मुंबई: मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामागे असलेल्या कंम्प्युटर तज्ज्ञाचा चेहरा आता उजेडात आला आहे. झरार शाह असं त्याचं नाव आहे. झरार हा 26/11 हल्ल्यामागचा तांत्रिक गोष्टीतला प्रमुख चेहरा होता. तीस वर्षीय झरार हा लष्कर ए तोएबाच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख आहे. तसंच या हल्ल्याची पूर्वकल्पना अमेरिका, ब्रिटन आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेला होती, असं वृत्त न्यू यॉर्क टाइम्स या अमेरिकेतील वृत्तपत्रात देण्यात आलं आहे.
मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचताना शाह ने हल्लेखोरांना आत येण्यासाठीचा रस्ता हा गूगल अर्थचा वापर करून सांगितला होता. इतकंच नव्हे तर त्याने हल्लेखोरांच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेट फोन प्रणालीचा वापर केला होता. याशिवाय मुंबईतील ट्रायडंट आणि ताज ही दोन अलिशान हॉटेल्स आणि ज्यू वसतीगृहाचा शोध इंटरनेटवरून घेतला होता. मात्र याबाबतची आणखी काही माहिती उजेडात येत आहे.
हल्ल्या आधी दोन महिने म्हणजेच सप्टेंबर महिन्यात दहशतवाद्यांच्या सर्व हालचालींवर ब्रिटनच्या गुप्तचर खात्याची हेरगिरी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय झरारने भारतीय गुप्तचर विभागाचीही माहिती काढायला सुरूवात केली होती.
दोन गुप्तचर यंत्रणांच्या हेरगिरीपासून अमेरिकन गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अनभिज्ञ होती. पण इतर इलेक्ट्रॉनिक आणि मानवी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने भारताला हल्ल्यापुर्वी काही महिन्यांआधी काही माहिती दिली असल्याचंही उजेडात येत आहे.
अमेरिका, इंग्लंड आणि भारत या तीनही देशाच्या गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयाच्या अभावामुळे आणि अत्याधुनिक तंत्राद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याने हल्ल्याची पूर्वसूचना मिळूनही 26/11 चा हल्ला थोपवता आला नाही. ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेकडे शहाच्या सगळ्या हालचालींची माहिती नोंद होती.
धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्याआधी या भागाची रेकी करणाऱ्या डेव्हीड हेडलीच्या पत्नीने अमेरिकन दहशतवाद प्रतिबंधक यंत्रणेकडे हेडली हा पाकिस्तानी दहशतवादी आहे. तो मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील तिने दिली होती. पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने त्याचा पाठपुरावा देखील केला नसल्याची माहिती समोर येत आहे.
हल्ल्यानंतर हल्लेखोरांचे कंट्रोल रूम बरोबर झालेले संभाषण प्रसिद्ध झाले, पण हल्ल्याआधी झालेले संभाषण हे गुप्त ठेवण्यात आले आहे. दरम्यान भारताला वेळोवेळी हल्ल्याची सुचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही होत आहे.
पाश्चिमात्य आणि भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते झरार शाह याचे पाकिस्तानी गुप्तचर संघटनेशी जवळचे संबंध होते. भारताविषयी पराकोटीचा द्वेष त्याच्या मनात होता. भारतावर दहशतवादी हल्ला चढवण्यासाठी कटीबद्ध असलेल्या दहशतवादी गटाचा तो तंत्रज्ञान आणि संपर्क प्रमूख असल्याचं ब्रिटन, अमेरिका आणि भारतीय गुप्तचर संघटनांचे मत आहे.
जिहादविषयी असलेल्या आकर्षणामुळे इंटरनेटचा वापर शस्त्र म्हणून करु इच्छिणाऱ्या मुस्लिम कट्टर पंथियांच्या एका पिढीला तो मार्गदर्शक वाटतो.
भारतीय न्यायालयातील रेकॉर्ड आणि गुप्तचर संघटनांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वयाच्या विशीतच झरारची लष्कर ए तैयबाच्या मीडिया युनिटच्या प्रमूखपदी निवड केली होती.
झरारच्या कारवायांमुळे लष्करच्या युवा विभागाचा प्रमूख साजिद मीर सोबत तो ब्रिटीश, भारतीय आणि अमेरिकन गुप्तचर संघटनांच्या रडारावर आला. साजिद मीर आणि लखवी नावाचा आणखी दहशतवादी 26/11 च्या कटाचे प्रमूख सुत्रधार होते. यामध्ये झरारची भूमिका ही 26/11 च्या कटासंबंधी व्यक्तींना संपर्क साधने आणि हार्डवेअरसह तांत्रिक पाठबळ पुरवण्याचे होती.
अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएने परदेशी पाहुणे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ला होण्याचे संकेत दिले होते. लष्कर ए तय्यबाचा शहराला असलेला धोका लक्षात घेऊन भारतीय गुप्तचर संघटना आणि पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्त्रोताकडून ठराविक कालावधीच्या अंतरावर माहिती गोळा करायला सुरूवात केली होती.
अमेरिकन गुप्तचर संघटनेने जून ते नोव्हेंबर 2008 या कालाधीत अनेक वेळा भारत सरकारला मुंबईला लष्कर ए तैयब्बाकडून असलेल्या संभाव्य धोक्याबद्दल पूर्वसूचना दिल्या होत्या, अशी माहिती ऑफिस ऑफ नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक आणि प्रवक्ते ब्रायन हेल यांनी सांगितलं आहे.
शहरातील संभाव्य लक्ष असलेल्या ठिकाणांबद्दल हाती आलेल्या माहितीच्या आधारे धोक्याचे इशारे देण्यात आले होते, पण त्याविषयी हल्ल्यांची नेमकी वेळ याविषयी विशिष्ट स्वरुपाची माहिती हाती नव्हती, असंही त्यांनी सांगितलं.
भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांना याविषयी माहिती होती, पण हल्ला होईपर्यंत दोन्ही देशांमध्ये यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या माहितीची देवाणघेवाण नव्हती असं एका भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
ब्रिटीश गुप्तचर संघटनेने झरार शाहच्या इंटरनेटवरील खात्यांचा माग काढल्यानंतरच्या काळात झरारने न्यू जर्सीच्या एका कंपनीशी संपर्क साधला आणि आपण मुंबईस्थित खरक सिंग या नावाने भारतीय टेलिफोन रिसेलर सर्व्हिसेस पुरविणाऱे व्यवसायिक असल्याचा बनाव ऑनलाईनवर केला.
व्हॉईस ओव्हर इंटरनेट फोन सर्व्हिसच्या दरासंदर्भात त्याने घासाघीसही केली. मुंबईवर हल्ला चढवणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये कॉल करण्यासाठी या फोनच्या सेवेची निवड करण्यात आली होती. हे कॉल ऑस्ट्रिया किंवा न्यू जर्सी येथून केले जात आहेत असं भासवण्याचा तो प्रयत्न होता.
झरारने तोडक्या मोडक्या इंग्रजीत न्यूजर्सीच्या कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि त्यात त्याने आपण आयुष्यात पहिल्यांदाच व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सूविधा खरेदी करत असल्याचं नमुद केलं होतं. तसचं ही सेवा आपण दोन वर्षे वापरत आहोत असंही त्याने सांगितलं होतं. याशिवाय कंपनी मागत असलेली किंमत खुपच जास्त असल्याचा सूरही त्याने लावला होता.
शाहने व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सिस्टिम्स, ऑनलाईन सिक्यूरिटी आणि संभाषण लपवण्यासाठीचे मार्ग शोधणे याबाबत सप्टेंबरच्या मध्यापासूनच संशोधन करायला सुरवात केली असल्याचं उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतं.
शाहने कटाची आखणी करताना आपल्या लॅपटॉपवरुन युरोपमधील कम्युनिकेशन सिक्यूरिटीमधील कमकुवत दुवे शोधण्यास सुरवात केली होती. तसंच ब्राऊझिंग हिस्ट्री लपवण्यासाठी एका साईटवरही वेळ खर्च केला होता. तसचं त्याने भारतीय अमेरिकन नाविक कवायतींच्या संदर्भातही गुगल न्यूजवर सर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दहशतवाद्यांची गाठ भारतीय नाविक दलाशी पडू नये यासाठी त्याने ही खबरदारी घेतली होती. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबने देखील शाहची तंत्रज्ञानावर हुकूमत असल्याचं पाहिलं होतं.
सप्टेंबरच्या मध्यावर शाह आणि त्याच्या साथीदारांनी गुगल अर्थचा वापर करुन कसाब आणि त्याच्यासोबत असलेल्या नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांना मुंबईतील हल्ल्याची ठिकाणं दाखवली होती. कसाबनेच न्यायालायासमोर आपल्या जबाबात ही माहिती दिली होती.
काश्मीरच्या सीमेनजीक एका मोठ्या मीडिया रुममध्ये हे सत्र घेण्यात आलं होतं. हल्ला चढवणाऱ्या दहशतवाद्यांना अरेबियन समुद्रामार्गे मुंबईपर्यंतचा मार्ग समजावून सांगणं, तसचं मुंबईतील रस्त्यांची माहिती देणं हा उद्देश त्यामागे होता.
हेडलीने साजिद मीरला व्हिडिओ, नकाशे दिले होते. दहशतवाद्यांना गुगल अर्थ तसेच ग्लोबल पोजिशनिंग उपकरणांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. मुंबईत दाखल होण्याआधी कसाबला मुंबईतील ठिकाणांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
झरारने 24 नोव्हेंबर रोजी कराचीच्या उपनगरात आपले बस्तान बसवले होते आणि तिथेच त्याने भारतीय दहशतवादी अबू जुंदालच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक कंट्रोल रुमची स्थापना केली होती.
भारतीयांवर हल्ल्याचे खापर फूटावे यासाठी त्याने, हैदराबादस्थित डेक्कन मुजाहुद्दीन नामक एक दहशतवादी संघटना तयार केली होती. तसंच या हल्ल्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचं निवेदनही त्याने तयार केलं होतं.
भारतीय आणि अमेरिकन दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झरारने माध्यमांना पाठवण्याचा मसुदाही तयार केला होता.
मुंबईवर हल्ल्याला सुरवात झाल्यानंतर झरारने एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर त्यासंदर्भातील बातम्या वाचत असल्याची माहिती त्याचे कॉल टॅप केल्यानंतर उघड झालं.
झरारच्या टेहाळणीच्या सवयींचे विश्लेषण केल्यानंतर हल्ल्याच्या अगोदर मुंबईतील अनेक स्थळांबाबतची माहिती हाती येते आणि हॉटेल ताजच्या एंट्री पॉईंटद्वारे हल्ल्याचे नियोजनही उघड झाल्याबाबतचा एनएएसएचा दस्तावेज स्पष्ट करतो.
झरारने हल्ल्याच्या ठिकाणांसंदर्भात माहिती गोळा करताना गुगल अर्थचा वापर केला होता. गुप्तचर संघटनांनी गोळा केलेली माहितीची देवाणघेवाण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आली होती. अमेरिकन नॅशनल सिक्यूरिटी अॅडव्हायझर यांना ती देण्यातही आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा