समुद्र मंथनातून कामधेनू गाय उत्पन्न झाली आणि ती गाय थेट याच दरीमध्ये कोसळली. इथेच वसिष्ठ ऋषींची झोपडी होती. ही गोष्ट कळल्यावर त्यांनी शंकराची आराधना केली. शंकराने सरस्वती नदीला (जी पाताळात वाहते) भूमीवर बोलावून या दरीचं पात्र भरलं. त्यावर कामधेनू तरंगत वर आली. पण यापुढे या दरीमध्ये कोणीही पडू नये यासाठी वसिष्ठ ऋषींनी हिमालयाची आराधना केली. त्यावेळी हिमालय आणि सर्पदेव अर्बुदा यांच्या मदतीनं एक पर्वत इथे आणण्यात आला. तेव्हापासून या पर्वताला अर्बुदांचल आणि या परिसराला अर्बुदारण्य असं नाव पडलं. तेच आजचं माऊंट अबू!
हिरव्यागार डोंगरामधून वळणावळणाच्या रस्त्याने माऊंट अबूला पोहोचलो. इथे पोहोचताच अनेक लोक तुम्हाला गराडा घालतात. कोणी हॉटेलसाठी विनवणी करतं, कोणी माऊंट अबू फिरण्यासाठी कार बुक करणार का, वगैरे विचारत तुमचा पिच्छा पुरवतात. तुम्हाला कारनं फिरायचं असल्यास किमान हजार रुपये हे कारवाले घेतात. आपण अशावेळी सरळ राजस्थान टुरिझमच्या अबूदर्शनचं तिकिट काढायचं. फक्त १२५ रुपयांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते ६५ किलोमीटर वर पहाडापर्यंतचे ७ पॉइंट्स ही बस फिरवते. बसमध्ये त्यांचा गाईडसुद्धा असतो. मी आणि माझ्यासारखे २५ ते ३० जण या बसमध्ये बसलो आणि सुरू झालं - अबू दर्शन!
काही वेळातच आमची बस निलगिरी पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोहोचली. या पर्वताच्या टोकावर अर्बुदा देवीचं मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच या पर्वताला माऊंट अबू नाव पडलं.. या देवीला अम्बिका देवी आणि अधर देवी या नावानंही ओळखलं जातं. साडेतीनशे पायऱ्या चढून आपण मंदिरात येतो. एका गुहेतच हे मंदिर असून याची स्थापना पाच हजार वर्षांआधी झाल्याचं सांगतात. ५१ शक्तीपिठांपैकी हे एक शक्तीपीठ मानलं जातं.
अर्बुदा देवी : (फोटो सौ. फेसबुक)
तासाभरात आम्ही पुढे निघालो. आमच्या बसमध्ये अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते ७० वर्षांच्या वृद्धापर्यंत पर्यटक होते. त्यामुळे त्यांना नीट खाली उतरवून परत गाडीत बसवण्यात ड्रायव्हर आणि गाईडचा बराच वेळ जायचा. अशा बसेसचा हा थोडासा तोटा असतो खरा... पण या प्रवासात मी सोलो ट्रॅव्हलर नव्हतो. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागत होतं.
आता आम्ही ब्रह्मकुमारी विश्वशांती केंद्राकडे निघालो. गाईड या केंद्राबद्दल माहिती सांगत होता. आत गेल्यावर तुम्हाला खूप मोठं लेक्चर देतील. इथे किती वेळ थांबायचं, ते तुम्हीच ठरवा. कारण आपल्याला पुढे अजून बरंच फिरायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी १५ मिनिटांत परत या, असं गाईडनं स्पष्ट सांगितलं.बहुधा, हा त्याचा आधीचा अनुभव बोलत असावा.
आम्ही विश्वशांती केंद्रात गेलो. बाहेर दरवाज्याजवळच एका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीनं या केंद्राच्या स्थापनेचा इतिहास सांगितला. दादा लेखराज कृपलानी यांनी १९३० साली, आताच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतात ओम मंडलीची स्थापना केली. फाळणीनंतर १९५० साली ओम मंडलीचं मुख्यालय सिंध प्रांतातून माऊंट अबूमध्ये आलं. १९६९ मध्ये दादा लेखराज कृपलानी यांचं निधन झालं. मात्र त्यानंतरही या संस्थेचा प्रसार देश विदेशात झपाट्यानं होतोय. एकाच वेळी तीन हजार लोक ध्यानधारणेला बसू शकतील, असा एक मोठा हॉल इथे आहे. विशेष म्हणजे या हॉलला एकही खांब नाही.
येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणारे अनेक अनुयायी याठिकाणी असतात. कलियुगाचा लवकरच अंत होणार असून दुसऱ्या युगाचा लवकरच प्रारंभ होणार आहे, वगैरे ते सांगत होते. ते मला फारसं काही पटलं नाही. पण इथे सुंदर शांतता होती. त्यामुळे अजून थोडं थांबावंस वाटत होतं.... बराच वेळ झाल्यानं आम्ही तिथून निघालो.
बसच्या गाईडने १५ मिनिटांत परत यायला सांंगितलं होतं खरं पण प्रत्यक्षात बाहेर पडायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला. गाईडने सगळ्यांना सक्त ताकीदच दिली... वातावरण पावसाळी आहे त्यामुळे लवकर फिरून घ्या.. "मुंबई का फॅशन और माऊंट अबू का मौसम कब बदल जाएं पता नही चलता।" एकाच ठिकाणी अडकून पडू नका - असं त्याला सुचवायचं होतं. दुपारचा दीड वाजत आला. आता आमची बस सुप्रसिद्ध दिलवाडा मंदिराकडे निघाली..
दिलवाडा मंदिर प्राचीन भारताच्या स्थापत्य कलेचं आश्चर्यजनक उदाहरण आहे. मंदिराचं सौंदर्य फक्त नजरेत सामावून घ्यावं, असं. दिलवाडा मंदिराची निर्मिती ११व्या आणि १३व्या शतकात झाली. पूर्णत: संगमरवरी मंदिरातलं कोरीवकाम तर अद्भूत आहे.
