Translate

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

तीळ

तीळ बुद्धी वाढवितात, दातासाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात.
तीळ म्हटले की तिळगूळ, तिळाच्या वड्या व संक्रांतीचा सण डोळ्यांसमोर येतो. स्वयंपाकात तसेच औषधातही तीळ नित्य वापरले जातात. पांढरे तीळ आणि काळे तीळ असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ गुणाने श्रेष्ठ समजले जातात. तिळाचे औषधी गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत,
तीळ चवीला कडवट, स्पर्शाने थंड असले तरी विपाकाने तिखट असतात, बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात.
तिळाचा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापर करता येतो. दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्‍त वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. मुका मार लागला, एखादा शरीर भाग मुरगळला तर तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने दुखावलेला शरीरभाग शेकण्याचा उपयोग होताना दिसतो.
तीळ खाण्याने शौचाला साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्या मूळव्याधीमध्ये रक्‍त पडते, त्यावर अर्धा चमचा तीळ बारीक वाटून चमचाभर घरच्या लोण्याबरोबर घेण्याचा उपयोग होतो. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो.
- वारंवार लघवी होण्याचा त्रास असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.
- शरीरामध्ये कुठेही वायूमुळे चमक उठत असेल किंवा एखादा शरीरभाग उडत असेल तर त्यावर तीळ बारीक करून गरम करून शेकण्याचा उपयोग होतो.
लघवी साफ होत नसेल, अडून राहिल्यामुळे ओटीपोट फुगल्यासारखे झाले असेल अशा वेळी तीळ वाटून, गरम करून ओटीपोटावर लेपाप्रमाणे लावण्याने लघवीला साफ होण्यास मदत मिळते.
- शरीर पोषणासाठीसुद्धा तीळ उत्तम असतात. चमचाभर तीळ पाण्यात भिजवून वाटले व कपभर दुधात कोळून घेऊन त्यात चवीप्रमाणे अर्धा ते एक चमचा गूळ मिसळून घेतले तर शरीर पोषणास मदत मिळते.
- डोक्‍यामध्ये खवडे होतात, त्यावर तीळ कढईमध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.
- शौचाला खडा होणे, त्यामुळे गुदमार्गात वेदना होणे, क्वचित त्या ठिकाणी चिरा पडल्यामुळे रक्‍तस्राव होणे अशा त्रासांवर काही दिवस रात्रीच्या जेवणात तीळ टाकून तयार केलेली मुगाची पातळ खिचडी व तूप असे खाणे पथ्यकर असते. यामुळे आतड्यांना आवश्‍यक ते वंगण मिळाले की वरील सर्व त्रास कमी होतात.
- पाळीच्या वेळी अंगावरून कमी जात असल्यास पाळीच्या तारखेच्या आठवडाभर आधीपासून एक चमचा तीळ व एक चमचा जिरे यांचा चार कप पाण्यात एक कप शिल्लक राहीपर्यंत काढा करून, त्यात चवीनुसार गूळ मिसळून घेण्याचा उपयोग होतो. बरोबरीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने इतर आवश्‍यक उपचार करणेही चांगले.
- अशाप्रकारे तिळाचा औषध म्हणून वापर करता येतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी तीळ जरा जपून खाणे श्रेयस्कर होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा