. याकरता विद्यार्थ्यांना इंटरनेटचीही मदत घेता येईल. 
आपल्या महाविद्यालयात कोणकोणत्या खासगी कंपन्या उमेदवार निवडीसाठी येणार आहेत,
याद्वारे दर वर्षी किती विद्यार्थ्यांना नोकरी मिळते, निवड झालेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी किती असते, अशा गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवावी. 
अशा मुलाखतींत पात्र ठरण्यासाठी आवश्यक ठरणारी अर्हताही विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी. या संदर्भातील अनेक अटींच्या पूर्ततेसाठी तसेच आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी आधीपासूनच पावले उचलणे गरजेचे असते. 
उदाहरणार्थ - विद्यार्थ्यांची उत्तम शैक्षणिक कारकीर्द हा अर्हतेचा निकष असतो. शिक्षणक्रमाची सर्व वष्रे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे, प्रकल्प काम उत्तमरीत्या पूर्ण करणे, शिक्षणेतर उपक्रमांमधील यश या बाबी निवडीस पूरक ठरू शकतात. बहुतेक महाविद्यालयांमध्ये अशा मुलाखतींची तयारी करून घेणारे प्रशिक्षणवर्ग आयोजित केले जातात अथवा स्वतंत्र कक्ष स्थापन केले जातात. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी जरूर उपयोग करून घ्यावा.

प्रशिक्षणासाठी सज्ज व्हा..
प्रशिक्षण काळात आपल्याला नक्की कोणते ज्ञान संपादन करण्यात रुची आहे, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे काम करायला आवडेल, संशोधन करायचे आहे की उच्च शिक्षण घ्यायचे आहे, नोकरी करायची आहे, की स्वयंरोजगाराचा मार्ग शोधायचा आहे हे उमेदवारांनी निश्चित करणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा कॅम्पस मुलाखतीद्वारे उमेदवारांना कोणत्या कामात स्वारस्य आहे हे शोधले जाते आणि त्यानुसार पुढे त्यांच्यावर विशिष्ट कार्यभार सोपवला जातो. उदा. एखाद्या उमेदवाराला मार्केटिंग विषयक कामात रस असेल आणि त्याचे संवाद कौशल्य उत्तम असेल, तर निवड झाल्यानंतर अशा व्यक्तीला कंपनीच्या मार्केटिंग विभागात सामावून घेतले जाते. एखाद्या उमेदवाराला तांत्रिक कामाची आवड आहे, तांत्रिक बाबींची उत्तम जाणही आहे. मात्र, त्याचे संवाद कौशल्य कमकुवत आहे, अशा उमेदवाराला निवडीनंतर कंपनीच्या देखभाल व दुरुस्ती सेवा विभागात सामावून घेतले जाऊ शकते.

कॅम्पस मुलाखतीच्या दोन किंवा अधिक फेऱ्या असू शकतात. प्रथम गटचर्चा फेरीत उपस्थित उमेदवारांमधील पुढाकार घेण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, सांघिक गुण, संवाद कौशल्य हे गुण हेरले जातात. व्यक्तिगत मुलाखतीच्या फेरीत, विद्यार्थ्यांची वैयक्तिक क्षमता अजमावली जाते. या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांसाठी विद्यार्थ्यांनी तयार असणे महत्त्वाचे! काही वेळा निवडप्रक्रियेत वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाच्या लेखी परीक्षेचाही समावेश केला जातो. या फेरीतील प्रश्न प्रामुख्याने शिक्षणक्रमातील मूलभूत संकल्पना व त्यांचे उपयोजन यांवर आधारित असतात. 
* पेहराव, देहबोली- मुलाखतीचे स्वरूप लक्षात घेता व्यावसायिकतेचे भान ठेवून पेहराव करणे अथवा देहबोली असणे आवश्यक आहे. 
* अनावश्यक दडपण टाळणे योग्य- कॅम्पस मुलाखतीच्या संधीकडे गांभीर्याने बघणे आवश्यक असले तरी या मुलाखतीचे अनावश्यक दडपण घेऊ नये, अन्यथा प्रत्यक्ष मुलाखतीतील कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लक्षात घ्यायला हवे, की ही कॅम्पस मुलाखत म्हणजे आपल्या करिअरसाठी एकमेव अथवा अखेरची संधी नाही. त्यामुळे कॅम्पस इंटरव्ह्य़ूचा अवाजवी ताण घेणे टाळावे.
* एकाच दिवशी एकापेक्षा अधिक किंवा सलग मुलाखतींना सामोरे गेल्यास उत्तरांमध्ये एकसुरीपणा येण्याची शक्यता असते. अशाने मुलाखतीच्या पॅनेलसमोर तुमची कामगिरी सुमार, रटाळ होऊ शकते. म्हणून सरसकट सर्वच मुलाखतींना सामोरे जाण्यापेक्षा, विचारपूर्वक निवडक मुलाखतींमध्ये सहभागी होणे हिताचे ठरते. 
* मुलाखत संपताना, मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे बिझनेस कार्ड आठवणीने मागून घेणे, भविष्यात लाभदायक ठरू शकते.

मुलाखतीचे गांभीर्य
महाविद्यालयांतील कॅम्पस मुलाखतीद्वारा योग्य क्षमता असलेल्या उमेदवारांना आघाडीच्या कंपनीमध्ये नोकरीची उत्तम संधी मिळू शकते आणि त्यामुळे शिक्षणानंतर नोकरीसाठीचा 'स्ट्रगल पिरियड' विद्यार्थ्यांच्या वाटय़ाला येत नाही. कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांची खातरजमा महाविद्यालयांनी केलेली असते. त्यामुळे अशा ठिकाणी फसवणुकीची शक्यता नगण्य असते. त्यामुळेच अशा सोनेरी संधींकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहायला हवे.

सहभागी कंपन्यांचा पूर्वअभ्यास 
* मुलाखत घेणाऱ्या कंपनीबद्दल शक्य तेवढी माहिती करून घ्यावी. उदाहरणार्थ, त्या कंपनीच्या शाखा, सुरू असलेले प्रकल्प, भविष्यातील प्रकल्प, उत्पादने व उत्पादन प्रक्रिया याविषयी विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक ठरते. अलीकडे इंटरनेटमुळे हे सहजशक्य झाले आहे. ही सर्व माहिती करून घेतल्याने उमेदवाराला आत्मविश्वासाने उत्तरे देता येतात.
* आपण शिकत असलेल्या महाविद्यालयांप्रमाणेच शक्य असल्यास इतर महाविद्यालयांत आयोजित केल्या जाणाऱ्या रोजगार मेळाव्यांना भेट द्यावी. अशा ठिकाणी समवयस्क विद्यार्थी तसेच व्यावसायिकांशी ओळखी होतात. त्यातून कामाच्या नव्या संधी मिळू शकतात.
* संक्षिप्त माहिती- महाविद्यालयीन अभ्यासाव्यतिरिक्त, पूर्ण केलेल्या इन्टर्नशिपबद्दल तसेच प्रकल्प कामांबद्दल छोटेखानी अहवाल सादर करावा. त्यातून उमेदवाराची आकलन क्षमता, विषयांची जाण, कौशल्य दिसून येते. करिअरच्या यशस्वी वाटचालीसाठी सादरीकरण ही कला अवगत असणे मदतीचे ठरते.

मुलाखतीचे स्वरूप
या अंतर्गत निरनिराळ्या खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या महाविद्यालयांत प्रत्यक्ष जाऊन, कंपनीच्या गरजेप्रमाणे सक्षम, गुणवान विद्यार्थ्यांची निवड करतात आणि त्यांना नोकरीची संधी देऊ करतात.

मुलाखतीचा हेतू 
* उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे आणि भविष्यात कंपनीला अशा उमेदवारांची गरज भासल्यास त्यांना नोकरीची संधी देणे. 
* निवडक उमेदवारांना गरजेनुसार काही काळ प्रशिक्षण, विद्यावेतन देऊन पुढे नोकरीत सामावून घेणे. 
* काही वेळा देशांतर्गत किंवा देशाबाहेरील पदव्युत्तर शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधीसाठी या मुलाखतींचे आयोजन केले जाते. 
* मुलाखतीचा हेतू जाणून घेत, त्यानुसार तयारी करणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लाभदायक ठरते. ही माहिती उमेदवारांना महाविद्यालयातील संबंधित शिक्षक किंवा विभाग अधिकाऱ्याकडूनही मिळू शकते. क्वचितप्रसंगी संबंधित कंपनीच्या कार्यालयातूनही मिळवता येते. प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान, विद्यार्थ्यांना कंपनीच्या हेतूविषयक चाचपणी करता येईल. आपल्या पदरात कुठले लाभ पडणार, कॉन्ट्रॅक्ट अथवा बॉण्डचे स्वरूप आणि त्यातील नियम यांची चर्चा विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत तज्ज्ञांशी करता येईल.

मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

'जॉनी लिवर'



जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा 'जॉन प्रकाश ' लहानाचा मोठा झाला. घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची. त्याचे वडील 'हिंदुस्तान लिवर 'मध्ये मजुरी करायचे. त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममध्ये तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत. अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं. कंपनीमध्येही विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा. कामगारांनी तर त्यांच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील 'लिवर' त्याच्या नावाला जोडून त्याला 'जॉनी लिवर' हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार. अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या नजरेस पडला. त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले,की त्यांनी त्याला त्यांच्या "कल्याणजी आनंदजी शो " साठी परदेश दौ-यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना त्यांचा 'गॉडडफादर ' मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली. पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला.१९९२ मध्ये आलेल्या 'बाजीगर' मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजवू लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला 'फिल्मफ़ेअर' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दरवर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच. यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतील त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडीअडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला. जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ट्युमर काढला तर मुलाला पैरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते,हे सांगितलं. त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला. मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहंचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली.त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही. मित्रानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मलो, यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. आमच्यातील अंगभूत गुणच आम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ देईल....

सोमवार, २० एप्रिल, २०१५

स्मार्टफोन खरेदी करताना...........

बजेट स्मार्टफोनची सध्या खूप चलती आहे. चांगला फोन घेण्यासाठी आता खिशाला फार चाट पडत नाही. कमी किंमतीचे अनेक स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत, जे तुमच्या बजेटमध्येही आहेत आणि त्यांचे फीचर्सही जबरदस्त आहेत. परंतु कमी किंमतीत जास्त मिळवण्याच्या प्रयत्नात धोकाही होऊ शकतो. त्यामुळे बजेट स्मार्टफोन खरेदी करताना या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा.  

1. हाय-एंड स्मार्टफोनशी तुलना करु नका
बरेचसे बजेट स्मार्टफोन युझर्स विचार करतात की, एक स्वस्त स्मार्टफोन दुप्पट किंमत असलेल्या हायएंड स्मार्टफोनपेक्षा कमी पॉवरफुल असतो. यामुळे अनेक वेळा तक्रारी येतात आणि त्याच्या परफॉर्मन्सना युझर्स नाराज असतात.

शाओमी रेडमी नोट आणि युरेका यांसारखे काही फोन हायएंड डिव्हायसेसच्या बऱ्याच जवळ पोहोचले आहेत. पण इतर स्मार्टफोन या हायएंड डिव्हायसेसच्या जवळही पोहोलेले नाहीत.

पण लक्षात ठेवा हे बजेट स्मार्टफोन आहेत. लक्षात ठेवा यामध्ये युझर्सना स्क्रीन रिझॉल्यूशन, प्रोसेसर टाईप आणि स्पीड, रॅम, कॅमेरा क्वॉलिटी, बिल्ड क्वॉलिटी आणि बॅटरी लाईफसारख्या अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागणार. त्यामुळे ही बाब फोन खरेदी करताना ध्यानात असू द्या.


2. फीचर्स व्यवस्थित तपासून घ्या
बजेट स्मार्टफोन विकण्यासाठी निर्माते फोनमधून अनेक फीचर्स हटवतात, जे खरेदी करताना आपल्या लक्षातही येत नाहीत. याचप्रकारे 4 GB इंटरनल स्टोअरेजमध्ये युझर्स फक्त 2 GB चा वापर करु शकतात. फोनच्या 4.7 इंचाच्या स्क्रीनचं रिझॉल्यूशन फक्त 800x480 पिक्सेल असू शकतं.

कनेक्टिव्हिटीच्याबाबती फोनमधून वायफाय डायरेक्ट, NFC आणि नवं ब्लूटूथ 4.0 हटवलेलं असू शकतं.

पैसे देण्याआधी सर्व फीचर्स आहे की नाही हे तपासावं. कॅमेऱ्यात ऑटोफोकसच्या कमतरतेमुळे फोटो क्लिक करताना युझर्सना अडचणी येऊ शकतात. यावरही युझर्सनी लक्ष द्यावं.

3. हार्डवेअरवर फोकस
स्मार्टफोन निवडताना हार्डवेअर स्पेसिफिकेशन योग्यारित्या तपासणं आवश्यक आहे. बजेट फोन असल्यामुळे तो फक्त एण्ट्री-लेव्हल हार्डवेअरच काम करतो, हे गरजेचंच नाही. प्रोसेसर (ऑक्टा कोअर प्रोसेसर), रॅम (जेवढा जास्त तेवढा बरा) आणि उपलब्ध स्टोअरेज चेक करा (एक्स्पांडेबल स्टोअरेजच नेहमी घ्या)

याशिवाय डिस्प्ले साईज आणि रिझॉल्यूशन, कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स, बॅटरी कपॅसिटी याही आणखी गोष्टी आहेत, ज्यावर  लक्ष देणं आवश्यक आहे. याशिवाय फोन खरेदी करण्याआधी सुरुवातीला एक डेमो फोनमध्ये त्याची बिल्ड क्वालिटी, बटण प्लेसमेंट आणि पोर्ट पाहून घ्या.

4. ऑपरेटिंग सिस्टमचं व्हर्जन तपासा
जुने अँड्रॉईड, विण्डोज आणि ब्लॅकबेरी व्हर्जनवर सुरु असलेले स्मार्टफोनही सध्या उपलब्ध आहेत. बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन घेण्याचा निर्णय पक्का केल्यास सर्वात आधी ऑपरेटिंग सिस्टमवर लक्ष द्या. ऑपरेटिंग सिस्टमचं जुनं व्हर्जनमुळे फोन अडकायला नको हेच युझर्सना अपेक्षित आहे.

वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी वेगवेगळ्या हार्डवेअरची आवश्यकता असते. अँडॉईडच्या लेटेस्ट व्हर्जनच्या तुलनेत विण्डोज ऑपरेटिंग सिस्टमच्या लेटेस्ट व्हर्जनसाठी कमी प्रोसेसर स्पीड आणि रॅमची गरज असते. शिवाय थर्ड पार्टी अॅप प्री-इन्स्टॉल्ड आहेत आणि ते अनइन्स्टॉल केल्यावर फोनच्या परफॉर्मन्सवर काही फरक पडेल का? हे देखील तपासून पाहा

5. आफ्टर सेल्स सपोर्ट
अनेक स्मार्टफोन एका वर्षाच्या वॉरंटीसोबत येतात. पण जर सर्व्हिस सेंटर जवळ नसेल तर या वॉरंटीचा काहीच फायदा नाही. 

कंपनीच्या वेबसाईटवर जवळचे सर्व्हिस सेंटर शोधा. विविध फोरममधून व्हेरिफाय करा की कंपनीची सपोर्ट  रेप्युटेशन कशी आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये स्मार्टफोनचे स्पेअर पार्ट्स न मिळण्याची समस्या उद्भवू शकते.

आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाला ६० वर्षे पूर्ण झाली. April 2015

 आकाशवाणीच्या बातम्यांनी त्याकाळी लोकांना भोवतालच्या घटना-घडामोडींविषयी सजग करण्याचं महत्त्वाचं काम तर पार पाडलंच; शिवाय या विभागात काम करणाऱ्या अनेक दिग्गज मंडळींशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातंही जुळलं. आकाशवाणीच्या वृत्तविभागाच्या साठीनिमित्ताने एकेकाळी या वृत्तविभागात काम करणाऱ्या वृत्तनिवेदिका ललिता नेने यांच्याशी मारलेल्या स्वैर गप्पा..

'हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे सहा वाजून ५७ मिनिटे झाली आहेत. थोडय़ाच वेळात बातमीपत्र प्रसारित करीत आहोत..' या उद्घोषणेनंतर घराघरांत सगळ्यांचे कान 'रेडिओ'शी जोडले जायचे. रेडिओवरच्या बातम्या हे जर देशभर घडणाऱ्या घटनांचा कानोसा घेण्याचं माध्यम असेल तर त्या बातम्या वाचणारे वृत्तनिवेदक हे त्याकाळी 'स्टार' होते. आजच्या संगणकाच्या, मोबाइल फोनच्या युगात बातमीदारी करणे हे तसे अवघड राहिलेले नाही. मात्र, कुठल्याही सोयीसुविधा नसताना देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जमवायच्या, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आणि दहा मिनिटांच्या बातमीपत्रातून ठरावीक मुद्दय़ांना अधोरेखित करत अचूक उच्चारांसह, अमुक एका आवाजाच्या पट्टीत, एका तालात, एका वेगात वाचून त्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायच्या हे काम खचितच सोपे नव्हते. आकाशवाणीच्या या वृत्तविभागाला साठ र्वष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'कशी होती रेडिओवरची ही बातमीदारी?, बातमीपत्र तयार करण्यापासून ते वाचून दाखविण्यापर्यंतची प्रक्रिया, आकाशवाणीच्या वृत्त- विभागात काम करणारी माणसे हा पट या वृत्तविभागामध्ये एकेकाळी गाजलेल्या वृत्तनिवेदिका ललिता नेने यांनी आपल्या आठवणींमधून उलगडला..
'आकाशवाणीच्या वृत्तविभागात माझा प्रवेश झाला होता तो 'व्हॉइस आर्टिस्ट' म्हणून. त्यावेळी मो. ग. रांगणेकर आणि नीलम प्रभू यांनी माझी परीक्षा घेतली होती. त्यांनी कुठल्याशा कादंबरीतील एक उतारा मला वाचून दाखवायला सांगितला. त्यानंतर 'व्हॉइस आर्टिस्ट' म्हणून त्यांनी माझी निवड केली. पण प्रत्यक्ष वृत्तनिवेदक म्हणून काम देण्यासाठी पुन्हा परीक्षा, काम अशा दीर्घ प्रक्रियेतून जावं लागलं होतं,' असं ललिता नेने सांगतात. 'त्याकाळी आकाशवाणीच्या वृत्तविभागात फक्त मी आणि शरद चव्हाण असे दोघेच वृत्तनिवेदक होतो. आणि आकाशवाणीच्या या वृत्तविभागाचं वर्णन करायचं झालं तर माझ्या डोळ्यासमोर गावातील अस्ताव्यस्त एसटी स्टँडचीच प्रतिमा येते,' असं त्या हसत हसत सांगतात. 'एसटी स्टँडसारखीच अवस्था असायची तिथे. टेबलांवर रचलेल्या फायली.. सगळीकडे पसरलेले कागद.. तिथेच टेबलावर झोपलेली रात्रपाळीची माणसं.. असं सगळं चित्र असायचं. म्हणजे पहाटेची डय़ुटी कधी असेल तर या झोपलेल्या मंडळींना प्रथम उठवायचं, फायलींमधून आदल्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमधून आलेल्या बातम्यांचे कागद, 'पीटीआय'वरून भाषांतरित केलेल्या बातम्यांचे कोगद असं सगळं तपासायचं आणि मग पहिलं बुलेटिन तयार केलं जायचं,' असं त्या सांगतात. 'मुळात बातमीपत्रात काय काय घ्यायचं आहे, ऐनवेळी बातमीपत्रात बातम्या कमी पडल्या तर वृत्तनिवेदकाने काय करायचं, याची माहिती देणारं कोणीच नव्हतं. आमचे 'एडिटर' विभागात असायचे. मात्र, त्यांची जबाबदारी ही आमच्या हातात ते बातमीपत्र सोपवण्यापुरतीच असायची. म्हणजे आकाशवाणीचे वार्ताहर, प्रतिनिधी आणि संपादक यांच्यावर बातम्या आणण्याची आणि लिहिण्याची जबाबदारी असली तरी त्या बातम्या वाचताना प्राधान्याने कुठल्या बातम्या घ्यायच्या, ऐनवेळी वार्ताहराक डून मजकूर मिळाला नाही की तिथे दुसरी बातमी घेऊन, ती करून घेणं अशा अनेक गोष्टी आम्ही तिथं शिकत गेलो,' असं ललिता नेने म्हणतात. 
वृत्तनिवेदन करणाऱ्यांना अनेक गोष्टींचं भान असावं लागतं, हे सांगताना त्यावेळी वृत्तनिवेदक म्हणून काम करत असताना घडलेल्या गमतीजमतींची एक लडच्या लडच त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून ऐकायला मिळाली. 'त्यावेळी आम्हाला जिल्हा वार्तापत्रं असायची. शिवाय, मानवी भावभावनांशी संबंधित बातम्या सांगणारं पाच मिनिटांचं एक बुलेटिनही तयार करावं लागायचं. म्हणजे- 'काही भिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्वत:ची बँक तयार केली होती..' अशा बातम्या ऐकण्यात लोकांना खूप रस असतो. त्यामुळे अशाही बातम्यांचं बुलेटिन द्यायचं हीसुद्धा एक जबाबदारी होती. एखाद्या जिल्ह्य़ाचं वार्तापत्र तयार करताना संबंधितांकडून मजकूरच आला नाही की मग गोंधळ उडायचा. आमच्या बाबतीत तर बीडचं वार्तापत्र आलं की सगळं कठीणच होऊन बसायचं. मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागाकडून जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ांचे वृत्तविशेष यायचे, त्यांची अशावेळी खूप मदत व्हायची,' असं त्या सांगतात. 'मात्र, त्यातून कधी काम साधायचं, तर कधी फटफजितीही व्हायची. तरी चुकतमाकत शिकण्यावाचून पर्यायच नव्हता. पहिली टेस्ट टय़ूब बेबी जन्माला यायची होती तेव्हाची गोष्ट सांगते. आम्ही आधीच मुलाखत घेऊन ठेवली होती. आणि आता सात वाजता मी बातम्या वाचण्यासाठी जाणार त्याआधीच ते बाळ जन्माला आल्याची वार्ता आम्हाला समजली. त्यावेळी आमच्याकडे वसंतराव देशपांडे एडिटर होते. त्यांनी लगोलग छान बातमी लिहून माझ्या हातात ठेवली. ती ऐनवेळी वाचायला हातात घेतल्याने मजकूर माहिती नव्हता. त्यात लिहिताना बाळ पाचशे किलोग्रॅमचे आहे, असं लिहिलं गेलं होतं. पाचशे किलोग्रॅम म्हणजे झालं काय? काहीतरी चूक झाली आहे, ही विचारप्रक्रिया मेंदूत सुरू झाली तरी बातम्या सांगताना थांबणं शक्य नव्हतं. काही सेकंदाचा पॉजही ऐकणाऱ्याच्या सहज लक्षात येतो. त्यावेळी क्षणभर थांबून मी पाचशे ग्रॅम असं वाचण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने बातम्या वाचून बाहेर पडले तेव्हा न्यूजरूममध्ये क ोणी तक्रार केली नाही की श्रोत्यांचेही फोन आले नाहीत, तेव्हा कुठे हायसं वाटलं. मात्र, ही टांगती तलवार नित्याचीच असायची.' 'तेव्हा दूरदर्शनचा एवढा प्रभाव नव्हता. तरीही बातम्या देण्याच्या बाबतीत या दोन माध्यमांमध्ये नेहमीच स्पर्धा असायची,' असं त्या सांगतात. 'पुण्यात 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'चा राग मनात ठेवून जनरल अरुणकुमार वैद्यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा आम्ही मुंबईत त्यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्याचवेळी पुण्यातून आमच्या वार्ताहरांचा फोन आला. त्यांनी त्या घटनेचे अगदी बारीकसारीक तपशील पुरवले आणि त्या दिवशीची बातमी छान रंगली. डॉ. काशिनाथ घाणेकरांचं निधन झालं तेव्हाही खुद्द बाळ कुडतरकरांनी ताबडतोब फोन करून आम्हाला सविस्तर बातमी दिली होती. आकाशवाणीवर ती बातमी पहिल्यांदा दिली गेली. असं काही झालं की न्यूजरूममधून बाहेर पडताना आमच्याही मनाला एक समाधान मिळायचं. आमच्याकडून चांगल्या पद्धतीने बातम्या श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या की होणारा आनंद वेगळाच असायचा. नाहीतर दैनंदिन बातम्या असायच्याच की हो. म्हणजे 'बाजरीचं एवढं एवढं उत्पन्न झालं' अशी हेडलाइन आमच्या हातात पडली की आज आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही हे लक्षात यायचं. मग त्यातल्या त्यात जिल्ह्य़ांच्या बातम्या पहिल्या, अमुक एखादी घटना दुसरी असा प्राधान्यक्रम लावून त्या दिवशीचं बातमीपत्र साजरं व्हायचं,' हे सांगताना त्या मिश्कीलपणे हसल्या. 
अर्थात आकाशवाणीच्या त्या छोटेखानी वृत्तविभागात काम करणाऱ्या अवलिया सहकाऱ्यांमुळे घडलेल्या किश्श्यांच्या आठवणीही त्यांच्याकडे कमी नाहीत. 'काही वार्ताहरांनी लिहिलेल्या बातमीतली अक्षरं लागत नसली की गोंधळ उडायचा. काही आपल्या आग्रही मतांमुळे अडचणीत आणायचे. तर कधीतरी अगदी नकळत गोंधळ उडायचा. मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना असाच एक अफलातून किस्सा घडला होता. रेल्वेमंत्री असताना दंडवते कुठल्याशा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते नेमकं वर्ष कुठलं, हे आठवत नाही. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे मधु दंडवते साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून जे भाषण करणार होते त्याची छापील प्रत आमच्याकडे आली होती आणि त्यांच्या भाषणाच्या दिवशी त्यावरची बातमी करून ते वाचून दाखवायचे होते. त्यांच्या भाषणाची प्रत आमच्या कुसूम रानडेंकडे आली होती. त्यांनीही त्यावर छान बातमी तयार करून ती आमचे एडिटर वसंतराव देशपांडेंकडे आणून दिली. बातम्यांच्या गोंधळात देशपांडेंनी ती त्याच दिवशीच्या बातमीपत्रात समाविष्ट केली. आणि साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच दंडवतेंच्या भाषणाची बातमी राज्यात सगळ्यांनी ऐकली. खरं तर यावर फारच मोठा गहजब व्हायचा. पण दंडवतेंनी तेव्हा या घटनेवर एक छान कोपरखळी मारली.. 'आत्तापर्यंत अर्थसंकल्पाचं भाषण आधीच फोडलं जातं हे माहीत होतं, आता साहित्य संमेलनाची भाषणंही फोडायला सुरुवात झाली की काय?' असो! त्यांच्या कोपरखळीवरच हे प्रकरण निभावलं म्हणून बरं. अशा चुका होत असल्या तरी आकाशवाणीचं प्रस्थ सर्वात जास्त होतं,' असं त्या आग्रहपूर्वक सांगतात. 
'बातमी प्रथमआकाशवाणीवर येणार की दूरदर्शनवर, याबद्दल तेव्हा स्पर्धा असायची. मात्र, टीव्हीचं प्रस्थ तेव्हा एवढं वाढलेलं नव्हतं. उलट, आकाशवाणी हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होती. त्यावेळी आमचं बुलेटिन सात वाजता असायचं आणि दूरदर्शनच्या बातम्या साडेसात वाजता प्रसारित व्हायच्या. पण का कोण जाणे दूरदर्शनने त्यांची वेळ साडेसातवरून आमच्या सातच्या वेळेत आणली. त्याचा फार मोठा फ टका आकाशवाणीच्या बातम्यांना बसला,' असं त्या सांगतात. 'तेव्हापासून शहरातून आकाशवाणीच्या संध्याकाळच्या बातम्या बाद झाल्या. ग्रामीण भागात मात्र प्रतिसाद होता. आकाशवाणीच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. ज्यावेळी हे स्थित्यंतर घडत होतं तेव्हा त्याच्या परिणामांची जाणीवही आम्हाला होत होती. मात्र, ते थांबवणं आमच्या हातात नव्हतं याची खंत आहे. आज माध्यमांमधली स्पर्धा तीव्र झाली आहे. पण काळानुसार आकाशवाणीचंही रूप भलतंच पालटलंय. आता अद्ययावत आणि चकचकीत अशी न्यूजरूम आकाशवाणीकडे आहे. कागद-पेन जाऊन संगणकावर काम सुरू झालं आहे. आणि आता तर टीव्हीप्रमाणेच बातम्या वाचण्यासाठी त्यांनाही सव्‍‌र्हर उपलब्ध होणार आहे असं म्हटलं जातं. पण शेवटी कितीही सोयीसुविधा आल्या तरी वृत्तनिवेदकाकडे जे कौशल्य असावं लागतं ते बदलणार नाही,' असं ललिता नेने ठामपणे नमूद करतात. 
'उपलब्ध वेळेत, योग्य त्या आवाजाच्या पट्टीत, अचूक उच्चारांसह बातमी सांगणं हे वृत्तनिवेदकाचं काम आहे. आकाशवाणीवर वृत्तनिवेदन करताना तांत्रिक गोष्टींचाही तितकाच सांभाळ करावा लागतो. माइकसमोर बातम्यांचे कागद त्यांचा फडफड आवाज होणार नाही याची काळजी घेत नीट धरायचे, माइकवर आपला आवाज योग्य तऱ्हेनं क सा लागेल याचं भान ठेवणं आणि आपली भाषा, उच्चार या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात,' असं ललिता नेने सांगतात. सध्या मराठी भाषेच्या एकूणच उच्चारांबद्दल त्या नापसंती व्यक्त करतात. बोलीभाषा ही आपल्या रोजच्या बोलण्यातून हद्दपारच झाली आहे. असं व्हायला नको होतं. भाषेच्या बाबतीत आपण आग्रहीच असायला हवं असं त्या म्हणतात. 'आकाशवाणीवर काम करणाऱ्यांसाठी तर भाषा हेच त्यांचं शस्त्र असतं. बोलणाऱ्याचा चेहरा लोकांना माहीत नसतो. तरीही आपल्याला ऐकणारे श्रोते त्या आवाजाशी, भाषेशी इतके जोडलेले असतात, याची प्रचीती बाहेर लोक भेटून जेव्हा कौतुक करायचे तेव्हा यायची. आकाशवाणीचे वृत्तनिवेदक म्हणून आम्हाला नावानिशी ओळखणारेही काही चाहते होते,' असं त्या सांगतात. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही आकाशवाणी या माध्यमाची ताकद तेवढीच आहे असं त्यांना वाटतं. 
'आकाशवाणीने आपल्याला घडवलं,' असं ललिता नेने सांगतात. 'ज्या माध्यमात तुमचा चेहरा लोकांना दिसत नाही, ते माध्यम तुम्हाला लोकांचे चेहरे वाचायला शिकवतं. आकाशवाणीने माणसं पारखायला, त्यांचे चेहरे वाचायला आणि लोकांनी न सांगितलेलं असं काही जाणून घेत आपल्या आवाजात सर्वदूर पोहोचवायला शिकवलं.' कितीही अडचणी असल्या तरी एक गोष्ट त्या पुन्हा पुन्हा सांगतात, 'आकाशवाणीचा काळ हा आमच्या घडवणुकीचा होता.. सुखाचा होता.'

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज (18 April 2015) १५८वी जयंती

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज (18 April 2015) १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनीमहाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

बालपण आणि तारूण्य
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

पुनर्विवाह
वयाच्या १४ वर्षीच अण्णांचे लग्न झाले होते. इ.स. १८९१ मध्ये त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेहीअल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक' मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह 'अनाथ बालिकाश्रम' काढला. 'विधवा विवाहोत्तेजक' मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

'लग्न'

'लग्न' हा आयुष्यात येणारा मोठा बदल! जोडीदाराबरोबर नवं आयुष्य सुरू करणं मनाला जितकं सुखावणारं असतं तितकाच 'लग्न' हा शब्द अनेकांचं आणि अनेकींचं मन चिंतेनं भरुन टाकतो. प्रत्येकाचं असणारं स्वतंत्र अस्तित्व लग्नानंतरही तसंच अबाधित राहील का, हा त्यातला पहिला प्रश्न..
प्रश्न - मी सध्या उच्चशिक्षण घेत आहे. माझ्या एका मित्राला मी आवडते असं त्यानं नुकतंच मला सांगितलं. त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितल्यावर मी त्याचा जोडीदार म्हणून विचार करून पाहिला. जोडीदाराबद्दलच्या माझ्या अपेक्षांमध्येही तो बसतो. खरा प्रश्न पुढेच आहे! लग्नानंतर त्या जोडीदाराबरोबर, त्याच्या घरच्यांबरोबर माझं आयुष्य कायमसाठी जोडलं जाणार, आयुष्य पूर्वीसारखे राहणारच नाही या कल्पनेनंच मला कसंतरी वाटू लागलं. लग्न झाल्यावर माणसं बदलून जातात, मला बदलायचं नाहीये. लग्नाबरोबर येणाऱ्या 'कमिटमेंट्स' पाळता पाळता माझं 'मी' म्हणून असलेले अस्तित्वच नाहीसं होईल की काय याची भीती वाटते.
उत्तर- लग्नाबरोबर काय-काय बदल होणार याची तुम्हाला जाणीव होऊ लागलीय. भारतात तरी आपली ओळख ही कुटुंबाशी घट्ट जोडलेली असते, हे सत्य आहे; त्यामुळं असं कुणाशी, त्याच्या कुटुंबाशी कायमचं जोडलं जायला नको वाटत असेल, तर अजुन आपला लग्नाबद्दलचा विचार परिपक्व झालाय असं दिसत नाही. कदाचित तुम्ही या तुमच्या मित्राशी लग्न करु शकलात, तर पुढे ही गोष्ट उलगडत जाईलही. तो आणि त्याचं कुटुंब तुमच्याशी किती जुळवून घेतात, किती तयारी दाखवतात, यावरही ते अवलंबून असेल. पण मुख्य प्रश्न असा आहे की या बदलाला आपण तयार आहोत का, असलो तरी ते आपल्याला उमगतंय का? आणि जर ते सहज, हळू-हळू घडत जाणार असेल, तर त्या भावना अन् प्रसंग अनुभवताना दरवेळी आपली बुद्धी आपल्याला वाईट 'स्पीड ब्रेकर'वरून नेणार का? त्यामुळं आपला आनंदाचा प्रत्येक क्षण हा 'कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन'ची धून ऐकवणाऱ्या अस्मितेचा डंख होऊन तुम्हाला दु:ख देणार का? आणि तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला 'लग्न?, अजिबात करू नकोस!' किंवा 'आधी गोड-गोड बोलणारा मित्र नवरा म्हणून कसा भयंकर प्राणी असतो, अन् त्याच्या घरच्यांना कसं वेळेवरच दूर ठेवलंच पाहिजे,' असे सल्ले देणार का?
तुमच्या मनासारखा सल्ला मी देत नाहीये ना? धक्काच बसला असेल कदाचित तुमच्या वैचारिक अन् बौद्धिक भूमिकेला. पण फक्त लेखी, तेही एकाच भेटीत सांगायचं, तर मलाही थोडीशी रिस्क घ्यायलाच हवी.
लग्नाविषयीच्या तुमच्या भावनांवर जसं तुमचं आयुष्य अवलंबून आहे, तसं तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचंही आहे, त्यांच्या कुटुंबाचंही आहे, अन् होणाऱ्या मुलाबाळांचं, त्यांच्या विकासाचंही आहे. म्हणजे बघा हं, एक हुशार, विचारी, पुरोगामी अन् स्वतंत्र मुलगी ही आपली आताची ओळख. त्यात आता इतक्या इतर सुप्त ओळख असतील, अशी कल्पना तुम्ही बहुतेक केली नसेल. तुम्ही समंजस, खुल्या विचारांच्या, बुद्धिमान, पुरोगामी, हक्कांविषयी जागरूक अशा पत्नी पण व्हाल. जशी पत्नी व्हाल, त्यातून पुढे कशी आई व्हाल, या भूमिका अन् ओळख याविषयीच्या शक्यता उलगडणार आहेत. चालू सेमिस्टरचे पेपर बरोबर सोडवले, तर पुढचे बरोबर सुटण्याची शक्यता जास्त, हे तर तुम्हाला अनुभवातून मान्य व्हायला हरकत नसावी. त्यामुळं थोडा जास्त विचार करु या, आणि तो दुसऱ्याशी ताडून बघू या.
तसं पण तुमच्या मित्रानं तुम्हाला फक्त तुम्ही आवडता इतकंच सांगितलंय. लग्नाबद्दल अजुन कुणीच बोललेलं नाही. तरी पण तुम्ही मनातल्या मनात तसा विचार करुन ठेवणं वाईट नाही किंबहुना आवश्यकच आहे. पण हातातलं सेमिस्टर सोडून याच्यामागे धावावं का, हा पण एक विचार केला पाहिजे. किंवा आपली फसरत होत नाहीये ना, ही पण शंका ठेवली पाहिजे. पण मला बदलायचंच नाहीये, असं म्हणणं म्हणजे, ''दात येणं ही फारच त्रासदायक गोष्ट आहे, बाई! त्यापेक्षा मी आयुष्यभर बाटलीनंच दूध पिईन की,'' असं म्हणण्यासारखं आहे. 
लग्नाबरोबर येणाऱ्या 'कमिटमेंटस्' पाळता पाळता आपली ओळख अजुन वेगवेगळ्या मितींमध्ये उलगडत जाईल, अस्तित्व नाहीसं वगैरे काही होणार नाही, हे पटतंय उमगतंय का बघा. सगळं कदाचित तुम्हाला पटणारही नाही अन् तशी गरजही नाही. पण तुमचा तुम्हाला योग्य निर्णय योग्य वेळी घेता आला की झालं!

उन्हाळा आणि लघवीचा त्रास

'उन्हाळ्यात मुतखडय़ाचा त्रास अनेकांना उद्भवतो. लघवीतले क्षारांचे घटक, खर निघून जाण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मूत्रनलिकेत खडा अडकून पोट दुखण्याचा त्रास होऊ शकतो. २५ ते ५० वयोगटातल्या पुरूषांमध्ये प्रॉस्टेट ग्रंथींना सूज येऊन लघवीला आग आणि जळजळ होण्याची तक्रार दिसते. स्त्रियांमध्ये लघवीला आग होण्याबरोबरच ठणका लागणे, कळ येणे, क्वचित लघवीतून रक्त जाणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला बोली भाषेत 'उन्हाळी लागणे' असे म्हणतात. त्याबरोबर मूत्रमार्गाचा संसर्गही होऊ शकतो. लहान मुलांनाही 'शू'च्या जागी आग होण्याचा त्रास होतो. 
'उन्हाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असल्यामुळे भूक कमी होते. खाण्यात काही अबरचबर आले की पोट बिघडते. पोट बिघडले की लघवीच्या तक्रारीही वाढतात. आतडय़ात ई- कोलाय नावाचे जीवाणू असतात. पोट बिघडते तेव्हा हे जीवाणू उपद्रवी बनतात. या जीवाणूंनी उत्सर्जित केलेल्या विषारी द्रव्यांचा मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. मूत्रमार्गाला सूज आलेली असली तर त्या ठिकाणी जीवाणूंना वाढण्याची संधीच मिळते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठीही ते कारणीभूत ठरतात. 
प्रतिबंधासाठी- 
* पुरेसे पाणी पिणे अर्थातच गरजेचे. काहींना घाम अधिक येतो तर काहींना कमी. पण सर्वसाधारणपणे चोवीस तासांत शरीरात तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण कमीत कमी दोन ते अडीच लिटर असावे या हिशेबाने द्रवपदार्थ घ्यावेत. 
* माठातले वाळ्याचे पाणी प्यायले तरी चांगले. 
* शहाळ्याचे पाणी उत्तम
* नीरा देखील लघवी वाढवणारी असते परंतु ती शुद्ध असावी.
* कलिंगडाचा रस

डॉक्टरांकडे केव्हा जावे-
लघवीला होणारा त्रास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवलेले चांगले. उन्हाळी लागल्यावर काहींना लघवीतून रक्त जाण्यासारखे लक्षण दिसत असले तरी लघवीतून रक्त जाण्याची इतर कारणेही असू शकतात. त्रास नेमका कशामुळे होतो आहे याबद्दलची शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे जावे. मूत्रमार्गाचा संसर्ग असल्यास त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील.

जगातील पहिला स्वयंचलित व्हिडीओ कॅमेरा

भारतीय वंशाचे संगणक वैज्ञानिक श्री के. नायर यांनी कोलंबिया विद्यापीठातील संशोधन संस्थेत स्वयंचलित व्हिडीओ कॅमेऱ्याचा शोध लावला आहे. हा कॅमेरा स्वयंचलित असून तो वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाह्य़ विजेची गरज लागत नाही. अंतर्गत व्यवस्थेमध्ये देण्यात आलेल्या प्रणालीमधूनच ऊर्जानिर्मिती होऊन कॅमेरा काम करतो. 
सध्या आपण डिजिटल छायाचित्रण क्रांतीच्या मध्य युगात आहोत. स्वयंसिद्ध कॅमेरा विकसित करण्याचे आमचे ध्येय होते. कॅमेऱ्यामधून छायाचित्र काढणे हे जसे स्वयंचलित प्रणालीद्वारे होऊ शकते तशीच कॅमेरा वापरण्यासाठीची ऊर्जाही अंतर्गत प्रणालीद्वारे निर्माण होणे गरजेचे होते, असे मत नायर यांनी व्यक्त केले. नायर हे कोलंबिया विद्यापीठाच्या संगणक विभागातील प्रयोगशाळेचे प्रमुख आहेत. या कॅमेऱ्यामध्ये इमेज सेंसर वापरण्यात आला आहे. तसेच पिक्सेल्सची चीपही वापरण्यात आली आहे. यातील पिक्सेल हे फोटोडिओडचे असल्यामुळे ज्या वेळेस उजेड पडतो तेव्हा त्यात विद्युतप्रवाह निर्माण होतो. यामध्ये जे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये पडणाऱ्या उजेडाची घनता मोजण्याचीही क्षमता आहे. या प्रकल्पाचे ह्य़ुस्टन येथील राइस विद्यापीठात २४ ते २६ एप्रिलदरम्यान प्रथम सादरीकरण करण्यात येणार आहे.

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

चॅप्लिनविषयी, त्याच्या सिनेमातील तसेच त्याने मानवजातीला दिलेल्या योगदानाबद्दलचे विशेष लेख..