इथली पाचही मंदिरं जैन धर्मातील तिर्थंकरांना समर्पित आहेत..
पहिलं जैन तिर्थंकर ऋषभदेव यांचं विमल वसही मंदिर. या मंदिरातल्या मूर्तीचे डोळे हिऱ्यांनी बनलेले आहेत..
दुसरं २२ वे जैन तिर्थंकर नेमीनाथ यांचं लून वसही मंदिर
तिसरं पुन्हा पहिले जैन तिर्थंकर ऋषभदेव यांचं पितलहर मंदिर. ऋषभदेवाच्या मूर्तीचं वजन ४ हजार किलोग्रॅम आहे.
२३ वे तिर्थंकर पार्श्वनाथ यांचं पार्श्वनाथ मंदिर चौथं मंदिर.
आणि पाचवं, अंतीम जैन तिर्थंकर महावीर यांंचं! हे सगळ्यात छोटं मंदिर. मात्र याची बांधणी अप्रतिम आहे..
या मंदिर उभारणीत दीड हजार शिल्पकार आणि १२०० कामगारांची मेहनत कामी आली आहे. त्याकाळी यासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च आला होता.
दिलवाडा मंदिरातून बाहेर पडताना ताजमहाल पाहिल्यासारखा अनुभव आला.
मंदिराच्या बाहेर आलो. एव्हाना भूक बोलू लागली. आम्ही शेजारच्या भोजनालात जेवायला गेलो . माऊंट अबू आणि एकूणच सिरोही जिल्ह्यात मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे इथल्या खाद्यसंस्कृतीवर राजस्थानपेक्षा गुजराती पद्धतीचा जास्त पगडा आहे. इथे राजस्थानी जेवणापेक्षा गुजराती जेवणाचे रेस्टॉरंट्स अधिक आहेत. प्रवासात त्रास नको म्हणून मी गुजराती दाल खिचडी आणि कढी खाणं पसंत केलं.. दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही पुन्हा एकदा बसमध्ये बसून अचलगडाकडे प्रस्थान ठेवलं..
दिलवाडा मंदिराकडून परत निघताना उजवीकडे जाणारा रस्ता अचलगडाकडे जातो. इतिहासकारांच्या सांगण्यानुसार १० व्या शतकात अचलगड किल्ला परमार शासकांनी बांधला होता. त्यानंतर या किल्ल्याची दुरवस्था झाली होती. राणा कुंभ यांनी गुजरातच्या मुस्लिम शासकांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या किल्ल्याचं पुनर्निर्माण केलं.. आज मात्रा इथे फक्त काही खोल्या आणि भिंती उरल्या आहेत.
ज्या पहाडावर हा किल्ला आहे, त्या पहाडाच्या पायथ्याशी अचलेश्वर मंदिर आहे. १५ व्या शतकात उभारलेल्या या शंकर मंदिरात शिवलिंगाची नव्हे तर अंगठ्याची पूजा होते. याच अंगठ्यावर शंकरानं आबू पर्वताला स्थिर केलं होतं, अशी कथा सांगतात. म्हणूनच या स्थानाला अचलगड असं नाव पडलं. मंदिराच्या बाहेर पंचधातूचा भव्य नंदी आहे.
मंदिराच्या शेजारुन गडावर जायचा छोटा रस्ता होता. पण अचलगडाची एकूण अवस्था पाहून कोणालाही वर जायचा उत्साह नव्हता..
आता आम्ही माऊंट अबूचं सर्वोच्च स्थान गुरूशिखराकडे निघालो. त्याआधी मध्ये सनसेट पॉईंट लागतो. यालाच हनीमून पॉईंटही म्हटलं जातं. 'कयामत से कयामत तक' सिनेमात आमीर खाननं जुही चावलासाठी इथेच घर बांधलं होतं. हे आमचा गाईड तीन तीन वेळा सांगत होता. कदाचित या ठिकाणाबद्दल त्याच्याकडे याव्यतिरिक्त सांगण्यासारखं काहीच नसावं. बस इथे फोटो काढण्यासाठी दहा मिनिटं थांबली. लग्न झालेली जोडपी आणि इतर काही याठिकाणी फोटो काढायला उतरले. जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी इथे एक आजोबा पगडी आणि बंदूक घेऊन बसले होते. पगडी घालायची हातात बंदूक घेऊन फोटो काढायचा.. फक्त १० रुपयात.. मी यातलं काहीही केलं नाही.
आता आमचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला.. समुद्रसपाटीपासून ५५६० फूट (१७२२ मी.) उंचीवर वसलंय गुरूशिखर.. अरवलीच्या पर्वतरांगेतलं हे सर्वोच्च शिखर.
मंदिराच्या पायथ्यापर्यंत बस जाते मात्र तिथून मंदिरापर्यंत पायऱ्या चढाव्या लागतात. अत्री ऋषी आणि देवी अनुसया यांच्या पोटी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी जन्म घेतला. या तिन्ही देवांचा एकत्रित अवतार म्हणजे दत्त.. प्रभू दत्तात्रेय याच ठिकाणी तपश्चर्येला बसायचे.
इथून आणखी काही पायऱ्या चढून वर गेलं, की दत्तात्रेयांच्या पादुका आहेत..
याशेजारीच पितळेची एक विशाल घंटा आहे. मनापासून काही इच्छा व्यक्त करून ही घंटा तीन वेळा वाजवल्यास मनोकामना पूर्ण होते. अशी भाविकांची श्रद्धा आहे.
गुरुशिखरावरचा एक तास मात्र खरंच अविस्मरणीय होता. गुरूशिखरावर उभं राहून खाली बघितलं, की वाटतं .....आपण जग जिंकलंय...
गुरु शिखरावरून आता परतीचा प्रवास सुरू झाला. इथून जवळंच एअर फोर्स स्टेशन आहे. त्या परिसरात जायची परवानगी नाही.
आता बस कुठलाही थांबा न घेता वेगानं. बस स्टॉपकडे निघाली. संध्याकाळचे ५ वाजत आले होते. साडे पाच पर्यंत आम्ही बस स्टॉपच्या जवळ पोहोचलो. इथे पाच मिनिटावर नक्की लेक (तलाव) आहे..
नक्की तलावाच्या आजूबाजूला अनेक छोटी मोठी दुकानं आहे. ज्यांना माऊंट अबूमध्ये खरेदी करायची आहे. त्यांच्यासाठी इथलं मार्केट परफेक्ट आहे..
मावळता सूर्य आणि गार वारा. तलावाच्या तटावर बसून शांतपणे ते सौंदर्य मी टिपत बसलो.
हा तलाव देवांनी नखानं खोदून तयार केला, म्हणून याचं नाव 'नक्की तलाव' पडलं, अशी दंतकथा आहे. हिमालयातल्या तलावांचा अपवाद वगळता समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर असलेला हा भारतातला एकमेव नैसर्गिक तलाव आहे.
तासभर हा ऑक्सिजन सामावून घेत मी परतीच्या प्रवासाला लागलो. इथून अबू रोड स्टेशनसाठी अर्ध्या तासाने बसेस आहेत. मी रात्री ८ वाजेपर्यंत अबू रोडला पोहोचलो. दिवसभराचा प्रवास हा समृद्ध करणारा होता. अबू रोड रेल्वे स्टेशनवरून मला जैसलमेरला जायचं होतं. त्यासाठी २.३० वाजताची गाडी होती. त्यामुळे बराच वेळ घालवायचा होता. अबू रोड हे गुजरातच्या जवळचं गाव असल्यानं इथे तुम्ही राजस्थानमध्ये आहात असं फारसं जाणवत नाही. गुजराती फाफडा, जिलेबी, ढोकळा याचे स्टॉल्स जागोजागी पाहायला मिळतात. दुपारी हलकं खाल्लं होतं, त्यामुळे आता पोटात कावळे ओरडत होते. एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन मी दाल तडका आणि फुलक्याची ऑर्डर दिली. राजस्थानी थाळी हा फार जड प्रकार आहे. त्यात रात्रीसुध्दा प्रवास असल्याने साधं जेवण आणि त्यातही दोन घास कमीच.... या बेतानं मी जेवलो. रात्री साडेदहा वाजेपर्यंत मी अबू रोड स्टेशन गाठलं. गाडीला अजून ४ तास होते. त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर जाऊन मोबाईलवर सिनेमा बघत गाडीची वाट बघत बसलो. त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रात्री पावणे तीन वाजता बांद्रा ट. - जैसलमेर ट्रेन आली. माझी सीट पकडून मनातल्या मनात माऊंट अबूला बाय बाय म्हंटलं. हिरव्यागार निसर्गरम्य अबू पर्वतामधून माझा प्रवास आता थारच्या वाळवंटाकडे सुरू झाला..
राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : पुष्कर
जोधपूरहून निघालेली ट्रेन वाळवंटी प्रदेश मागे सोडून आता हिरव्यागार अरवली पर्वतरांगेत प्रवेश करत होती. कुठे मैलो न् मैल पसरलेलं रखरखीत वाळवंट तर कुठे भव्य पहाड, कुठे पाण्याचे भव्य तलाव.... किती वैविध्य आहे राजस्थानच्या भूमीत. आज पुष्करला आपण जातोय. राजस्थानला येणारा पर्यटक हा राजवाडे, महाल, किल्ले बघण्यासाठी येत असतो. पण यापैकी काहीही नसलेलं हे छोटसं पुष्कर आपलं अस्तित्व टिकवून आहे ते इथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे. पुष्करला जाण्यासाठी ट्रेन्स फार कमी आहेत. त्यामुळे मला अजमेरहून पुष्करला वेगळ्या वाहनानं जावं लागणार होतं. दुपारी साडे बारा वाजता अजमेर स्टेशनला पोहोचलो. तिथून रिक्षाने बस स्टॉप गाठला. इथून पुष्करसाठी खूप गाड्या असतात. एक गाडी लागलेलीच होती. पण गर्दी प्रचंड होती. काय करावं, हा विचार करत मी तसाच आत घुसलो. पाठीवर मोठी बॅग, हातात कॅमेऱ्याची बॅग आणि आणखी एक छोटी बॅग घेऊन मी कसातरी घुसलो होतो खरा; पण बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. अजमेरहून पुष्करपर्यंत फक्त 13 किमीचा प्रवास होता. पुढच्या पाच मिनटांत मी बॅग वर टाकून कोपऱ्यात उभं राहण्यासाठी कशीबशी जागा मिळवली. आता इतक्या वर्षांच्या मुंबई लोकलचा अनुभव इथे कामी आला. एव्हढ्यात बोलता बोलता कळलं, की आज गुरूपौर्णिमा आहे. म्हणूनच बसमध्ये एवढी गर्दी होती. मलाही बरं वाटलं. चांगल्या मुहूर्तावर आपण अशा तीर्थक्षेत्राला जातोय.काही मिनिटांत बस शहराच्या बाहेर पडली आणि डोंगरातून नागमोडी वळणांवरून धावू लागली. डोंगरावरून पुष्करचा तलाव आणि त्याबाजूचं छोटसं शहर स्पष्ट दिसतं. खिडकीतून वाकून वाकून मी बघत होतो. तेवढ्यात कंडक्टर तिकिट तिकिट करत आला. आपल्याकडे कंडक्टर आणि ड्रायव्हर खाकी गणवेषात असतात. राजस्थानमध्ये मात्र त्यांना कुठलाही गणवेश नसतो. अजमेर ते पुष्कर बसचं तिकिट फक्त 20 रुपये आहेे.अजमेर आणि पुष्कर या दोन शहरांच्या मध्ये हा अरवलीचा नाग पर्वत आहे. याचं वैशिष्ट्य बघा, याच्या एका बाजूला अजमेर शरीफ दर्गा आहे. जगभरातल्या मुस्लिम बांधवांचं हे श्रद्धास्थान! तर दुसऱ्या बाजूला आहे, हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र बह्मराज पुष्कर. अरवलीचा हा नाग पर्वत या दोन संस्कृती आणि दोन धर्मांना असा घट्ट धरुन उभा आहे.बस स्टॉपवर उतरल्यावर तर सण असल्याचा फील येतो ना अगदी तसंच माझं झालं. गुरुपौर्णिमा असल्याने गर्दीच गर्दी होती. या गर्दीत राजस्थानच्या ग्रामीण भागातून आलेले भाविक जास्त होते. पुष्करमध्ये राहण्यासाठी मोठमोठी हॉटेल्स, हॉस्टेल्स, डॉर्मिटरीज् उपलब्ध आहेत. मी ज्या हॉस्टेलमध्ये थांबणार होतो ते अगदी पुष्कर तलावाच्या समोरच होतं. मी नेहमी प्रमाणे मस्त चालत निघालो.मोठ्ठाले किल्ले, राजेशाही महाल बघून आल्यावर या शहराचं वेगळेपण पावलोपावली जाणवत होतं. खरंच सुंदर शहर आहे पुष्कर. तीन बाजूंना पर्वतरांगा, एका बाजूला थरचं वाळवंट! इथे दरवर्षी कार्तिक महिन्यात पुष्कर उंट मेला (पुष्करची उंट यात्रा) भरतो. गारेगार हवा, छोट्या छोट्या गल्ल्या, निवांत किंबहुना जरा आळसावलेलेच वाटतील असे इथले सर्वसामान्य लोक, कपाळावर मोठं भस्म लावलेले अनेक संप्रदायांचे साधू आपल्याला पुष्करच्या गल्ल्यांमध्ये दिसतात.या सगळ्या साधूंची नजर असते परदेशी पर्यटकांवर. परदेशी पर्यटकही या साधूंसोबत राहतात. हे साधू यांना किती ज्ञान देत असतील, कुणाला माहित! पण घाटावर बसून एकत्र सुट्टा मारण्याची मजा ते एकत्र बसून घेतात. पण तरीही एक नक्की... "कुछ तो खास है यहां की हवामें..!" युरोप अमेरिकेतले लोक उगीच इथे महिनोन्महिने इथे राहत नाहीत.हॉस्टेलवर पोहोचल्यावर मी ज्या रूममध्ये राहणार होतो, तिथे आधीच एक परदेशी मुलगा आला होता. त्याला हाय..हॅलो म्हटलं आणिक आवरुन बाहेर पडलो. समोरच पुष्करचा तलाव आणि त्याच्या 52 घाटांवर जिकडे पाहावं तिकडे गर्दीच गर्दी. इथलं पाणी गंगेसमान पवित्र मानलं जातं. तलावात डुबकी मारली, की पापं नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मी कधी पापं केलीच नाहीत त्यामुळे डुबकी मारण्याचा प्रश्नच नव्हता. असो.हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांमध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर असणारं पुष्कर हे एकमात्र ठिकाण आहे. पद्मपुराणातल्या वर्णनानुसार ब्रह्मदेवानं इथे येऊन यज्ञ केला. एका आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाच्या कमलपुष्पातून एक पाकळी खाली पडली, तिथे हा तलाव निर्माण झाला. एकूणच इथला माहौल कुंभमेळ्यासारखा असतो. प्रयागला जसं 'तीर्थराज' म्हटलं जातं, तसंच पुष्करला 'पुष्करराज' नावानंही ओळखलं जातं. रामायणातही पुष्करचा उल्लेख आहे. विश्वामित्र इथेच तपश्चर्येला बसलेले असताना मेनकेनं त्यांची तपस्या भंग केली होती. अशा अनेक कथा या तलावाबाबत ऐकायला मिळतात. बुद्ध स्तुप आणि चंद्रगुप्ताच्या मुद्रांवरही पुष्करचा उल्लेख आढळतो.आता जाऊयात ब्रह्मदेवाच्या एकमेव मंदिरात. तसं ब्रह्माचं एक मंदिर इंडोनेशियात असल्याचं वाचलं होतं. पण भारतीयांसाठी हेच एकमेव ब्रह्माचं मंदिर आहे. पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे जगतकल्याणासाठी ब्रह्मानं यज्ञ करायचं ठरवलं. त्यासाठी ते पुष्करला आले; पण काही कारणांमुळे त्यांची पत्नी सावित्री वेळेवर पोहोचू शकली नाही. यज्ञ पूर्ण करण्यासाठी तर पत्नी उपस्थित असणं, आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी गुर्जर समाजातील गायत्री देवी यांच्याशी विवाह केला. पण थोड्याच वेळात तिथे सावित्री देवी पोहोचल्या. झालेला प्रकार कळल्यानंतर त्या प्रचंड संतापल्या आणि त्या रागातच त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला, की "देवता असूनही तुमची पुष्कर वगळता कुठेही पूजा होणार नाही. जो कोणी तुमचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करेल त्याचा सर्वनाश होईल."ब्रह्माचं पुष्करमध्ये एकमेव मंदिर असण्यामागे ही एक आख्यायिका! बायकोच्या रागापासून देवही सुटले नाही हेच खरं..ब्रह्माच्या मंदिरामागेच उंच पहाडावर त्यांच्या पत्नी सावित्री यांचंही मंदिर आहे. पण त्यासाठी अनेक पायऱ्या चढण्याची तयारी असेल तरच जावं.काशी मथुरेच्या घाटांप्रमाणे पुष्कर फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. भारताच्या विविधतेचे सगळे रंग जणू या पहाडांच्यामध्ये येऊन स्थिरावलेत. कुठे टोपलीतला साप बाहेर काढून खेळ दाखवणारे गारुडी.तर कुठे दीन चेहरा करून बसलेले भिकारी दिसतात. घाटावरच्या श्राद्धाच्या पिंडाला शिवण्यासाठी कावळ्यांचे जत्थे तर तयारच असतात. आपल्या लौकिक परलौकिक इच्छांची पूर्ती करणाऱ्या गायी पुष्करच्या रस्त्यावर शांत बसून असतात. इतक्या सगळ्या धार्मिक विधींचा प्रसाद या गायींच्याच पोटात जाणार असतो.पुष्करमध्ये फिरण्यासाठी काही प्लॅन करण्याची गरज नाही. सगळं एकमेकांना जोडलेलं आहे. पुष्कर सरोवराच्या बाजूलाच शहरात किमान 500 मंदिरं आहेत. औरंगजेबानं या शहरातली अनेक मंदिरं उध्वस्त केली. तरीही आजही पुष्करच्या कुठल्याही गल्लीबोळात गेलात तरी तुम्हाला मंदिर दिसणारंच. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करणं आणि त्यांच्याबद्दल लिहिणं अशक्य आहे. पण राम लक्ष्मण मंदिर हे त्यातल्या त्यात खास आहे. कारण राम मंदिर आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतं. पण राम लक्ष्मणाचं मंदिर क्वचितच आढळतं. लग्न झालेल्या जोडप्याचं देवदर्शन असो, की एखाद्याचं श्राद्ध. सगळे विधी पुष्करमध्ये नेमानं होतात. ब्रह्म मंदिर आणि सरोवराच्या घाटांवरून आता मार्केटमध्ये जाऊया. पुष्करचं मार्केटही इथल्या संस्कृतीसारखं रंगीत आहे. राजस्थानी कलाकुसरीच्या सगळ्या वस्तू... विशेष म्हणजे उंटाच्या चामड्याच्या बॅग्ज, शूज्, पर्स इथे मिळतात. फक्त खिसा थोडा गरम ठेवावा लागतो.मार्केट फिरल्यावर पुन्हा संध्याकाळी घाटावर आलो. एका झाडाखाली देवीची मूर्ती होती. तिथे काही परदेशी लोकांसह एक आजोबा नगारा वादन करत होते. त्यांचा हा नित्यक्रम असल्याचं कळलं. थोड्यावेळाने अंधार पडला, त्यावेळी घाटावर आरती सुरू झाली. मोठाल्या निरंजनांनी ब्रह्म घाट उजळून निघाला.घाटाच्या पलीकडच्या बाजूला पंजाबी बांधवांचा गुरुद्वारा आहे. गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग यांच्या पुष्कर भेटीचं प्रतिक म्हणजे हा गुरुद्वारा. गोड पंजाबी भजनं ऐकून मन शांत झालं. तिथेच लंगरमध्ये प्रसादरुपी जेवणाचा आस्वाद घेतला.गुरुद्वारातून बाहेर पडल्यावर मी हॉस्टेलकडे निघालो. आता दुकानांची आवराआवर चालू होती. पुष्करमध्ये मिठाईची दुकानंही खूप आहेत आणि त्यात मोठ्या आवडीनं खाल्ला जातो, तो इथला मालपुआ.. भल्या मोठ्या कढईतल्या पाकात मालपुआ ठेवलेला असतो. मुंबईतला मालपुआ तुटता तुटत नाही. इथला मात्र तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतोच.रात्री 9 च्या सुमारास मी हॉस्टेलवर आलो. माझा परदेशी रुममेटही होताच. तो नेमक्या कोणत्या देशातला होता ते मला आठवत नाही. युरोपातला होता एवढं नक्की. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर मी त्याला आपला पर्मनंट प्रश्न विचारला. कसा आहे इंडिया? वगैरे.त्यावर त्यानं फारच प्रामाणिक उत्तर दिलं."इंडियात लोकांना गोऱ्या लोकांचं इतकं का आकर्षण आहे कळत नाही. आम्ही खूप सारे पैसे खर्च करून इथे येतो. पण लोक धड रस्त्यावरुन चालूही देत नाही. मध्येच आमच्यासोबत सेल्फी घेतात. आम्हाला एखाद्या ठिकाणी शांत बसायचं असेल, तर तिथेही एकांत मिळत नाही. बाकी लोकांचा तसा फार वाईट अनुभव नाही; पण काही वेळा लूटमार करण्याचाही प्रयत्न होतो."तो हे जे सांगत होता, त्याच्याशी मी सहमत होतो. इथल्या ट्रॅफिकविषयीही तो मस्त बोलला. "सिग्नल आहे. पोलीस उभा आहे. तरीसुद्धा लोक हॉर्न का वाजवतात?" असा प्रश्न त्याचा प्रश्न होता. त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. युरोपात असं काही केलं, तर थेट लायसन्स काढून घेतात म्हणे.इथलं तिखट जेवण आणि जेवणाचे प्रकार मात्र त्याला खूप आवडले.आमचं बोलणं सुरू असतानाच त्याला भिंतीवर पाल दिसली. मिनी क्रोकडाईल..असं म्हणत त्याने ती हातात पकडली. ते बघून एखादी भारतीय मुलगी किती जोरात किंचाळली असती विचार करा. मी मात्र त्याचा फोटो काढला. त्याने नंतर ती पाल खिडकीतून बाहेर सोडली.आता मी माझ्या या विदेशी मित्राला गुड नाईट म्हटलं आणि झोपायची तयारी केली.
राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जोधपूर
जैसलमेर ते जोधपूर.... थरचं तप्त वाळवंट, मैलोन् मैल झाडांचं आणि माणसांचं अस्तित्वच दिसत नाही, असा हा मरुस्थलाचा प्रदेश.
पुराणातल्या आख्यायिकांनुसार कधाकाळी या वाळवंटात समुद्र होता. प्रभू श्रीरामांनी अग्नीबाण मारल्यानं समुद्राचं वाळवंट बनलं. ज्या जमिनीवर बाजरीशिवाय काहीही उगवत नाही, जिथे वर्षभरात पाऊस झालाच तर तो चुकून एकदा किंवा फारतर दोनदा होतो, पाण्याची पातळी खोल होत जाते, जगण्यात रंगच नाही की काय... असं वाटू लागतं- असा हा प्रदेश! पाच तास ट्रेनच्या प्रवासात अंगावर वाळू साचू लागते, तेव्हा आपल्याला इथल्या लोकांचं जगणं खऱ्या अर्थी उमगत जातं. किती रुक्ष आणि रंगहीन आहे हे जीवन...असं वाटून जातं. आणि मग तुम्ही जोधपूर शहरात पाय ठेवता...अन् कळतं, की आपल्या धकाधकीच्या बेगडी जीवनापेक्षा इथल्या लोकांचं जगणंच जास्त रंगीत आहे. बॅग पाठीवर लटकावून प्लॅटफॉर्मवरुन चालतानाच "जोधपूर स्टेशन पर पधारे सभी यात्रीयों का स्वागत" अशी अनाऊंसमेंट होते...दुसऱ्याच मिनिटाला... "केसरीया बालम..आओंनीसा... पधारों म्हारे देस" चे गहिरे स्वर कानावर पडतात आणि सगळी मरगळ क्षणात दूर होते. मारवाडचं प्रवेशद्वार जोधपूर आपली गळाभेट घेत स्वागत करतं. राजस्थानच्या स्वर्णासमान भासणाऱ्या सोनेरी वाळवंटात नीलम मण्यासारखं चमकणारं हे निळंशार शहर. ब्लू सिटी जोधपूर.
पाच तासांच्या प्रवासानंतर दुपारी बारा वाजता जोधपूरला पोहोचलो. मी प्रवासात खाणं टाळतो. त्यामुळे आता भूक लागली होती. आधी एक रेस्टॉरन्ट शोधलं. स्टेशनपासून जेमतेम शंभर पावलांवरच्या एका रेस्टॉरंटमध्ये मी गेलो. जोधपूरच्या मारवाडी जेवणाचा सुवास तिथे दरवळत होता. त्यामुळे माझी भूक अधिकच खवळली. काही मिनिटांतच समोर गरमागरम बाजरीची भाकरी, कढी, वाटीमध्ये तूप आणि कसलीशी भाजी आली. वेटरला विचारल्यावर त्याने ही पंचकुटाची भाजी असल्याचं सांगितलं. मी नाव ऐकूनच फार न बोलता गपगुमान खायला लागलो. आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा या भाजीची चव निराळीच. एकूणच इथल्या खाण्यात प्रेमाचा गोडवा आणि रखरखत्या उन्हाचा झणझणीतपणासुद्धा आहे. दोन भाकरींचा फडशा पाडल्यावर मनःशांती लाभली.
बाजरीची भाकरी हे मारवाडचं मुख्य अन्न. अत्यंत कमी पाणी आणि भरपूर सूर्यप्रकाशात बहरणारं हे पीक मारवाडसाठी वरदान आहे. १५४३ साली शेहशाह सुरी मारवाड काबिज करण्यासाठी ८० हजारांच्या सैन्यानिशी चाल करुन आला. राजा मालदेव यांचं ५० हजार सैन्य महिनाभर बाजरीची भाकरी आणि बाटी खाऊन मोठ्या जोमाने शेरशाहाच्या सैन्याला धूळ चारत होतं. महिनाभरानंतर शेरशहाचं सैन्य क्षीण झालं. पण युद्धकलेत पारंगत शेरशाहानं एकदाची राठौडांना मात दिली. "खुदा का शुक्र है किसी तरह युद्ध में विजय हासिल हो गई। वरना मैंने तो मुठ्ठी भर बाजरेके कारण हिंदुस्तानकी बादशाहदतही खो दी होती" ही शेरशहाची त्यावेळची प्रतिक्रिया म्हणजे मारवाडच्या बाजरीचा गौरवच आहे.
हातावर बडीशेप घेत गूगल मॅपवर मी माझ्या हॉस्टेलचं म्हणजे मी जिथे राहणार होतो, ते ठिकाण शोधलं. बरोबर दोन किमीचा रस्ता.. पोटभर जेवल्यानं तरतरी आलीच होती. पाच तासाच्या प्रवासाने पायही आखडले होते. म्हटलं, चला 20 मिनिटांत चालत जाऊ.. बॅग पाठीला लटकावली आणि निघालो..
मोठाले रस्ते, शहरात वाहनंच वाहनं अगदी पुण्याची आठवण यावी, अशीच. पण गर्दी फार नाही, शिवाय सिग्नल पाळणारे आणि हेल्मेट कम्पलसरी घालणारे लोक दिसत होते. थोडं पुढे गेल्यावर जोधपूर हायकोर्ट लागलं. सलमान खान इथेच कोर्टाच्या वाऱ्या करत असे. त्याकाळात हायकोर्ट हे लोकांसाठी पर्यटनस्थळच असे. यातला गमतीचा भाग सोडून द्या.
मी एका मोठ्या गेटमधून प्रवेश केला. या गेेटच्या आतमध्ये बाजारपेठ आहे. जुनी घरं आणि गजबजलेलं मार्केट.. या गेटच्या (याला इथे परकोटा म्हणतात) आत जुनं शहर आहे. याच्या बाहेर वाढलं ते नवीन जोधपूर. मी हॉस्टेलवर आलो. हे हॉस्टेल मेहेरानगड किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी होतं. दीड वाजत आला होता. घाईघाईत आवरुन मी रिसेप्शनवर बसेलल्या मुलाला विचारलं " किले पे जाने के लिए रिक्षा मिलेगी ?"
तो म्हणाला "भाईसाहब, पिछेवाली गली से सिधे उपर जाईएं ना। दस मिनट में पोहोच जाओगे." पण मी खरंच खूप दमलो होतो. त्यामुळे रिक्षानेच जावं, असं वाटत होतं. ते ओळखत तो म्हणाला, " रिक्षासे जाना है तो जाईएं लेकिन रिक्षावाले नही आये तो rapido app डाऊनलोड कर लिजिए. बाईकवाले आ जायेंगे और कम पैसे में आपको घुमायेंगे।"
मी तात्काळ rapido app डाऊनलोड केलं. फार वेळ नसल्याने गड चढायला सुरुवात केली. थोडा त्रास झाला पण पोहोचलो. मेहेरानगडावरुन जोधपूर निळंशार दिसतं. इथल्या प्रखर उन्हामुळे या शहराला 'सन सिटी' या नावानेही ओळखलं जातं. उन्हापासून बचावासाठीच इथल्या घरांना निळा रंग देण्याची प्रथा पडली. काही वर्षांतच 'सन सिटी'सोबतच 'ब्लू सिटी' ही जोधपूरची नवी ओळख बनली.
इ.स. 1459 मध्ये राव जोधा यांनी या शहराची पहिली वीट रचली. त्यांच्या नावावरूनच या शहराला जोधपूर नाव पडलं. राजा रणमल यांच्या 25 मुलांपैकी एक होते राव जोधा. जोधपूरचे 15 वे शासक बनल्यावर त्यांना मंडोरचा किल्ला असुरक्षित वाटू लागला. त्यामुळे त्यांनी तात्काळ मंडोरपासून 9 किमीवर एका पहाडावर मेहरानगडाची उभारणी केली.
1459 ला सुरु झालेलं किल्ल्याचं काम महाराज जसवंत सिंह यांच्या कार्यकाळात म्हणजे 17 व्या शतकाच्या मध्यात पूर्ण झालं. 125 मीटर उंचीवर पाच किमी लांब हा भव्य किल्ला एका नजरेत सामावत नाही. किल्ल्याला मुख्य सात दरवाजे आहेत आणि आठवा गुप्त दरवाजा आहे.
मेहेरानगड किल्ला हा राजस्थानच्या सगळ्यात सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे. याच किल्ल्यात मोती महाल, सुख महाल, फुल महाल, शीश महाल आदी अनेक महाल आहेत. नक्षीदार दरवाजे, जाळीदार खिडक्या राजस्थानी कलाकुसरीची परंपरा टिकवून आहेत. किल्ल्यातच भव्य संग्रहालय आहे. यातल्या पालख्या, शस्त्रास्त्रं, राजे - राण्यांची वस्त्रं, इतर वस्तू यातून मारवाडचा इतिहास उलगडत जातो.
मेहेरानगड किल्ल्याची भव्यता आणि राठौडांचं शौर्य गाणारे मंगनीयार (गाणारा आणि वाद्य वाजवणारा समाज) आता बरेच आधुनिक झालेत. आता गाणी हिंदी सिनेमाची जरी वाजत असली तरी त्यांच्या सारंगीतून मारवाडचं मधूर संगीत वाहत असतं. फिरणारी बोटं आणि तारेच्या घर्षणातून निघणाऱ्या त्या स्वरांनी मला बाहेर पडण्याच्या द्वारावर काही काळ खिळवून ठेवलं.
सारंगीवाला
ज्या दरवाजातून आत गेलो, तिथून पुन्हा बाहेर पडल्यावर क्षणभर मी हताश झालो. झालं! वाटलं, आलो या जगात परत. दोन तास डोळे दिपवणाऱ्या महालाची सफर करुन बाहेर आल्यावर असं वाटणं अगदीच स्वाभाविकच होतं.
चार वाजत आले होते. इथून आता उमेद भवनला जायचं होतं. रिक्षावाल्यांना विचारलं, तर ते थेट 200 रुपये सांगत होते. हा पहिल्या दिवसापासूनचा माझा अनुभव होता. रिक्षावाले दीड-दोनशेच्या खाली इथे बोलतच नाही. इथे मला rapido app ची खूप मदत झाली. आपलं आताचं ठिकाण आणि जिथे जायचंय ते ठिकाण सेट करायचं. लगेच आजूबाजूला असलेले रजिस्टर्ड बाईकवाले (rapido app वरचे बाईकर्स... ज्यांचा अॅपवर 'कॅप्टन' असा उल्लेख असतो) आपल्या नंबरवर फोन करतात. एका मिनिटात मला फोन आला. आणि कॅप्टन पाचव्या मिनिटाला समोर हजर झाला. त्याने मला एक हेल्मेट दिलं. फक्त समोरच्यालाच नाही तर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट कम्पलसरी आहे. तिथले लोक हे सगळे नियम पाळतात, हे विशेष! मेहरानगडहून आम्ही बाईकने निघालो. शहरातून सुसाट वेगाने जात असताना माझ्या या सारथ्याशी गप्पाही झाल्या. हा मुलगा एलआयसीची कामं करतो. सोबतच, तो बाईकवरुन फिरवायची कामंही करतो. उमेद भवनबद्दल त्याला विचारल्यावर "मैं वहां कभी नही गयाI" असं प्रामाणिक उत्तर त्याने दिलं. उमेद भवनपर्यंत 39 रुपये बिल झालं. मी त्याला म्हटलं, "अर्धा तास थांब, तू मला इथून परत जसवंत थाडालाही घेऊन जा". तोही तयार झाला. उमेद भवनला 4.30 ला पोहोचलो. 30 रुपयाचं तिकिट काढून मी उमेद भवन पॅलेसच्या आत शिरलो.
उमेद भवन
मेहरानगडापासून सहा किमी अंतरावर चित्तर पहाडावर उभारलेलं हे उमेद भवन जगातल्या सगळ्यांत मोठ्या खासगी महलांपैकी एक! 1943 साली हा पॅलेस बांधून पूर्ण झाला. महाराजा उमेद सिंह यांनी हा पॅलेसला उभारला. म्हणून याचं नाव 'उमेद भवन'! उमेद सिंह यांचे वंशज या पॅलेसचे मालक आहेत. यामध्ये 347 खोल्या आहे. जोधपूरचं ताज हॉटेल याच पॅलेसमध्ये आहे. काही भागात संग्रहालय आहे. इथल्या शोभेच्या वस्तू, वेगवेगळी घड्याळं यांचं सुंदर कलेक्शन पाहण्याजोगं. समोरच विंटेज कारचं प्रदर्शनही आहे. बाहेरुन उमेद भवन मोठं दिसतं, पण यातला खूप कमी भाग पर्यटकांसाठी खुला आहे. त्यामुळे अर्धा पाऊण तासात मी बाहेरही पडलो.