१६ एप्रिल रोजी जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅप्लिन यांची १२५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने चॅप्लिनविषयी, त्याच्या सिनेमातील तसेच त्याने मानवजातीला दिलेल्या योगदानाबद्दलचे विशेष लेख..
जागतिक रंगभूमीवर शेक्सपीअरचं जे स्थान आहे तेच जागतिक सिनेमात चार्ली चॅप्लिनचं आहे. चॅप्लिनने आपल्या सिनेमांच्या माध्यमातून एका नव्या युगाची, वास्तववादाची सुरुवात केली. त्यातही वैशिष्टय़पूर्ण असं की, चॅप्लिनने त्याच्या आधीच्या कुणाचीही नक्कल केली नाही की कुणाचा कित्ता गिरवला नाही. त्यानं आपली शैली पूर्णपणे स्वतंत्ररीतीनं घडवली. त्याची सिनेमॅटिक भाषा कुठल्याही संस्कृतीतल्या आणि कुठल्याही काळातील लोकांना आवडेल, त्यांच्या हृदयाला भिडेल अशीच होती.. आहे. शेक्सपीअरचं मोठंपण असं सांगितलं जातं की, त्याची नाटकं कुठल्याही संस्कृतीतल्या आणि कुठल्याही काळातल्या लोकांना आवडतात, भावतात; तसंच चॅप्लिनच्या सिनेमांचंही आहे. बरेच महान फिल्ममेकर्स हे शब्दांवर अवलंबून असतात. पण शब्दांशिवायही सिनेमा किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं अगदी टोकाचं उदाहरण म्हणजे चॅप्लिनचे सिनेमे. चॅप्लिनची त्याच्या काळातल्या समाजाची व तत्कालीन राजकारणाची समज व्युत्पन्न अन् व्यामिश्र होती. कमालीचा समजूतदारपणा त्याच्याकडे होता. त्याचं यश हे सामान्य हीरो-हीरोइन्ससारखं नसून ते त्यानं अत्यंत कष्टानं, खूप मेहनतीनं मिळवलं होतं. त्यासाठी त्याला स्वत:च्या मूळ रूपाचा संपूर्ण कायापालट करावा लागला. चॅप्लिनचं वास्तव जीवन आणि सिनेमातील चॅप्लिन हे पूर्णपणे वेगळे होते.
आणखीन एक विलक्षण गोष्ट. चॅप्लिनची नक्कल आजवर अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यापैकी कुणीही त्याच्या जवळपासही पोहोचू शकलेलं नाही. दुसरा चॅप्लिन अजून जगात निर्माण झालेला नाही.. यापुढेही होईल असं वाटत नाही. चॅप्लिन उत्कृष्ट नकलाकार होता. पण त्याची नक्कल मात्र कुणालाही करणं शक्य झालं नाही. ती साधी असती तर ते शक्य झालं असतं. पण ती तशी नाही. त्याकाळच्या प्राचीन फॉर्ममधून चॅप्लिननं आपली सिनेमाची भाषा घडविली. फोटोग्राफी आणि व्हिडीओच्या माध्यमातून घडत असलेल्या भाषेपेक्षा ती पूर्णपणे वेगळी होती. स्वयंभू होती. सिनेमाची भाषा कॅमेऱ्यातून घडते, पण चॅप्लिनने आपल्या शरीराचा वापर करून आपल्या सिनेमाची भाषा घडविली. नाटकाचे जे जे क्लासिकल फॉर्मस् मानले जातात, त्या सर्वाचा चॅप्लिनच्या सिनेमात सुरेखपणे वापर केलेला दिसून येतो. 
चॅप्लिनची प्रश्न विचारण्याची, अर्थपूर्ण प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उभे करण्याची आणि त्यांना अस्वस्थ करण्याची क्षमता अफलातून होती, आहे. मार्क ट्वेनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे- 'द मोस्ट सिव्हिलाइज्ड वे टु बीकम सॅड इज टू लाफ.' ते चॅप्लिनच्या सिनेमांतून पूर्णत: उतरलेलं आहे. 
गुरुदत्त म्हटलं की 'कागज के फूल' आठवतो, तसा चॅप्लिनचा 'द ग्रेट डिक्टेटर' आठवतोच आठवतो. चॅप्लिनचे अनेक सिनेमे मी पाहिले. त्यातून मला बरंच शिकायला मिळालं. हुकूमशाहीविषयी मनात घृणा निर्माण झाली. हा चॅप्लिनच्या सिनेमाचा परिणाम आहे. पोटात काहीच नसेल तर बूट उकळून ते काटय़ा-चमच्यानं खाणं.. या दृश्यातून अंगावर शहारे येतात. गरीबांविषयीची आस्था आणि कणव चॅप्लिनच्या सिनेमातून सतत दृग्गोचर होते. चॅप्लिनने त्याच्या प्रत्येक सिनेमात मुखवटे फाडून टाकण्याचं काम केलं आहे. 
१९७५ च्या सुमाराची गोष्ट. मी तेव्हा इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात होतो. तिथे फिल्म क्लब होता. त्यात सतत सिनेमे दाखवले जात. या विद्यापीठात जगभरातून आलेले विद्यार्थी होते. रशियन, जपानी, चिनी, भारतीय.. या सर्व विद्यार्थ्यांचा आवडता हीरो होता चॅप्लिन. हे विद्यापीठ टेक्स्टाइल कामगारांचं होतं. लीड्स हे गिरणगाव होतं. गिरणी कामगारांनीच स्थापन केलं होतं. या विद्यापीठात स्टुडंट्स युनियनचा एक मोठा हॉल होता. त्याची ५० फूट लांबलचक भिंत होती. त्या भिंतीवर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी काढलेली चॅप्लिनची वेगवेगळी चित्रं होती. दरवर्षी मुलं त्यात नवीन चित्रं काढत आणि त्यावर आपली सही करत. ही सर्व चित्रं काळ्या रंगानं काढलेली होती. प्रागतिक, डावे, गरीबांचे सहानुभूतीदार आणि हुकूमशाहीच्या विरुद्ध असलेल्या या विद्यार्थ्यांचं चॅप्लिन हे दैवत होतं. 
जगभरच्या सिनेमाप्रेमींचा आवडता हीरो जेम्स बाँड आहे; पण खऱ्या अर्थानं जगभरच्या सिनेमाप्रेमींच्या मनावर राज्य मात्र चॅप्लिननंच केलं. त्याला अजूनपर्यंत तरी कुणीही आव्हान देऊ शकलेलं नाही. चॅप्लिन सिनेमाप्रेमींच्या मनाचा अनभिषिक्त राजा, सम्राट आहे. चॅप्लिनला मी शेक्सपीअर, डान्टे, ज्ञानेश्वर यांच्या मालिकेत बघतो. 
लॉरेल हार्डी आणि चॅप्लिनच्या विनोदात मूलभूत फरक आहे. हार्डीचा विनोद हा गमतीशीर, हलकाफुलका आणि थोडासा शरीरत्वावर आधारलेला आहे. याउलट, चॅप्लिनचं आहे. त्याचा विनोद हा विनोद नाही, तो उपहास आहे.. विडंबन आहे. वेदना आणि विनोद चॅप्लिनच्या सिनेमांतून वेगळे करताच येत नाहीत. हार्डीने कॉमेडी सादर केली, तर चॅप्लिनने वास्तववाद सादर केला. ती कॉमेडी नाही की गंमत नाही.
माझी चॅप्लिनभक्ती आंधळी आहे. तो माझ्यासाठी कायमच 'आयडल', हीरो राहिलेला आहे. चॅप्लिनच्या या वास्तववादाचा मला मराठी-हिंदीमधील साहित्य आणि सिनेमामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही प्रभाव दिसत नाही. आणि हे माझ्यासाठी कायम कोडं बनून राहिलेलं आहे. दुर्दैवानं आपल्या देशात चॅप्लिनच्या वास्तववादाचा स्वीकार केला गेला नाही. इटालियन सिनेमावर चॅप्लिनचा मोठा प्रभाव आहे. काही प्रमाणात फ्रेंचवरही आहे. काही वर्षांपूर्वी मराठीतील प्रख्यात कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी एका परिसंवादात म्हटलं होतं की, 'चॅप्लिनचा वास्तववाद आपल्याला परवडत नाही. कारण भावनिकतेशिवाय सिनेमा बघणं आपल्याला आवडत नाही.' खरं तर चॅप्लिनचा वास्तववाद आपल्याला पेलवत नाही. कथा, कादंबरी, कविता, नाटक कुठलाही प्रकार घ्या, त्यातून हेच दिसून येतं. शेक्सपीअर जसा नाटकातला देव आहे, तसाच चॅप्लिन सिनेमातल्या वास्तववादाचा देव आहे.
चॅप्लिन ज्या काळात कलाकार म्हणून उदयाला येत होता, त्या काळात रशियन, फ्रेंच आणि इंग्रजी साहित्य खूप संपन्न होतं. या भाषांतील नाटकही संपन्न होतं. चॅप्लिनची पाळंमुळं त्यात रुजलेली आहेत. त्याला या साहित्य-नाटकांतून खतपाणी मिळालं आहे. त्यातून चॅप्लिननं स्वत:ला घडवलं. रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव तत्कालीन आणि त्यानंतरच्या सर्वावर पडला. तो कुणालाच टाळणं शक्य नव्हतं. कारण त्यातून राज्यव्यवस्थेत मोठा बदल झाला. तो बदल, संघर्ष आणि तणाव यांतून चॅप्लिननं आपल्या कलेचं रसायन घडवलं. त्यावेळच्या परिस्थितीत मानवतावादी, पण प्रगतिशील; स्वप्नाळू, पण अहिंसक विचार जगभर निर्माण होत होता. त्यामुळेच तो चॅप्लिनने आपल्या सिनेमातून पुढे आणला. हे चॅप्लिनसारख्या थोर कलाकारालाच शक्य होतं.
चॅप्लिनचा सिनेमा विधानांचा नाही; तो सादरीकरणाचा आहे. तो 'इंडिव्हिज्युअल्स'चा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. अनेक बाजूंनी एका वस्तुस्थितीकडे पाहून प्रश्न विचारण्याची कला चॅप्लिननं आत्मसात केली होती. 
मानवतावाद, प्रश्न विचारणं, व्यंग आणि उपहास ही चॅप्लिनची हत्यारं भविष्यात आपल्या खूप उपयोगी पडणार आहेत. येत्या काही दिवसांत आपल्या देशात हुकूमशाही येऊ घातली आहे. त्या काळात चॅप्लिनच्या हत्यारांचा प्रभावीपणे वापर केला तर आपण त्याचा योग्य प्रकारे सामना करू शकू. कारण शोषित व दडपले गेलेल्यांना जगण्यासाठी सगळ्यात मोठी कोणती शक्ती उपयोगी पडते, तर ती रेवडी उडवणं! ती असेल तर तलवारीचीही गरज राहत नाही. हुकूमशाही सत्तेशी झगडायचं असेल तर त्या सत्तेची रेवडी उडवत राहणं, हा सर्वोत्तम पर्याय असतो. चॅप्लिन इज ग्रेट पोलिटिकल वेपन फॉर द ऑप्रेस्ड पीपल