आता मला जायचं होतं, जसवंत थाडाला आणि तिथून परत हॉस्टेलवर. 100 रुपयांत बाईकवाला दोस्त मला हे सगळं फिरवणार होता. हेच जर मी रिक्षाने फिरलो असतो, तर त्याने 300 रुपयांपेक्षा कमी घेतले नसते. अर्थात 100 रुपये ही आमची ऑफलाईन डील होती.
जयवंत थाडा
संगमरवरात बनलेलं शुभ्र जसवंत थाडा ही राजपरिवरातल्या लोकांच्या अंत्यविधीची जागा. महाराजा सरदार सिंह यांनी 1899 साली जोधपूरचे महाराज जसवंत सिंह (दुसरे) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक उभारलं. या आधी राज परिवारातील सदस्याच्या मृत्यूनंतर मंडोरमध्ये अंत्यसंस्कार व्हायचे. हे स्मारक बनवण्यासाठी त्याकाळी जवळपास 3 लाख रुपये खर्च आला होता.
साधारण 6 वाजताच्या संधीप्रकाशात बाईकवाल्या मित्रानं मला परकोटाच्या आतल्या बाजारात सोडलं. जवळच माझं होस्टेल होतं. पण या मार्केटमधे मला फिरायचं होतं. गेटच्या आत आल्यावर मी तिथेच उतरलो.
रात्रीच्या प्रकाशात चमचमणारं घंटाघर आणि भलं मोठ्ठं रंगीबेरंगी मार्केट. अँटिक पीसेस्, शोभेच्या वस्तू, लाकडी कलाकुसरीच्या वस्तू यांची रेलचेल होती. एका बाजूला चहा पकोड्यांची हॉटेल्स, हातगाड्यांवरचे पाणी पतासे (पाणी पुरी), एकूणच मजाच मजा...
मी राजस्थानला जाणार म्हटल्यावर माझ्याकडे आधीच बांधणी दुपट्टा, बांधणी साडी, लहेरीया दुपट्टा, हाताने विणलेले दुपट्टे याची फर्माईश आलेली होतीच. आता ही सगळी यादी कुणाकुणाची आहे ते मी सांगणार नाही. काही गोष्टी सिक्रेट बऱ्या असतात.
बांधणी दुपट्टा हा एका धाग्यामध्ये बांधून ठेवलेला असतो. दुकानदारानं मोठ्ठ्या गठ्ठ्यातून एक दुपट्टा काढला. माझ्यासमोरच त्यानं ते धागे केळ्याची साल काढावी, तसे एकमेकांपासून तोडले. माझ्याकडे बघत हसून म्हणाला "इसे कहते है बंधेज का जादू..."
दुपट्टे आणि साड्यांसोबतच बंद गळ्यांचे कोट ही जोधपूरची खरी ओळख. आपल्याकडे लग्नात जोधपुरी कोट मोठ्या हौशीनं घातला जातो. शिवाय जोधपूरच्या चादरीही प्रसिद्ध आहेत. ओझं सोबत घेणं मला शक्य नव्हतं, त्यामुळे मी तो मोह टाळला.
मार्केटमधून बाहेर पडतानाच बाजूला पानी पतासेवाला होता. इथल्या पाणी पुरीच्या पुऱ्या या खास गव्हाच्या पिठाच्या असतात. जाड आणि तेवढ्याच चवदारही. मुंबईत मिळणारी पुरी ही मैद्याची आणि पातळ असते. इथला पाणीपुरीतला चाट मसाला तर अप्रतिमच. विशेष म्हणजे त्याने एकामागोमाग एक 9 पुऱ्या दिल्या. माझंं पोट अगदी भरायलाच आलं होतं. मला वाटलं, किमान आता हा किमान 30 रुपये घेईल. मी 50 ची नोट त्याच्या हातात दिली. त्याने चक्क मला 40 रुपये परत दिले. 10 रुपयात पोटभर पाणीपुरी.. त्यामुळे पुन्हा जोधपुरला येण्याचं एक कारणच मला मिळालं "पाणीपुरी".
जोधपूरची खास ओळख इथली मावा कचोरी. ही प्रचंड गोड असते. मी गोड फार खात नाही, पण जोधपूरला आल्यावर मावा कचोरी तर खाल्लीच पाहिजे. पाणीपुरीवाल्याला विचारल्यावर त्याने समोरच्या चौकात मावा कचोरी मिळते, असं सांगितलं. न राहवून मी ते दुकान गाठलंच.
साजूक तुपात तळलेली कचोरी भल्यामोठ्या पाकाच्या पातेल्यात बुडवून बाहेर काढतात आणि मध्ये छेद देऊन त्यावर ड्रायफ्रूट्स टाकून देतात. एकच कचोरी मला पुरे झाली होती. पण प्लेटमध्ये दोन होत्या, म्हणून मी दुसरीही संपवली. तिथून बाहेर पडलो, तेव्हा नऊ वाजून गेले होते. बाहेर दुकानांची आवराआवर सुरु झाली होती. दिवसभर मस्त फिरल्याचं आणि महत्वाचं म्हणजे. खरेदी उत्तम झाल्याचं समाधान होतं. हॉस्टेल गाठून बॅग पॅक करुन झोपलो. कारण उद्या सकाळीच पुष्करसाठी निघायचं होतं.
सकाळी मी जोधपूर स्टेशन गाठलं. जोधपूर - इंदोर गाडी बरोबर 7.20 मिनिटांनी निघाली. अरवलीच्या पर्वतात वसलेल्या उदयपूर, माऊंट अबूनंतर जैसलमेरचं थर वाळवंट तिथून मारवाडी जोधपूर. आता पुन्हा जोधपूरवरुन अरवलीच्या पर्वतरांगांत मी प्रवेश करत होतो. एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचं समाधान मनात भरुन आलं होतं...